बौद्धजन पंचायत समिती माणगांव माजी तालुका अध्यक्ष लहु रामजी सकपाळ यांच्या निधनामुळे न भरून येणारे नुकसान !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : मुंबई वडाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे सेवा निवृत्त कर्मचारी, रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या इंदापूर विभागातील संबोधी विहार समितीचे माजी सभापती व संचालक, रामजी नंदन प्रतिष्ठान चे संस्थापक संचालक, बौद्धजन पंचायत समिती माणगांव तालुका माजी अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद माणगांव रायगडचे कुशल संयोजक, माणगांव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वास्तुचे नवसंकल्पकार, या भव्य वास्तू निर्माण कार्याचे ठेकेदार सुप्रसिद्ध उद्योजक, विकासक दानशूर व्यक्तीमत्व आयु. अंकुश रामजी सकपाळ यांचे बंधू , माणगांव तालुका बौद्ध समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत ज्यांचे अनमोल व चिरस्मरणीय असे भरीव योगदान असलेले, सर्व समाज घटकातील जनतेच्या सुख दुःखात हिरीरीने आवर्जून उपस्थित राहणारे कळसांबडे गावचे सुपुत्र बौद्ध समाजातील एक हरहुन्नरी चतुरस्र प्रभावी व्यक्तीमत्व लहु रामजी सकपाळ यांचे दीर्घ आजाराने रविवार दिनांक ०४ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथून त्यांच्या कळसांबडे येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच संपूर्ण माणगांव तालुक्यावर दुःखद शोककळा पसरली.
रविवार दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कळसांबडे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुली, आई, जेष्ठ बंधू आणि त्यांचा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला कळसांबडे स्थानिक, मुंबईकर भावकी, तळा व माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून विविध सामाजिक, धार्मिक संघटना, बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे आजी माजी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव, हितचिंतक, मित्र परिवार, सगेसोयरे, नातेवाईक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम कळसांबडे येथील त्यांच्या राहत्या घरी १४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्षीय कारकिर्दीत लहु रामजी सकपाळ यांनी अनेक विधायक कार्य केले. ज्या मध्ये विश्व शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा तालुका स्तरावर संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम, बौद्ध संस्कार शिबिरे, संविधान गौरव दिन कार्यक्रम, रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे सर्व प्रथम भव्य दिव्य अशी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद कार्यक्रम, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा आणि तालुक्यातील सर्व विभागीय उप शाखा यांच्या कार्यात समन्वय साधण्यासाठी विभागवार सहविचार सभा, गावभेटी, गेली अनेक वर्षे माणगांव तालुक्यातील बौद्ध जनतेला अपेक्षित असलेले त्यांच्या संकल्पनेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक भवन वास्तूच्या भव्य दिव्य वास्तूच्या निर्मितीच्या जोखमीचे आणि अत्यंत जबाबदारीचे काम अशी अनेक सामाजिक, धार्मिक विधायक कार्य त्यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाली. सामाजिक व धार्मिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या लहु रामजी सकपाळ यांचा दरम्यान च्या काळात इंदापूर येथे एका मोठ्या आयवा वाहनाच्या चुकीमुळे त्यांना गंभीर अपघात झाला होता. त्यामध्ये लहु रामजी सकपाळ यांना गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांच्या बरगड्या, फुफ्फुसे त्यांना प्रचंड इजा होऊन त्यांना आपला एक पाय गमवावा लागला होता. तेव्हा पासून ते फुफ्फुसांच्या आजाराचा धीरोदात्तपणे सामना करत, सदर अपघातात एक पाय गमावून सुद्धा त्यांनी आपल्या सामाजिक, धार्मिक कार्यात जराही खंड पडू दिला नाही. या सर्व गोष्टींवर मात करून ते एखाद्या तरुणाला लाजवेल अशी निस्सीम समाजसेवा आणि निःस्वार्थी वृत्तीने समाज कार्यात शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या या निर्मोही निरंतर अहर्निश समाजिक कार्याला पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड आणि सह परिवाराचा मानाचा आणि सन्मानाचा क्रांतिकारी जयभीम आणि भावपूर्ण आदरांजली.

No comments:
Post a Comment