रायगड जिल्ह्यातील गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत न करण्याबाबत 'पालकमंत्री कु.आदिती तटकरें'नी ग्रामविकास मंत्र्याना दिले निवेदन !!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत हद्दीतील (गावे/वाडी) अंतर्गत येणाऱ्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून खंडीत करण्यात आला आहे. यामुळे गावागावामध्ये चोरी- दरोड्यासारखे प्रकार उद्भवून त्यातून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबतचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी ग्रामविकास मंत्री श्री.हसन मुश्रीफ यांना महावितरण वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित होऊ नये, याबाबत लक्ष देण्याविषयी निवेदन आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात दिले.
यावेळी रायगड जिल्ह्यातील सरपंच सोमनाथ ओझर्डे, शरद जाधव, अनिल ढवळे, संयोगिता गायकवाड आदी उपस्थित होते.
राज्यात कोविड परिस्थितीमुळे या ग्रामपंचायतींना वीजबील भरणे शक्य न झाल्याने राज्य विद्युत वितरण कंपनीकडून या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. थकीत वीजदेयके भरण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत ग्रामविकास विभागामार्फत आदेश निर्गमित करण्यात यावेत. तसेच ग्रामविकास विभागाकडून ऊर्जा विभाग व राज्य विद्युत वितरण कंपनीस थकीत विद्युत देयके भरणा होईपर्यंत वीजपुरवठा खंडीत करू नये, अशा सूचना देण्याबाबत पालकमंत्री कु. तटकरे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री महोदयांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

No comments:
Post a Comment