Wednesday, 25 March 2026

कवी सखाराम डाखोरे यांच्या ‘हूलबिगूल’ला राज्यस्तरीय सन्मान !!

कवी सखाराम डाखोरे यांच्या ‘हूलबिगूल’ला राज्यस्तरीय सन्मान !!

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

वसई येथील कवी प्रा. सखाराम डाखोरे यांच्या ‘हूलबिगूल’ या कवितासंग्रहाला सन २०२६ साठी नारायण स्मृती प्रतिष्ठान, वर्धा यांचा ‘मारोतराव नारायणे स्मृती उत्कृष्ट राज्यस्तरीय कवितासंग्रह पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी बुधवारी दिनांक २५ मार्च २०२६ रोजी या पुरस्काराची घोषणा केली.
या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम यांचा समावेश असून, पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी वर्धा येथील  बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

‘हूलबिगूल’ हा कवितासंग्रह सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे तर्फे १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला होता. या संग्रहाला सुप्रसिद्ध विचारवंत प्रभू राजगडकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून, सरदार जाधव यांनी आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रकाशक गीतेश शिंदे यांनीही संग्रहाच्या प्रकाशनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

या संग्रहातील कविता आदिवासी समाजाच्या जीवनानुभवांना अभिव्यक्त करताना बहुजन समाज आणि विविध सामाजिक चळवळींच्या सद्यस्थितीवरही प्रभावी भाष्य करतात. ‘हूल’ म्हणजे विद्रोह, तर ‘बिगूल’ हे युद्धाच्या प्रारंभी वाजविले जाणारे रणवाद्य; या अर्थच्छटांमधून अन्याय, अत्याचार आणि जुलूमाविरुद्ध उभारलेल्या संघर्षाचा आणि मानवतेच्या उभारणीचा संदेश सूचित होतो.

                 कवी प्रा. सखाराम डाखोरे

प्रा. सखाराम डाखोरे हे वसई येथील अण्णासाहेब वर्तक पदवी महाविद्यालयात मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य आहेत. त्यांच्या कवितासंग्रहाला प्राप्त झालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल साहित्यवर्तुळातून तसेच शैक्षणिक क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment