Wednesday, 13 August 2025

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित ; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय !!

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित ; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय !!

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) द्वारे चालवल्या जाणाऱ्या आरकेएफ विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू केलेले आमरण उपोषण हे JNPA चेअरमन उन्मेश वाघ यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ रोजी स्थगित करण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले होते. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने भविष्य निर्वाह निधी (PF), करारबद्ध कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीकरण, तसेच ६ व्या आणि ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकी आणि भत्ते लागू करणे यांचा समावेश होता.

यावर तातडीने लक्ष देत, JNPA चेअरमन उन्मेश वाघ यांनी मंगळवारी १२ ऑगस्ट २०२५ रोजी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न येत्या पंधरा दिवसांमध्ये सोडवण्याची हमी दिली. या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीत JNPA चेअरमन  उन्मेश वाघ, उपाध्यक्ष अनिरुद्ध जोशी, व्यवस्थापक (प्रशासन)  विनय मल्ह, व्यवस्थापक (प्रशासन) आणि सचिव म्हणून श्रीमती. मनीषा जाधव, तसेच माजी आमदार  मनोहर शेठ भोईर आणि JNPA चे माजी विश्वस्त व कामगार नेते भूषण पाटील आणि शालेय मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची दहा जणांची कोर कमिटी हे उपस्थित होते.

या बैठकीतील चर्चेनुसार, कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर विविध निर्णय घेण्यात आले
 
कोट (चौकट) :- 

 बैठकीत घेण्यात आलेले निर्णय 

भविष्य निर्वाह निधी (PF): - 
जून २०१९  पासून प्रलंबित असलेले भविष्य निर्वाह निधीचे देणे दोन दिवसांच्या आत अदा करण्याची JNPA ने हमी दिली. यासंबंधीची आवश्यक माहिती विद्यालयाने उपलब्ध करून दिल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
 

करारबद्ध कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीकरण :- 
करारबद्ध कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यासाठी आणि त्यांची पात्रता व अनुभवानुसार वेतन निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल. ही समिती शिफारशी सादर करेल आणि २० ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत या शिफारशींना अंतिम मंजुरी दिली जाईल.
 

थकबाकीची देणी :- 
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे ₹५२ लाख आणि एकूण ₹१२ लाख अशी थकबाकी देण्याबाबत JNPA ने सहमती दर्शविली आहे. ही रक्कम जुलै २०१९ ते जुलै २०२५ या कालावधीतील वेतनामधील फरकापोटी दिली जाईल. ही रक्कम लवकरच अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.


६ वा आणि ७ वा वेतन आयोग :- 
६ वा आणि ७ वा वेतन आयोग तसेच DA, वेतनवाढ आणि थकबाकीची अंमलबजावणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पूर्वी एक सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश JNPA चे माजी विश्वस्त भूषण पाटील यांना देण्यात आले आहेत.
 

आरकेएफ विद्यालयाचे व्यवस्थापन :- 
JNPA आरकेएफ विद्यालयाचे व्यवस्थापन रद्द करून १० वर्षांसाठी स्वतःकडे ठेवणार आहे. या अंतर्गत अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

JNPA चेअरमन यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र ३१ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...