Monday, 16 August 2021

'गणेशपुरी येथे श्रमजीवींच्या स्वातंत्र्याचा जल्लोष'.. गर्दीचा उच्चांक मोडुनही श्रमजीवीने दिले शिस्तीचे धडे..!

'गणेशपुरी येथे श्रमजीवींच्या स्वातंत्र्याचा जल्लोष'..
गर्दीचा उच्चांक मोडुनही श्रमजीवीने दिले शिस्तीचे धडे..!

हजारो श्रमजीवी कष्टकऱ्यांची तिरंग्याला मानवंदना..
विवेक - विद्युल्लता पंडित यांची दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईची हाक..


भिवंडी, उमेश जाधव -: आज संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा झाला. या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा झाला. जे आदिवासी कष्टकरी स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत, अशा निरपेक्ष आदिवासी कष्टकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने येऊन गणेशपुरीत आपल्या राष्ट्रध्वजाला, तिरंग्याला मानवंदना दिली. उपेक्षित कष्टकरी देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या, शाहिद झालेल्या हुतात्म्यांना आज सलामी देऊन साडेतीन दशकांची श्रमजीवी परंपरा अबाधित ठेवली. 


यावेळी भाषणात विवेक आणि विद्युलता पंडित यांनी खरे स्वातंत्र्य गरीब सामान्यांना मिळवून देण्यासाठी लढाईची हाक दिली. हे अमृत महोत्सवी वर्ष संघर्ष वर्ष असेल असे सांगितले. श्रमजीवी सैनिकांनी एक वर्ष देशासाठी अर्पण करावे, वर्षभरात सरकार आणि अधिकाऱ्यांना ते मालक नाहीत नोकर आहेत. याची जाणीव करून देण्यासाठी श्रमजीवी संघर्ष करेल असे उद्गार यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी काढले. यावेळी वज्रेश्वरी पासून तब्बल तीन तास रॅली ने गणेशपुरी पर्यंत येऊन झेंडावंदन केले. यावेळी अत्यंत शिस्तबद्धपणे मिरवणूक आणि मनसोक्त नाचत, गाजत व जल्लोष साजरा केला.


आज पर्यंत ज्यांच्या झोपडीमध्ये स्वातंत्र्याचा प्रकाश पोहचला नाही. आजही ज्यांना पोटभर अन्न नाही, पुरेसा रोजगार नाही ज्यांना केवळ वेदना, भूक, बेरोजगारी आणि दारिद्र्यच दिले आशा कष्टकरी बांधवांचा हा अनोखा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  या उत्सवात पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्हयातील सुमारे २५ ते ३० हजार सभासद सहभागी झाले होते. गेली ३८ वर्षे अखंडपणे चढत्या आलेखाने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव गणेशपूरी येथे संपन्न होत असतो. १० वर्षाच्या बाल कार्यकर्त्यांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच यात सहभागी होतात. एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासींचा एकत्र येऊन होत असलेला हा झेंडावंदन भारतातील एकमेव कार्यक्रम आहे.
    

श्रमजीवी संघटना गेली ३८ वर्षे आदिवासी कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहे. या स्वातंत्र्य उत्सवाला एक क्रांतिकारी इतिहास आहे. संघटनेने जेव्हा काम सुरू केले तेव्हा स्वातंत्र्याला ३५ वर्ष लोटलेले होते, मात्र स्वतंत्र भारतात देखील सावकारी, गुलामगिरीच्या पाशात अडकलेल्या आदिवासींना स्वतंत्र शब्दाचा अर्थ सोडा साधा हा शब्दही त्यांच्या कानी कधी पडला नसल्याचे विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांच्या लक्षात आले. त्यानंतर जेव्हा त्यांनी या वंचितांना घेऊन झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर तो त्या काळच्या प्रस्थापित पुढारी आणि मालकधार्जिण्या सरकारने हा झेंडावंदन गुन्हा ठरवत पंडित दाम्पत्यासह नऊ कार्यकर्त्याना तुरुंगवास भोगावा लागला होता. स्वातंत्र्य भारतात देखील ह्या कार्यकर्त्यांनी कडवी झुंझ देत आपला स्वतंत्र्याचा  हक्क बजावला. त्यानंतर हा स्वातंत्र्य उत्सव अविरतपणे सूरू आहे.

ज्यांना या देशातील स्वातंत्र्योत्तर नेत्यांनी उपेक्षेशिवाय काहीही दिलेले नाही असे आदिवासी कष्टकरि कामगार स्वखर्चाने वाजत गाजत नाचत आनंदाची उधळण करित मिरवणुकीने वज्रेश्वरीहून गणेशपूरिला जातात. स्वातंत्र्य वीरांना अभिवादन करतात. त्यांच्या स्वप्नाची उजळणी करतात. दुसर्या स्वातंत्र्य लढ्यासाठी वचनबद्ध होतात. सरकारी स्वातंत्र्य दिन जुलुम जबरदस्तीने होताना आपण पहाता. तो एक उपचार वाटतो. गणेशपूरी मात्र जनतेच्या उत्स्फूर्त उत्सवाने स्वातंत्र्यमय होते. या जनतेच्या स्वातंत्र्य उत्सवाची दखल फारशी घेतली गेली नसली तरी हा उत्सव साजरा करणार्यांना त्याची खंतही नाही.
 
आजचे सत्कारमूर्ती डॉ.विनय पाटील, डॉ.आशिष भोसले, डॉ.वर्षा भोसले, डॉ.वर्षा पाटील या कोविड काळात समर्पित भावनेने सेवा दिल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला. विवेक पंडित यांनीही यावर्षी मुंबई विद्यापीठातुन एम ए (कला पदव्युत्तर परीक्षा) ९४ टक्के गुणांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.विनय पाटील, डॉ.आशिष भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुरेश रेजड यांनी तर सूत्रसंचालन ॲड. स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली महिला ठिणगीच्या पदाधिकारी महिलांनी केले.

गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव आणि सहकारी पोलिसांनी तसेच श्रमजीवी संघटनेच्या युवक सेवा दल स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था सांभाळत हा कार्यक्रम शांततेत आणि अतिशय शिस्तबद्धपणे पार पडला.

वाजत गाजत नाचत अत्यंत आनंदात ही मिरवणूक पार पडली,  देशात अनेक ठिकाणी मात्र बेगडी देश प्रेम उफाळून येताना दिसत असतांना घाम गाळणाऱ्या निरपेक्ष श्रमजीवी आदिवासींच्या या अनोख्या उत्सवात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा, केशव नानकर, कार्याध्यक्ष ॲड. स्नेहा पंडित दुबे, सेवा दल प्रमुख आराध्या पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, युवा उद्योजक रोहन गायकवाड, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, सुरेश रेजड, हिरामण नाईक इत्यादी पदाधिकारी होते.

No comments:

Post a Comment

कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी !

कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी ! मुंबई (शांताराम गुडेकर) :        ...