जिल्ह्यात २५ जून ते १ जुलै कृषि संजीवनी मोहिम राबविणार 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'निमित्त उपक्रम !
बुलडाणा, दि. २३ बातमीदार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत २५ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत कृषि संजीवनी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सांगता १ जुलै २०२२ रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा कालावधी खरीप पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत मोहिमेद्वारे कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि मित्र तसेच प्रगतशील शेतकरी शेतकऱ्यांचे बांधावर जावून नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत २५ जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण दिन, २६ जून रोजी पौष्टीक तृणधान्य दिन, २७ जून रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, २८ जून रोजी खत बचत दिन, २९ जून रोजी प्रगतीशील शेतकरी संवाद दिन, ३० जून रोजी शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस व १ जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येणार आहे. तरी सदर कृषि संजीवनी मोहिमेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment