कोरोना संचार बंदीने त्याची कला झाली जिवंत !! *मुरबाड मधील जिवंत कलेचा वारसदार सचिन पोतदार पुन्हा भुतकाळाकडे **ओढ कुंचल्याची **
मुरबाड (मंगल डोंगरे) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेला, आणि कलेचा परंपरागत वारसा लाभलेला मुरबाड, या मुरमाडी मातीत अनेक प्रकारचे कलाकार जन्माला आले ,नावारुपाला आले, मात्र आजही असे खूप सारे कलाकार प्रसिद्धीच्या पडद्याआड आहेत. त्यातलेच एक हस्तकलेचा छंद जोपासणारे कलाकार म्हणजे च सचिन पोतदार, आधुनिक यंत्राद्वारे काम करून कलेची आराधना सुरु ठेवणारे पण कुंचला आणि रंग यातील मजा काही औरच,परंतु त्यासाठी आता वेळही हवा असतो. आता तो हरवलेला वेळ कुठुन आणायचा अशातच संपूर्ण जगाच्या काळजाचा ठोका चुकविलेल्या कोरोना व्हायरसच्या दहशतीनेे अवघं जग घरबंदीस्त केले असतांना मुरबाडच्या एका अवलिया पत्रकाराने अर्थात व्यंगचित्रकाराने या एकलकोंड्या व्याधीवर चांगलाच उपचार शोधला आणि इलेक्ट्रॉनिक मशीन वर काम करणा-या हातात कुंचला आला,आणि बघता बघता पुन्हा काही आठवणीतील हरवलेली चित्रे रंगु लागली.
मुरबाड शहरातील युवा पत्रकार व्यंग चित्रकार सचिन रमेश पोतदार आपल्या हस्त व चित्रकले करिता चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांना लाभलेली ही कला निसर्गाचे देणं असल्याचे बोलले जात आहे. शहरातील सोनारपाडा येथे ते राहत असून त्यांच्या राहत्या इमारती खाली त्यांचे रेडियमचे दुकान आहे. मात्र दैनंदिन कामाच्या व्यापामुळे त्यांची चित्र रेखाटण्याची कला काही मैल मागे पडत चालली होती. परंतु देशात व पर्यायाने राज्यात संचारबंदी लागू केल्याने या अवलिया कलाकाराला आता चांगलीच सवड मिळाली आहे.
याच संधीचा सोने करत पोतदार यांनी नव्याने रंग व ब्रश हाती घेतले असून त्यांच्या संकल्पनेतून विठ्ठलाची जिवंत पंढरी जणू आकारास आली आहे. एरव्ही भाविकांच्या वर्दळीने सजलेली पंढरी आता निर्मनुष्य झाली असून पोतदार यांना ती पुन्हा गजबजलेली अपेक्षित असल्याची भावना त्यांनी सदर चित्रात ओतली आहे. तर या चित्र सोबत आपल्या परिसरातील वस्तुस्थिती दर्शविणारे आणखीन एक चित्र पोतदार यांच्या चमत्कारी ब्रशने रंगविले आहे. आपल्या परिसरातील भयाण स्मशान शांतता, नागरिकांनी केलेली कायद्याची अंमलबजावणी व त्यातून प्रवर्धित होणाऱ्या नागरिकांच्या संयमाचा जणू जिवंतपणा रेखाटलेले असल्याचे प्रथमदर्शी या चित्रातून लक्षात येते.
या चित्रांना प्रत्यक्ष पाहण्याचा मोह अनेकांची चित्रप्रेमींना झाला असल्याने याची दाखल घेत आपल्या वर्तमान पत्राच्य माध्यमातून आम्ही ही चित्रे आपल्या समोर आणीत आहोत. आधुनिकतेच्या संगणक युगात असे कलाकार आज ही आपल्या कलेला जिवंत ठेऊन आहेत. याचे कौतुक करावे तितके थोडेच, अशा प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत.
सचिन पोतदार यांच्या सह त्यांचे मोठे बंधू हरेश पोतदार हे ही तल्लख कलाकार म्हणून ख्यातनाम आहेत. पंचधातूवर खिळा-हातोडीच्या सहाय्याने हाताने कोरीव नक्षीकाम केलेले ४० पेक्षा अधिक विविध फोटोफ्रेम तसेच गणपती सणांमध्ये हाताने रेखीव नक्षीकाम केलेल्या गणेश मुर्त्या देशविदेशातील हस्तकलेची कदर असणाऱ्या चाहत्यांकडे आजही जतन केलेल्या दिसून येतात. इतर दिवस ते विविध प्रकारची अत्तरे तसेच अगरबत्ती बनवून आपल्या लहान भाऊ सचिन याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवतात. कलाकारीचा वरदान लाभलेले मुरबाड शहरातील हे पोतदार बंधू विविध नवनवीन कलाकसुरींच्या आविष्कारासाठी नेहेमीच मुरबाडकरांचे कौतुक मिळवतात.
कॅनव्हासवर कागदावर केवळ पेन्सील सफेद खडू कोळशाच्या सह्हयाने बोलता बोलत हूबेहूब चित्र रेखाटणारा सचिन नावाचा अवलिया अपघातग्रस्त जखमी गोरगरीबांना मदत देण्यासाठी सदैव तत्पर राहून कले सोबत समाज सेवेचा वसा जोपासत आहे.त्यांनी रेखाटलेली हि काही चित्रे नक्कीच बघण-यांना मनमोहीत करतील.



No comments:
Post a Comment