Tuesday, 9 June 2026

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

डोंबिवली, संदीप शेंडगे : महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित जमीनप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सोमवारी रात्री डोंबिवलीत झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जमीन पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्याचा निर्णय जाहीर केला.

“पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरासाठी सुरू असलेल्या प्रदीर्घ संघर्षाला आज पूर्णविराम मिळाला असून यात सर्व महादेव भक्तांचा विजय झाला आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरात विधीवत महापूजा झाली आणि भक्त मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, माजी खासदार कपिल पाटील, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, मंदिराचे विश्वस्त आणि हजारो भाविक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पवित्र कार्य पूर्ण झाले. मात्र आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. जे कार्य करायचे असते ते महादेवच करवून घेतात. या यशाचे संपूर्ण श्रेय भगवान महादेवालाच जाते.”

पिंपळेश्वर मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून तोच सुवर्ण इतिहास पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम शासन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी मांडलेल्या मंदिर परिसराच्या विकासाच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंदिरासाठी झालेल्या आंदोलनाचा इतिहास सांगितला, तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा क्षेत्रातील पुढील विकास आराखडा मांडला.

Monday, 8 June 2026

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

येत्या खरीप हंगाम २०२६ मध्ये कृषी विभागाच्या विविध निविष्ठा व लाभाच्या योजनांपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अद्याप फार्मर आयडी न काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी (पी.एम. किसान व वनपट्टाधारक शेतकरी सहित) तात्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा संबंधित यंत्रणेमार्फत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

अॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात केली जात आहे. राज्यातील अंदाजे १७१ लाख खातेदार शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी देण्यात येणार असून विशेषतः राज्यातील ११९ लाख पीएम किसान लाभार्थी शेतक-यांना ओळखपत्र प्रदान करून या योजनेअंतर्गत सामावून घेण्याचे उदिष्ट आहे.

राज्यात कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ पारदर्शक आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण करण्यात येत असून त्याद्वारे विविध कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील उपलब्ध माहितीनुसार राज्यात एकूण १७१ लाख खातेदार असून त्यापैकी १३३ लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी प्राप्त केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील एकूण नोंदणीकृत लाभार्थी ११९ लाख लाभार्थी असून त्यामधील ९१.२७ लाख सक्रिय लाभार्थी असून त्यापैकी ८० लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. याशिवाय अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणीसाठी उपलब्ध एकूण १ लाख ३ हजार वनपट्टाधारक शेतक-यांपैकी ८ हजार ३१५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली आहे.

कृषी विभागाचे सचिव यांच्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलेले नाहीत अशा पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी व वनपट्टा धारक शेतकरीसहित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी ३० जून २०२६ पूर्वी काढून घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापक मोहीम हाती घेऊन या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढून घेण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची फार्मर आयडी नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून या मोहिमेस सर्व संबंधित विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक ॲग्रीस्टॅक अंकुश माने यांनी केले आहे.

पंधरा वर्षापासून पावभाट बोरी येथील विजेची समस्या न सुटल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण !

पंधरा वर्षापासून पावभाट बोरी येथील विजेची समस्या न सुटल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण !

मागणी पूर्ण न झाल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा.

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील पाव भाट बोरी येथील रहिवाशी १५ वर्षांपासून विजेच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.बोरी पाव भाट येथे सिंगल फेज विद्‌युत नागरिकांना मिळत आहे गेले पंधरा वर्षापासून हे नागरिक एमएसईबी उरण येथे  ट्रिपल फेस विद्युत पुरवठा मिळावा म्हणून मागणी करत आहेत . नागरिकांकडे सिंगल फेज असल्यामुळे फ्रीज टीव्ही व इतर उपकरणे व्यवस्थित चालत नाही. विद्युत पुरवठा कमी असल्यामुळे अनेक वेळा अनेक उपकरणे बिघडून जात आहे. याबाबत अनेक वेळा त्यांनी तक्रार केली आहे बैठका झाल्या आहेत, पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडे थ्री फेज लाईन आली नाही स्थानिक एक कुटुंबाचा विरोध आहे की त्यांच्या घरा च्या समोर च्या रस्त्यावरून लाईन टाकू देत नाही. एमएसईबी चे कर्मचारी पोल टाकायला येतात आणि हे कुटुंब त्याला विरोध करतो एमएसईबीचे लोक निघून जातात यावरून अनेक वेळा तणावाचे वातावरण झाले आहे.याचा त्रास इतर नागरिकांना होत आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठपुरावा सुरु केला आहे.मागणी मान्य न झाल्यास ५ जून रोजी काँग्रेसच्या वतीने कोटनाका येथील एम एस ई बी वीज महावितरणच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.

वास्तविक पाहता जी काय अडचण असेल ती एमएसईबी पोलिसांच्या सहकायनि दूर करून आम्हाला थ्री फेस लाईन टाकून दिली पाहिजे. प्रशासनाने लक्ष घालून एमएसईबी व उरण पोलीस यांची बैठक बोलून यातून मार्ग काढावा अशी मागणी काँग्रेस तर्फे माजी नगरसेवक बबन कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी  प्रशासनाकडे केली आहे.प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) कामांबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह !

सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) कामांबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह !

घाटकोपर, (केतन भोज) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील विक्रोळी पार्कसाईट, रामनगर, राहूल नगर, डकलाईन, सेवा नगर, भीम नगर मध्ये सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) कामांसाठी ठेकेदार संस्थांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) ची कामे होताना दिसत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) च्या कामांसाठी ठेकेदार संस्था नेमली असूनही प्रत्यक्षात कामे होताना दिसत नाहीत. मग ही योजना नेमकी ठेकेदारांसाठी आहे की नागरिकांसाठी?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,अनेक भागांमध्ये नाले, गटारे सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) संबंधित कामे नियमित विभागात स्वच्छता होत नसल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जात आहे.सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) योजनांवर महापालिकेकडून लाखो रुपये मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना त्याचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांना मिळत आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, या विषयावर मनपा एन विभागाच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित कामांची माहिती,कामाचे वेळापत्रक तसेच ठेकेदार संस्थांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती सार्वजनिक करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.पावसाळा तोंडावर असताना सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) योजनेच्या संबंधित कामांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याने, प्रशासनाने या तक्रारींची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन...

*१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन...

*मा. डॉ. आण्णासाहेब डांगे, खासदार मा. श्री. रामराव वडकुते, आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती*

*प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त ऊरूण ईश्वरपूर येथील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक तसेच महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. डॉ. आण्णासाहेब डांगे, खासदार मा. श्री. रामराव वडकुते, आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांच्या सह समाजातील २१ संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणूकीचे आयोजन शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता ऊरूण ईश्वरपूर शहर व वाळवा तालुका धनगर समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे  व धनगर समाजाचे युवक नेते मा. श्री. सागरभाऊ मलगुंडे यांनी दिली.

शहरातील तहसिल कार्यालय येथुन मिरवणूकीस मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात येणार असुन या मिरवणूकीचा मार्ग तहसिलदार कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - यल्लामा चौक - गांधी चौक - लाल चौक - गणेश भाजी मंडई - मा. आण्णासाहेब डांगे चौक - शिराळा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी मिरवणूकिचा समारोप होणार आहे. वाळवा तालुक्यातील धनगर समाजाचे वास्तव्य असणाऱ्या ५६ गावामध्ये जयंती ऊत्सव निमित्त संपर्क दौरा पूर्ण केला असुन या दौऱ्यास समाज बांधवासह अन्य सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या मिरवणूकीमध्ये हत्ती, घोडे, ऊंट यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी आकर्षक रथ, व अहिल्यादेवीच्या जिवनावरील ५ जिवंत देखावे, धनगरी ढोल, नाविन्यपूर्ण देशपातळीवर नावाजलेले एकमेव गज नृत्य, महिला मुलिंचे गज नृत्य, हालगी घुमके, ब्रॉस बँन्ड कंपनी, सनई पिपाणी तसेच धनगर समाजाचे दैवत असलेल्या सुक्षेत्र बळगल, बागलकोट येथील भरमदेव सुरवंती देवस्थानचे श्री. परशुराम पुजारी, खिद्रापूर कोल्हापूर येथील आदि जगतगुरू रेवणसिध्द देवस्थान चे विशाल पुजारी, रायबाग, बेळगांव येथील मायाक्कादेवी देवस्थान चे बाळासाहेब पुजारी, आरेवाडी कवठेमहांकाळ देवस्थान चे जगन्नाथ कोळेकर पुजारी, पट्टण कोडोली कोल्हापूर येथील विठ्ठल बिरदेव देवस्थान चे संभाजी पिराई, वाशी करवीर येथील अवघडखान बिरदेव देवस्थानचे कृष्णात रानगे (गुंडादेव), माण सातारा येथील सतोबा देवस्थान चे विठ्ठल दडस, पांगरी सातारा येथील बिरदेव देवस्थानचे शिवाजीराव दडस, पुरंदर पुणे येथील विर क्षेत्र देवस्थानचे पिंटू शिंगाडे, हुलजंती मंगळवेढा सोलापूर येथील हलमत धर्म गुरूपिठाचे हलमत भास्कर कवी श्री. अडवेप्पा सोमुत्ते महाराज, हून्नूर सोलापूर येथील हून्नुरज्सिध्द बिरोबा देवस्थान चे शामराव पुजारी, बेळगांव अक्कोळ येथील सोमय्या पुजारी, आप्पाचीवाडी निपाणी बेळगांव येथील हालसिध्दनाथ देवस्थानचे सर्जेराव पुजारी, निपाणी बेळगांव येथील हालसिध्दनाथ देवस्थानचे भाकणूककार भगवान डोणे, आदमापूर संत बाळूमामा देवस्थान चे भाकणूककार कृष्णात डो‌णे, हुक्केरी बेळगांव येथील गजलिंगेश्वर बिरलिंगेश्वर देवस्थान घोडेक्षगिरीचे हुच्चापा पुजारी आदी संत महंत प्रमुख समाज बांधवांना दर्शनासाठी मिरवणूकीत उपस्थित असणार आहेत. याबरोबरच सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील समाजातील विविध मंदीरे व देवस्थानचे पुजारी, प्रमुख व समाजातील देवरशी व हेडमी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील पुरूष मंडळीनी पिवळा शर्ट व महिला भगीनीनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून मिरवणूकीस सहभागी व्हावे असे अवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ऊत्सव नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जयंती उत्सव यशस्वीतेसाठी धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी सर्व यंत्रणा, संपर्क मोहिम गतीमान केली असुन ऊरूण ईश्वरपूरचे माजी नगरसेवक मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू), मा. श्री. सागरभाऊ मलगुंडे, अभिजित रासकर, प्रकाश कणप, दत्तात्रय तांदळे, जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी, अँड. उमेश कोळेकर, शाहिर सागर माने, पांडूरंग वाघमोडे, भगवान बोते, प्रविण माने, सागर गावडे, भानुदास विकर, अविस्कार नांगरे, अमोल विरकर, उमेश गावडे, धोंडीराम वाटेगांवकर, पत्रकार विलासराव कोळेकर, बिरू बोते, मंगेश लवटे, विजय कवठेकर, जयवंत टिबे, धनंजय करांडे, भानुदास खरात, राजाराम गावडे, शंकर रासकर, प्रकाश अनुसे, पोपटराव काळे, बजरंग कदम, अजित पाटील यांच्यासह सर्व समाज बांधव उत्सपूर्तपणे सहभागी झाले आहेत.

प्रसिद्धीसाठी/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

Sunday, 7 June 2026

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!

अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ येथील विश्वजीत ग्रीन सोसायटीच्या एफ विंगमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

संपूर्ण विश्वजीत ग्रीन परिसरात पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना केवळ एफ विंगमधील रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच दैनंदिन गरजांसाठी रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर समस्येची तात्काळ चौकशी करून पाणीपुरवठा खंडित होण्यामागील कारण शोधावे तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने लक्ष देऊन एफ विंगमधील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.

Saturday, 6 June 2026

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा !!

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा !!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन लोकाभिमुख प्रशासन उभारूया – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

ठाणे, दि. ६ (संदीप शेंडगे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे आज, दि. ०६ जून, २०२६ रोजी शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य, स्वाभिमान, लोककल्याण आणि सुशासनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ राज्यभर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर मानाची स्वराज्य गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. शिक्षक रविंद्र तरे आणि सहशिक्षक यांनी पोवाडा गायन केले तसेच “जय भवानी, जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमादरम्यान शिवचरित्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याण, न्याय, पारदर्शकता आणि सुशासन यांचे जे आदर्श निर्माण केले, ते आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी राज्यकारभाराची संकल्पना महाराजांनी प्रत्यक्षात उतरविली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक स्मृतीदिन नसून सुशासन, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा दिवस आहे.”

कल्याण वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा वाद चिघळला !!

कल्याण वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा वाद चिघळला !!

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या कामामुळे बाधित होत असलेल्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुद्धभूमी फाउंडेशनला भेट दिली. मात्र, या भेटीदरम्यान उपस्थित भीमसैनिक आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद निर्माण झाला. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या कामासाठी बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा काही भाग बाधित होत आहे. संबंधित जागेबाबत अद्यापही महापालिकेकडून नुकसानभरपाई किंवा टीडीआर देण्यात आलेला नसल्याचा आरोप बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य बौद्ध  भिख्खू गौतमरत्न महाथेरो आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. गौतमरत्न महाथेरो आणि आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा झाली मात्र, काही भीमसैनिकांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त करत प्रशासनाविरोधातील तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली सोबतच या प्रकरणातील खासदार आणि पालिका प्रशासनाची बाजू घेत असल्याचा आरोप करत विविध घडामोडींवर आक्षेप नोंदवले. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले.

या गोंधळात रिपब्लिकन सेनेच्या नगरसेविका माया कांबळे यांनाही कार्यकर्त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला असून त्यांना तेथून निघून जावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बुद्धभूमी फाउंडेशन ही केवळ एक संस्था नसून सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीशी निगडित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला असून, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.

सध्या या प्रकरणाकडे आंबेडकरी समाजासह कल्याणकरांचे लक्ष लागले असून, महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि बुद्धभूमी फाउंडेशन यांच्यातील चर्चेतून मार्ग निघतो की संघर्ष आणखी तीव्र होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाच्या विकासकामांसोबतच बाधित संस्थांना योग्य नुकसानभरपाई व न्याय मिळावा, अशी भूमिका विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.

कल्याण-मोहने परिसरात मध्यरात्री गोळीबार !!

कल्याण-मोहने परिसरात मध्यरात्री गोळीबार !!

तीन आरोपी अटकेत

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने-अटाळी परिसरातील पाटील नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक उर्फ अभी पवार आणि त्याचे काही साथीदार पाटील नगर परिसरातून जात असताना मोनू फुलोरे यांच्यात जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर मोनू फुलोरे यांच्या दिशेने दोन राऊंड फायरिंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

गोळीबारानंतर घाबरलेल्या मोनू फुलोरे यांनी तात्काळ खडकपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या फुलोरे यांच्या म्हणण्यानुसार, अभि पवार यांनी आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी  स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. 

प्राथमिक तपासात व्हॉट्सॲप स्टेटसवरून सुरू झालेला वाद आणि पूर्वीचे मतभेद हे या घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आंधळे करीत असून गोळीबारामागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे.

या घटनेमुळे मोहने-अटाळी परिसरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Friday, 5 June 2026

अतिभार व अवैध मालवाहतुकीविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम !

अतिभार व अवैध मालवाहतुकीविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम !

मुंबई, दि. ४ जून २०२६ : राज्यातील रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार (ओव्हरलोड) व इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश देत सांगितले आहे की, अतिभार वाहतुकीबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अशा वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. ६ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीत विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली असून दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

तपासणीसाठी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या पथकांना संबंधित कार्यालयांनी ई-चलन मशीन, वाहन तपासणीसाठी आवश्यक साधने तसेच वाहन व चालक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कारवाईचा सविस्तर अहवाल २२ जून २०२६ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावा लागणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील अतिभार व अवैध मालवाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा या विशेष मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशन वादावर खासदार शिंदे आक्रमक; विशेष चौकशी समितीची मागणी !

कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशन वादावर खासदार शिंदे आक्रमक; विशेष चौकशी समितीची मागणी !

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या जागेचा वाद चिघळत असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फाऊंडेशनच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर खासदार शिंदे यांनी या प्रकरणाची विशेष समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

खासदार शिंदे यांनी आपल्या निवेदनात १० प्रमुख मागण्या केल्या आहेत:

१. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (ST) स्थापन करावी.  
२. बुद्धभूमी फाऊंडेशन आणि विवादित जमिनीचा सातबारा व नावनोंदणीबाबत उचित तपासणी करून कार्यवाही करावी.  
३. जमिनीसंदर्भात दिलेल्या हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) बाबत समिती गठीत करून तपासून कायदेशीर कारवाई करावी.  
४. उड्डाणपुलाच्या अलाइनमेंटबद्दल पुनर्निरीक्षण करून फाऊंडेशनची मागणी तपासावी.  
५. येथे विपश्यना केंद्र, शैक्षणिक केंद्र किंवा समाजोपयोगी रुग्णालय, शाळेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याबत तपासून कार्यवाही करावी.  
६. जमिनीचे आरक्षण बदलण्याबत तपासून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.  
७. उड्डाणपुलाच्या नावाबत फाऊंडेशनची मागणी तपासून शासनास प्रस्ताव सादर करावा.  
८. संरक्षण भिंत आणि पोहोच रस्ता बांधण्याबत फाऊंडेशनच्या मागणीची तपासणी करून कार्यवाही करावी.  
९. जमीन भूसंपादन आणि नुकसान भरपाईबाबत जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करून कार्यवाही करावी.  
१०. ३० मे रोजीच्या कारवाईदरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य झाले असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.

बुद्धभूमी फाऊंडेशनच्या मागण्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने खासदार शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रकरणाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

ठाण्यात जिल्हा परिषदेत अचानक पाहणी : अधिकाऱ्यांना नोटीस !!

ठाण्यात जिल्हा परिषदेत अचानक पाहणी : अधिकाऱ्यांना नोटीस !!

*ठाणे, दि. 5 जून 2026*

जिल्हा परिषदेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी आज ठाणे जिल्हा परिषद कार्यालयाला अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

या पाहणीत गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे नोंदवून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. उपस्थिती नोंदवहीची तपासणी करताना गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रणजित यादव यांनी सांगितले की, नागरिकांना वेळेवर सेवा देणे हे जिल्हा परिषदेचे कर्तव्य आहे. कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यापुढेही अशा अचानक तपासण्या सुरू राहतील.

Thursday, 4 June 2026

आ. रोहित पवार यांनी दिली करंजा बंदराला भेट ; मच्छिमार बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या !

आ. रोहित पवार यांनी दिली करंजा बंदराला भेट ; मच्छिमार बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या !

** समस्या सोडविण्याचे रोहित पवार यांचे आश्वासन.

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे )
दिनांक ३/६/२०२६ रोजी आमदार रोहित दादा पवार यांनी उरण तालुक्यातील करंजा गावाला भेट देऊन करंजा येथील प्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी मातेच्या मंदीराला भेट देऊन दर्शन घेतले. आणि द्रोणागिरी मंदाराला मिळालेला पर्यटनाचा दर्जा बाबत तसेच मंदीर परीसर शुशोभिकरणा बाबत ग्रामस्थांकडून सविस्तर माहीती घेतली. मच्छीमार समाजाचे तसेच शेतकरी वर्गाचे प्रश्न  समजुन घेतले. मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्सा बाबत करंजा मच्छीमार सोसायटी च्या कार्यालयाला भेट देऊन डिझेल कोटा, डिझेल परतावा, करंजा बंदरात मच्छीमारांना भेडसवणाऱ्या विविध समस्या ,मच्छीमारांच्या गावठान विस्ताराचा प्रश्न, मच्छीमारांची व्यापारी वर्गा कडून होणारी फसवणूक, शासना कडून नव्यानेचं मिळालेला शेतकरी दर्जा परंतु आत्ता पर्यंत मच्छीमार समाजाला याचा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही  या बाबत तसेच विवीध समस्स्यां बाबत सविस्तर माहीती घेतली. नव्यानेच सुरू असलेल्या करंजा रेवस पुलाची बोटीतुन पहाणी केली  या पुलाच्या कामामुळे बाधीत मच्छीमार आणी शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या नुकसान भरपाई बाबतीत तसेच या पुलाच्या कामामुळे होणाऱ्या अन्याया बाबतीत ग्रामस्थांसोबत चर्चा केली.

 या सर्व समस्या बाबत आणि करंजा पोर्ट बाबत येणाऱ्या पावसाळी आधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याबाबत आणि या सर्व प्रश्नाना मार्गी लावण्याबाबत मच्छीमार तसेच शेतकरी वर्गाला आश्वासित केले. या दौऱ्याचे आयोजन उरण नगपालिकेच्या नगराध्यक्षा  भावना ताई घाणेकर यांनी यांनी केले.या वेळी  सिताराम नाखवा,  मार्तंड नाखवा, के एल कोळी,   रमेश भगत, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयेंद्र नाखवा  नरेश कोळी, उरण नगरपालिकेचे राट्रवादी पक्षाचे सर्व  नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते  सचिन रमेश डाऊर, कल्पेश थळी, मधुकर थळी, कॉंग्रेस नेते भालचंद्र घरत. मनोहर थळी, शैलेश डाऊर, देवदास थळी, मुकेश थळी , परेश म्हात्रे आणि मोठ्या संखेने करंजा ग्रामस्थ उपस्थित होते.

पनवेल जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतूक मुळे होत आहेत अपघात !!

पनवेल जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतूक मुळे होत आहेत अपघात !!

विरुद्ध दिशेने वाहने न सोडण्याची सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांची मागणी.

त्वरित कारवाई न केल्यास अजित म्हात्रे यांचा आंदोलनाचा इशारा.

उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )
पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात वैष्णो लॉजिस्टिक या आस्थापने अंतर्गत चालणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बेकायदेशीर वाहतुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच विरुद्ध दिशेने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. परिसरातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा विशेष त्रास होत आहे.तरी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वैष्णो लॉजिस्टिक अंतर्गत चालणाऱ्या अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे. त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा अजित म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.

आज पर्यंत उरण मध्ये बेकायदेशीर व अवैध वाहतूक मुळे अनेक जणांचे विनाकारण मृत्यू झाले आहे. तर काही ठिकाणी अपघात होऊन महत्वाचे हात पाय कायमचे निकामी झाले आहेत. अपघातामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे गोर गरीब जनतेची, नागरिकांची मागणी व त्यांच्या समस्या लक्षात घेता पर्यावरणवादी तथा सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी सदर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर समस्या त्वरित सुटली नाही तर नागरिकांचा मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच यावर त्वरित कारवाई करण्याची व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आह

"अपघात होण्यापूर्वी जागे व्हा! खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा"

"अपघात होण्यापूर्वी जागे व्हा! खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा"

खोपटे-कोप्रोली काँक्रेट रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थ मंडळ खोपटे यांची मागणी


उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील खोपटे-कोप्रोली या नव्याने काँक्रेटीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी या मार्गावर तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उरण-खोपटा हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग मानला जातो. रस्त्यालगत अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. नुकतेच रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे याच मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण प्रवास करत असतात. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने यापूर्वी किरकोळ अपघात घडले असून भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थ मंडळाने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात कारवान गोडाऊन जवळ,धसाखोशी /द.पी. पाडा बस स्टॅन्ड, म्हात्रेपाडा बस स्टॅन्ड,आणि विरगो बस स्टॅन्ड. या ठिकाणी तातडीने गतिरोधक व वाहतूक सूचना फलक उभारण्याची मागणी केली आहे.

यावेळी ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव  कुमार ठाकूर, धसाखोशी अध्यक्ष कमलाकर म्हात्रे तसेच ग्रामस्थ मंडळाचे सल्लागार  कल्पेश ठाकूर (गुरुजी) उपस्थित होते.

"रस्त्यांचा विकास स्वागतार्ह आहे; मात्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा निष्पाप जीव गमावण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांना संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे

चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा..

चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा..

मुरबाड (प्रतिनिधी) : कामगार चळवळ, पत्रकारिता आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार तथा कामगार नेते मंगल दादा डोंगरे यांनी तब्बल ३९ वर्षे ९ महिने आणि १७ दिवसांच्या सेवेनंतर ३१ मे रोजी सेवेतून निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त मुरबाड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

मुरबाड तालुक्यातील गोरख मचिंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेल्या "खोपीवली"या  गावी,, ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रवास सुरू करणाऱ्या मंगल डोंगरे यांनी १३ ऑगस्ट १९८७ रोजी मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील ब्लास्ट कार्बो ब्लॉक्स प्रा. लि. कंपनीत नोकरीला सुरुवात केली. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी पत्रकारिता, कामगार चळवळ आणि समाजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

कामगारांच्या न्यायहक्कांसाठी लढा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, गोरगरिबांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत नेणे, तसेच सामाजिक अडचणींमध्ये मदतीचा हात देणे ही त्यांची कार्यशैली राहिली. कोरोना काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक गरजूंना मदत केली.

पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया, पत्रकार सुरक्षा समिती, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ यांसारख्या संघटनांमध्ये विविध पदांवर काम करत शेकडो पत्रकारांना संघटित केले. तर कामगार क्षेत्रात महाराष्ट्र मजदूर संघासह विविध संघटनांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळली.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आदर्श पत्रकार, समाजभूषण, समाजरत्न यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तर शिर्डी येथे तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार, तसेच पंढरपूर येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या सहा जिल्हाध्यक्ष मध्ये कोकण मुंबई विभागातून उत्कृष्ट जिल्हा अध्यक्ष म्हणून राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याला राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला.

सेवापूर्ती निमित्त कंपनीत आयोजित सत्कारानंतर मित्रपरिवार, नातेवाईक,सहकारी, पत्रकार, आणि सामाजिक कार्यकर्ते व कुटुंबीयांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून त्यांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत, समाजसेवेची त्यांची वाटचाल अशीच अविरत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

"नोकरीतून निवृत्ती झाली असली तरी समाजसेवेच्या प्रवासातून नाही," अशा शब्दांत उपस्थितांनी मंगल डोंगरे यांच्या कार्याचा गौरव केला.

कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू ; विविध योजनांसह 50 कोटींचा निधी मंजूर !!

कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू ; विविध योजनांसह 50 कोटींचा निधी मंजूर !!

नवी मुंबई दि. ०३, :- ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा आणि सन्मानाचा घालवता यावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय कोकण भवन येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक यांनी दिली आहे. 

या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे सामाजिक जीवन सुसह्य करणे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राखणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांना हक्काचे विमा संरक्षण आणि वैद्यकीय मदत मिळवून देणे शक्य होणार आहे. याशिवाय वृद्धापकाळात होणारी छळवणूक, जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण आणि निवारा यांसारख्या अत्यंत संवेदनशील बाबींवरही हे महामंडळ विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१११/महामंडळे, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ अन्वये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी या स्वतंत्र महामंडळाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता नवी मुंबईतील सी.बी.डी. बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमधील ६ व्या मजल्यावर, रूम नंबर ६१९ मधील प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण (मुंबई विभाग) यांच्या कार्यालयात हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांच्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.

या महामंडळाच्या सुचारू कामकाजासाठी शासनाकडून ५० कोटी रुपयांचे भरीव भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. कोकण भवन येथील या कार्यालयाशी ज्येष्ठ नागरिकांना थेट संपर्क साधता यावा, यासाठी ०२२-२७५७५९७९ हा अधिकृत दूरध्वनी क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अडचणींसाठी व शासकीय योजनांच्या लाभासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

म्यानमारचे राष्ट्रपती जेएनपीएच्या दौऱ्यावर !

म्यानमारचे राष्ट्रपती जेएनपीएच्या दौऱ्यावर !

** बंदराच्या पायाभूत सुविधांची आणि भावी विस्तार योजनांची घेतली माहिती.

उरण ३, (विठ्ठल ममताबादे) : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे मंगळवार, २ जून २०२६ रोजी म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम  मिन आंग ह्लाइंग यांच्या भेटीचा सन्मान लाभला. या भेटीदरम्यान महामहिम राष्ट्रपती यांच्यासमवेत ६७ सदस्यीय अधिकृत शिष्टमंडळ उपस्थित होते.जेएनपीएमध्ये आगमनानंतर, म्यानमारच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, भा. प्र. से. आणि जेएनपीएच्या विभागप्रमुखांनी उत्साहपूर्ण व आदरपूर्वक स्वागत केले.

भेटीदरम्यान शिष्टमंडळाला जेएनपीएच्या बंदर पायाभूत सुविधा, कार्यक्षमता, क्षमता विस्तार उपक्रम, धोरणात्मक विकास प्रकल्प, शाश्वतता उपाययोजना तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक म्हणून विकसित होत असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाची माहितीही देण्यात आली. हा प्रकल्प प्रादेशिक सागरी व्यापार वृद्धीस चालना देणारा आणि देशाच्या सागरी क्षेत्रातील महत्त्वाचा विकास टप्पा मानला जात आहे.

यावेळी महामहिम राष्ट्रपती यांनी जेएनपीएने भारतातील क्रमांक एकचे बंदर म्हणून मिळवलेले स्थान हे त्याच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचे आणि सक्षम सेवा क्षमतेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. त्यांनी आपल्या देशातही बंदर विकास उपक्रमांना गती देण्याची इच्छा व्यक्त केली तसेच बंदर क्षेत्राविषयी अधिक माहिती जाणून घेणे, जेएनपीएच्या अनुभवातून शिकणे आणि ज्ञानविनिमय व परस्पर सहकार्याच्या संधींचा आढावा घेणे याबाबत शिष्टमंडळाची विशेष उत्सुकता असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, भा. प्र. से. म्हणाले, “म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम  मिन आंग ह्लाइंग आणि त्यांच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएमध्ये स्वागत करण्याचा आम्हाला सन्मान लाभला. या भेटीमुळे भारताच्या सागरी क्षेत्रातील क्षमता, जेएनपीएची उत्कृष्ट कार्यक्षमता तसेच वाढवण बंदर प्रकल्पासह भविष्योन्मुख विकास उपक्रम सादर करण्याची एक उत्तम संधी मिळाली. भारत आणि म्यानमार यांच्यातील सागरी व व्यापारविषयक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी तसेच प्रादेशिक संपर्क, आर्थिक विकास आणि परस्पर प्रगतीस चालना देणाऱ्या नव्या सहकार्याच्या शक्यतांचा वेध घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

यावेळी शिष्टमंडळाने बंदर परिसराला भेट देऊन बंदराची कार्यक्षम कामकाज पद्धती, माल हाताळणी प्रक्रिया तसेच एकात्मिक लॉजिस्टिक्स परिसंस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीद्वारे जेएनपीएच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यामधील त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली.
व्यापार, संपर्कक्षमता आणि शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी व्यापक इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सहकार्य आणि प्रादेशिक भागीदारीची भूमिका अधिक बळकट होत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.

उरणच्या ८ खेळाडूंची गरुडझेप ; महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड !

उरणच्या ८ खेळाडूंची गरुडझेप ; महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड !

** राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे प्रतिनिधित्व

उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : औद्योगिक आणि किनारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्याच्या क्रीडा इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे. उरणमधील तब्बल आठ खेळाडूंनी महाराष्ट्र आईस हॉकी संघात स्थान मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून, ते उत्तराखंडमधील देहरादून येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
आईस हॉकीसारख्या प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या आणि विशेष कौशल्याची गरज असणाऱ्या खेळात उरणसारख्या किनारपट्टीच्या भागातून खेळाडू तयार होणे ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब मानली जात आहे. 

१२ वर्षांखालील गट: वरदा आसरकर, शिवांश तांडेल १५ वर्षांखालील गट: अर्थ सावंत, रुद्र घरत, रेवा पाटील. १८ वर्षांखालील गट: सुरज करण.सीनियर गर्ल्स गट: स्नेहा शेळके, शर्वणी या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

या खेळाडूंच्या यशामागे 'श्री स्केटिंग अकॅडमी'चे संस्थापक व प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी घेतलेले अपार परिश्रम, सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन आणि खेळाडूंमध्ये निर्माण केलेली जिद्द यामुळेच उरणच्या खेळाडूंनी ही गरुडझेप घेतली आहे. बर्फावर खेळल्या जाणाऱ्या या अत्यंत वेगवान आणि रोमांचक खेळात शारीरिक तंदुरुस्ती, विवेक संतुलन आणि चपळ निर्णयक्षमतेची गरज असते. महाराष्ट्रात स्केटिंगच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार वेगाने वाढत आहे.
या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे  प्रतिनिधी प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करावी आणि उरणच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरावा अशी अपेक्षा आणि विश्वस्ताने क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे .सद्यस्थितीत सर्व खेळाडूंवर सर्वच क्षेत्रातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !!

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !!

** मात्र मुख्य रेती चोरांना अभय, कारवाई नाही 

केवणी रेती बंदर येथे कारवाई करताना महसूल अधिकारी व ग्रामीण पोलीस प्रशासन

*भिवंडी, दि. 4 जून 2026, (अरुण पाटील) :

हा"सरळ बातमीदार"च्या "बातमीदार माझा" या अधिकृत पोर्टलवर 1 जून 2026 रोजी केवणी रेती बंदर येथे सुरू असलेल्या अवैध रेती चोरी व वाहतुकीबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर महसूल विभागाने आज केवणी व काल्हेर रेती बंदर येथील अवैध रेती साठ्यांवर मोठी कारवाई केली. मात्र मुख्य रेती चोर व वाहतूकदारांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

*23 अवैध कुंड्या नष्ट*  
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील व उपविभागीय अधिकारी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार अभिजित खोले यांच्या आदेशाने महसूल विभाग भिवंडी व भिवंडी तालुका पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई केली. मौजे केवणी रेती बंदर व काल्हेर रेती बंदर येथील राखीव वन व गुरूचरण क्षेत्रात खाडीमधून अनधिकृतपणे उपसा करून साठवलेल्या रेतीच्या कुंड्यांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

या कारवाईत मौजे केवणी रेती बंदर येथील सर्वे क्रमांक 181/अ, क्षेत्र 22.33.39 हेक्टर आर चौ.मी व सर्वे क्रमांक 181/ब, क्षेत्र 08.03.61 हेक्टर आर चौ.मी तसेच मौजे काल्हेर येथील सर्वे क्रमांक 114, क्षेत्र 03.32.85 हेक्टर आर चौ.मी या ठिकाणी उभारलेल्या एकूण 23 अवैध रेती साठवणूक कुंड्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या. केवणी येथील 15 व काल्हेर येथील 8 कुंड्यांचा समावेश आहे. या कुंड्यांचा वापर खाडीमधून चोरी करून आणलेली रेती साठवण्यासाठी केला जात असल्याचे महसूल विभागाच्या पाहणीत आढळले. 

*रात्रीच खेळ चाले*
तसेच स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार केवणी रेती बंदर येथे रोज रात्री ८ वा.ते १० वाजे दरम्यान बार्ज व सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर उत्खनन केलेली रेती या किनाऱ्यावर खाली केली जाते व त्याच दरम्यान ती त्या ठिकाणावरून जेसीबी यंत्राने विविध डंपर मध्ये भरून पहाटे पर्यंत चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते.

*रातोरात रेती गायब*  
3 जून 2026 च्या रात्री केवणी रेती बंदर येथे जवळपास 800 ते 1000 ब्रास रेती साठवून ठेवली होती. मात्र 4 जून रोजी महसूल प्रशासन छापा टाकणार असल्याची गुप्त माहिती रेती चोर व वाहतूकदारांना मिळाल्याने त्यांनी ती साठवलेली रेती रातोरात उचलून नेली. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबत "बातमी गळती" करणाऱ्या व्यक्तीला शोधून त्याच्यावर पहिली कारवाई करावी, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

*माफियांच्या साखळीला धक्का*  
या कारवाईमुळे अवैध रेती चोर व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या साखळीला मोठा धक्का बसला असून रेती माफियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने यापूर्वीही भिवंडी तालुक्यात अवैध रेती उत्खन, वाहतूक व साठवणुकीविरोधात वारंवार कारवाया करून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र गुन्हे मुख्य आरोपींविरोधात न करता बार्ज व सक्शन पंपावर काम करणाऱ्या गरीब मजुरांवरच दाखल केले जात असल्याचा आरोप होत आहे.

*कारवाईत सहभागी यंत्रणा*  
या कारवाईत मंडळ अधिकारी खारबाव, मंडळ अधिकारी भिवंडी, मंडळ अधिकारी आनगाव, मंडळ अधिकारी राहूर यांच्यासह त्यांच्या अधीनस्थ सर्व ग्राम महसूल अधिकारी, कांदळवन संधारण घटक ठाणे, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, भिवंडी ग्रामीण पोलीस व नारपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती भिवंडीचे अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

महसूल विभागाच्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. अवैध रेती उत्खन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांना प्रशासनाने कठोर इशारा दिला असून शासनाच्या आदेशानुसार अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात भविष्यातही अधिक तीव्र व सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Wednesday, 3 June 2026

"जेएनपीटी पोर्ट रोडवर प्रशासनाचा निष्काळजीपणा !!

"जेएनपीटी पोर्ट रोडवर प्रशासनाचा निष्काळजीपणा !!

** ऑईल टँकर पलटी, हजारो लिटर तेलाची नासाडी; 'मृत्यूच्या सापळ्या'कडे प्रशासनाचे दुर्लक्ष?"

उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात जेएनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. पियूपी बिल्डिंग परिसरात आज सकाळी १०:४० वाजता तेलाने भरलेला एक ऑईल टँकर अचानक पलटी झाल्याने हजारो लिटर तेल रस्त्यावर सांडले. या अपघातामुळे पोर्टची वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर रस्ता निसरडा होऊन दुसऱ्या मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.

उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आज सकाळी तेलाने भरलेला टँकर पलटी झाला. घटनास्थळाजवळच इंडियन कस्टमचे कार्यालय असल्याने आणि हा मार्ग पोर्टसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हजारो लिटर तेल रस्त्यावर सांडल्याने रस्ता पूर्णपणे निसरडा झाला आणि आणखी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रित केली, मात्र तोपर्यंत मोठे आर्थिक व पर्यावरणीय नुकसान झाले होते.


स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित विभागांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेएनपीटी पोर्ट रोडवर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. अवजड वाहनांची बेसुमार वर्दळ, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी आणि वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप नागरिकांनी केला. प्रत्येक वेळी अपघात झाल्यावर केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. एखाद्या दिवशी मोठी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा रस्ता आता 'मृत्यूचा सापळा' बनला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.


या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हजारो लिटर तेल वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून तेल रस्त्यावर व गटारात मिसळल्याने पर्यावरणीय धोकाही निर्माण झाला आहे. तेलामुळे रस्ता निसरडा झाल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. नागरिकांनी या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. अवजड वाहनांवर कडक नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, वेगमर्यादा पाळण्यास भाग पाडणे आणि अपघातप्रवण ठिकाणांची तपासणी करून गतिरोधक, सूचना फलक यांसारख्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ अपघात झाल्यावर घटनास्थळी धाव घेणारे प्रशासन अपघात रोखण्यासाठी ठोस पावले कधी उचलणार, असा प्रश्न आता उरणकर विचारत आहेत. संबंधित विभागांनी वेळीच दखल न घेतल्यास यापेक्षाही मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे

वसई विरार शहरातील सार्वजनिक ठिकाणी लवकरच मोफत वायफाय सुविधा व नालासोपारा ते तहसिलदार बससेवा सुरू करण्याची मागणी मान्य !!

वसई विरार शहरातील सार्वजनिक ठिकाणी लवकरच मोफत वायफाय सुविधा व नालासोपारा ते तहसिलदार बससेवा सुरू करण्याची मागणी मान्य !!

*बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांची महापौर अजीव पाटील साहेबांकडे मागणी...*

नालासोपारा ता, ३ :- लोकनेते आमदार हितेंद्र ठाकुर साहेब, युवा आमदार क्षितीज दादा ठाकुर, उपमहापौर मार्शल लोपीस साहेब व जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधु) यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील साहेब यांची भेट घेऊन नागरिकांच्या विविध महत्त्वाच्या समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.

या भेटीदरम्यान वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, बस स्थानके, सार्वजनिक उद्याने तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा लाभ होईल. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवासादरम्यान तसेच विविध शासकीय कामे ऑनलाइन पद्धतीने सुलभपणे पूर्ण करता येतील यासंदर्भात महापौर साहेबांनी मागणी मान्य करत लवकरच काम पूर्णत्वास होईल असे आश्वासन देण्यात आले.

तसेच नालासोपारा बस डेपोपासून वसई तहसीलदार कार्यालयापर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याबाबत पूर्वी करण्यात आलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. ही बस सेवा सुरू झाल्यास नालासोपारा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

याशिवाय सोपारा गावातील जामा मस्जिद परिसरातील अरुंद नाल्याची रुंदी वाढवून त्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणीही करण्यात आली. पावसाळ्यात या परिसरात पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये तसेच मशिदीत पाणी शिरण्याची समस्या निर्माण होते. नाल्याची रुंदी वाढविल्यास पूरस्थिती टाळण्यास मदत होईल व नागरिकांना दिलासा मिळेल.

या तीनही महत्त्वाच्या विषयांवर महापौरांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नागरिकांच्या हितासाठी हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी रूचिता नाईक, दानिश करारी, महेश निकम, जया गुप्ता उपस्थित होते.

📢 बांधकाम कामगारांच्या नोंदणी व योजनांच्या लाभांसाठी कोणतेही शुल्क नाही; दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन !!

📢 बांधकाम कामगारांच्या नोंदणी व योजनांच्या लाभांसाठी कोणतेही शुल्क नाही; दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन !!

📍 नागपूर, दि. २ जून : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरणासह त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यात येतात. या सर्व सेवा पूर्णपणे निःशुल्क असून कामगारांनी कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेमार्फत कामे करू नयेत, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

📝 कामगार विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नोंदणी, नूतनीकरण व लाभासाठीचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यांमार्फत व नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत त्यावर कार्यवाही करून अर्ज निकाली काढले जातात. अर्ज मंजूर अथवा नामंजूर झाल्याची माहिती संबंधित कामगारास एसएमएसद्वारे कळविण्यात येते. बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 💳

💻 सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने त्यासाठी कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेची आवश्यकता नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन कामांसाठी कोणी पैसे, कमिशन किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निःशुल्क क्रमांक १०६४ अथवा दूरध्वनी क्रमांकावर तसेच 📧

[acbwebmail@mahapolice.gov.in]

(mailto:acbwebmail@mahapolice.gov.in) 

यावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील सूचना मंडळाच्या प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्र आणि तालुका कामगार सुविधा केंद्र येथे लावण्यात आल्या आहेत.

👷 बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या कामगारांनीच नोंदणी करावी. तसेच नियोक्ता किंवा ठेकेदारांनी संबंधित कामगार त्यांच्या येथे कार्यरत असल्याचे आणि त्यांनी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्यावे. याशिवाय ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अथवा महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी पात्र बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करावे, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा "अनोखा सलाम !”

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा "अनोखा सलाम !”

** डॉ. पराग मसराम यांच्या संवेदनशील कृतीने जिंकली कर्मचाऱ्यांची मने; सेवेला दिला कृतज्ञतेचा अनोखा सन्मान

शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असताना अधिकार, जबाबदारी आणि प्रशासकीय कौशल्य यांना महत्त्व असतेच; परंतु त्या पदासोबत माणुसकी, संवेदनशीलता आणि सहकाऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना जपणारे अधिकारी समाजात वेगळा आदर्श निर्माण करतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच जळगाव येथे घडली आणि उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील माननीय सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांच्या कार्यालयातील प्रशासकीय वाहन चालक श्री. रवींद्र दौलतराव पवार यांनी दिनांक १ जून २०२६ रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्ती स्वीकारली. अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्याला कार्यालयामार्फत भावपूर्ण निरोप देण्यात आला. सहकारी, अधिकारी आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत झालेला हा समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.

मात्र या कार्यक्रमानंतर घडलेली घटना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. सहसंचालक कार्यालयाचे प्रमुख डॉ. पराग मसराम यांनी पदाचा मोठेपणा बाजूला ठेवत आपल्या सेवापूर्ती झालेल्या वाहन चालकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग निवडला. अनेक वर्षे आपल्या कार्यालयासाठी वाहन चालवणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सेवेला मानवंदना देण्यासाठी त्यांनी स्वतः प्रशासकीय वाहनाचे स्टेअरिंग हाती घेतले आणि श्री. पवार तसेच त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या निवासस्थानी सुखरूप पोहोचविले.

ही केवळ एक औपचारिक कृती नव्हती; ती होती सहकाऱ्याविषयीच्या आदराची, जिव्हाळ्याची आणि कृतज्ञतेची प्रांजळ अभिव्यक्ती. त्या क्षणी ते केवळ वरिष्ठ अधिकारी नव्हते, तर आपल्या सहकाऱ्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार असलेले एक संवेदनशील माणूस होते.

विशेष म्हणजे, असाच प्रेरणादायी आदर्श यापूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेश्वरी यांनीही घालून दिला होता. आपल्या वाहन चालकाच्या सेवापूर्तीप्रसंगी त्यांनी स्वतः वाहन चालवत त्या कर्मचाऱ्याला व त्यांच्या कुटुंबीयांना घरी पोहोचवून मानवी नात्यांचा सन्मान जपला होता. पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यापलीकडे जाऊन सहकाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्याची ही भावना खऱ्या नेतृत्वाचे दर्शन घडवणारी आहे.

आजच्या स्पर्धात्मक आणि यांत्रिक होत चाललेल्या काळात अशा घटना समाजाला सकारात्मक संदेश देतात. नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करणे होय. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील परस्पर आदर, विश्वास आणि आत्मीयता यामुळेच कोणतीही संस्था अधिक सक्षम आणि यशस्वी बनते.

अशा कृतींमधून प्रशासनातील मानवी चेहरा समाजासमोर येतो. पदाचा अधिकार क्षणिक असतो; परंतु माणुसकीतून केलेली कृती कायम स्मरणात राहते. त्यामुळेच समाज अशा अधिकाऱ्यांकडे केवळ प्रशासकीय प्रमुख म्हणून नव्हे, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतो.

खरोखरच, पद मोठे असणे महत्त्वाचे नाही; तर त्या पदाला माणुसकीची उंची प्राप्त करून देणे अधिक महत्त्वाचे असते.

अधिकारी असावा तर असाच…!

शब्दांकन : सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे

मोहने अटाळी परिसरात तीव्र पाणीटंचाई !!

मोहने अटाळी परिसरात तीव्र पाणीटंचाई !!

कल्याण (संदीप शेंडगे) : मोहने- अटाळी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची गरज अधिक असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मोहने शहराध्यक्ष हरिश्चंद्र पाटील यांनी प्रशासनाला इशारा देत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. पाणीटंचाईचा प्रश्न त्वरित निकाली न काढल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे 

"पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाने नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. तात्काळ उपाययोजना करून आयुक्तांनी या गंभीर समस्या कडे विशेष लक्ष देऊन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना नियमित पाणीपुरवठा सुरू करावा याकरिता सूचना कराव्यात तसेच मोहन आटाळी परिसरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन उभारले जाईल," असे हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. मोहने- अटाळी परिसरातील वाढत्या पाणी संकटामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !! डोंबिवली, संदीप शेंडगे : महसूल आणि उद्योग विभागाच्या ...