Saturday, 11 October 2025

जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात ?

जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात ?

** चार महिन्यांपासून मानधन थकीत; निधीअभावी परिस्थिती गंभीर

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) :
जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे कारण गेली चार महिन्यांपासून कंत्राटी कामगारांचे मानधन थकीत आहे. निधीअभावी ही  गंभीर परिस्थिती उद्भवली असल्यामुळे कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी मात्र अंधारात जाणार आहे. त्यामुळे शासनाने यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी कंत्राटी कामगारांनी शासनाकडे केली आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा तज्ञ, बीआरसी (गट संसाधन केंद्र) कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकीत आहे. परिणामी, या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रभरातील हे सर्व कर्मचारी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने काम करीत आहेत. मात्र, जुलै २०२५ पासून आजपर्यंतचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे आर्थिक संकटात भर पडली आहे.

कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही वेळोवेळी राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी संपर्क साधला असता, केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही म्हणून मानधन देणे शक्य नाही,” अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसेच  प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर करून मानधन तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, “वेळेवर मानधन मिळाले नाही, तर दिवाळी सणाच्या काळात आमचे घर अंधारात राहील.” जिल्हा व तालुकास्तरीय स्तरावर काम करणारे हे कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करतात. या मानधनातूनच घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यावरील खर्च भागवावा लागतो. त्यामुळे सध्या त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे.

कर्मचाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांनी दिवाळी सण आनंदात साजरी करता येईल.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...