ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांची महत्त्वाच्या विषयांवर चर्चा !!
*कल्याण डोंबिवलीकरांसाठी स्वतंत्र धरणाची मागणी - कुशिवली धरण आरक्षित करा*
कल्याण, सचिन बुटाला : गेल्या दशकभरात कल्याण आणि डोंबिवली शहरांचा अतिशय वेगाने नागरी विस्तार झाला. अनेक मोठमोठाली गृहसंकुलं किंबहुना एक प्रकारची नवी शहरेच या दोन्ही शहरांच्या वेशीवरील मोकळ्या जागांवर उभी राहिली. मुंबई, ठाण्यापेक्षा स्वस्त दरांमध्ये सुसज्ज आणि सुविधायुक्त अशी घरे उपलब्ध झाल्याने हजारांच्या संख्येमध्ये त्यांची विक्रीही झाली. परंतू त्याचा सर्व भार आता मूलभूत सोयी सुविधांवर येऊ लागला असून कल्याण डोंबिवलीतील बऱ्याचशा नव्या गृहसंकुलांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वतंत्र धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्या संबंधी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवली नागरिकांसाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी केली. त्यांच्या या मागणीला ठाणे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि केडीएमसीला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
येत्या काळात ही पाणी समस्या अतिशय उग्र रूप धारण करेल याचा विचार करून मुख्यमंत्री सन्मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली. अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली धरण कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित करावे किंवा या धरणातील पाण्याचा वाढीव कोटा केडीएमसीला देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री महोदयांनी कोणताही समय न दवडता ठाणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देत जिल्हा आणि केडीएमसी प्रशासनाची एक संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले. गेल्या मंगळवारी संपन्न झालेल्या या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कुशिवलि धरणाच्या पाणी साठ्याबाबत जलसंपदा विभागाला तर पुढील तीस वर्षातील केडीएमसीची संभावित लोकसंख्या आणि पाण्याची गरज यासंदर्भात कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
No comments:
Post a Comment