“तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे”, “भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात”, “कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं” पर्यंतचा सिने- गीतकार सागर पवार यांचा प्रेरणादायी प्रवास !!
अनेक गाणी आपल्या नेहमी ओठांवर असतात. आपण ती ऐकतो, गुणगुणतो; परंतु अशा असंख्य गाण्यांच्या गीतकाराचा शोध घेताना माझ्या हाताशी एक नाव लागलं, ते म्हणजे कवी सागर पवार.
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, सांस्कृतिक चळवळ अधिक बळकट करण्यासाठी कवींनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गाण्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्याचे काम अनेक कलाकारांनी केले. त्यातील एक नाव म्हणजे ज्येष्ठ कवी सागर पवार.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे सागर पवार यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना लिखाणाची आवड होती. ही आवड त्यांनी अतिशय मनापासून जोपासली आणि त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक त्यांची लेखणी ठरली.
बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर सागर पवार यांनी आय.टी.आय. हा कोर्स पूर्ण केला. १९८७ मध्ये त्यांना सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरी लागली. १९९० मध्ये भोपाळ येथे त्यांनी नोकरी केली. नंतर १९९४ मध्ये त्यांची कल्याण येथे बदली झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता, म्हणूनच त्यांना लेखनाची आवड निर्माण झाली. १९८८ मध्ये गायक कृष्णा शिंदे यांच्या कॅसेटसाठी त्यांनी पहिले गीत लिहिले. १९९० मध्ये "भीमा तुझी पुण्याई" हा पहिला अल्बम काढून त्यांनी आंबेडकरी चळवळीत आपले स्थान निर्माण केले. "कोहिनूर दलितांचा" हा अल्बम त्यांचा खूप गाजला.
१९९३-९४ मध्ये टी-सीरीज या कॅसेट कंपनीसाठी त्यांनी विविध विषयांवर अनेक गीते लिहिली. २००१ मध्ये "भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात" हे गीत त्यांनी लिहिले आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी ते गायले. हे गाणं पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं आणि डॉ. बाबासाहेबांवरील प्रेम त्यांनी आपल्या गाण्यातून दाखवून दिलं.
हळूहळू सागर पवार यांनी आपल्या लेखणीतून अनेक गीते लिहून महाराष्ट्रभर आपलं नाव गाजवलं. त्यांनी लिहिलेली गीते अजरामर ठरली आणि आज विविध देशांमध्ये गाजत आहेत. त्यातील काही गीते म्हणजे "तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे", "भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात", "तुझ्या पाळण्याने साऱ्या जगाला हलविलं".सध्या भीमजयंतीमध्ये सर्वच ठिकाणी एक गाणं गाजत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी स्वाभिमानाचे दालन खुले केले, हे त्या गाण्यातून दिसून येते. ते गाणं म्हणजे "कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं, दिल्लीचं दालन खुलं व माय, भीमानं केलं". हे गाणं सिने-पार्श्वगायक महानायक आनंद शिंदे यांच्या आवाजात सध्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही वाजवले जात आहे. ही किमया फक्त कवी सागर पवार यांच्या लेखणीची आहे.
अनेक कवींनी आपल्या लेखणीने गाणी साकारली, पण एक असे कवी आहेत की ज्यांनी अकरा हजारांहून अधिक गाणी आपल्या लेखणीतून साकारली आहेत, ते म्हणजे ज्येष्ठ कवी-गीतकार सागर पवार. त्यापैकी ४ हजार गीते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेली आहेत. तर त्यात १०० लोकगीतांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३२ मराठी चित्रपटांमध्ये सागर पवार यांनी गीते लिहिलेली आहेत.
"मला मिळाली धनाची तिजोरी", "कबीराची गोड गाथा", "सोनेरी पर्व संविधान भारताचे", "भीमजी की ललकार", "पिपल की छांव मे", "करिष्मा भीमजी का", "एहसान भीमजी के", "अंबेडकरने भारत संभाल रखा", "निर्माता भीमराव", "अप्रैल निखर आया", "गौतम का वतन चाहिए", "बुद्ध अमृत वाणी", "इतिहास बदल डाला", "चलो बुद्ध की ओर", "चिवर किया धारण", "माता यशोधरा बुद्धं शरणं गच्छामि", "माता रमाई", "युगंधराच्या धर्मांतराने तुफान मे भीमज्योती", "माझे स्वर आंबेडकर", "बोल माणसा बोल कुठे आहे समतोल" अशी असंख्य गाणी सागर पवार यांनी लिहिली आणि ती लोकप्रिय ठरली.
सिने-पार्श्वगायक महागायक आनंद शिंदे यांनी सर्वात जास्त, सरासरी एक हजाराहून अधिक गीतकार सागर पवार यांची भीम-बुद्ध गीते गायली आणि सामाजिक, सांस्कृतिक चळवळीसाठी उल्लेखनीय प्रबोधनात्मक काम केले.
कवी सागर पवार यांनी लिहिलेली गीते मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज पार्श्वगायकांनी गायली. त्यात सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, रवींद्र साठे, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, विठ्ठल उमप, मिलिंद शिंदे, सुषमा देवी, आदर्श शिंदे, सुदेश भोसले, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, अजित कडकडे, शब्बीर कुमार, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, अनुराधा पौडवाल, अनुपमा देशपांडे, साधना सरगम, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, अरुण इंगळे, शकुंतला जाधव, नंदा नांद्रेकर, नेहा राजपाल, माधुरी करमरकर, बेला शेंडे, कविता पौडवाल, संजीवनी भेलांडे, बेला सुलाखे, प्रकाशनाथ पाटणकर, मानवेल गायकवाड, हृदयनाथ सितारकर, नंदू श्रीसुंदर, लताताई श्रीसुंदर, मंगेश सरदार, शायर चेतन उदास, राजू बागुल, राहुल शिंदे, रेश्मा सोनावणे, निशा भगत यांसारख्या नामवंत गायकांचा समावेश आहे.
संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कवी मानवेल गायकवाड यांचे विशेष योगदान त्यांना लाभले. संगीतकार अशोक पत्की, कमलेश जाधव, मधू रेडकर, मिलिंद मोहिते, श्रीरंग आरस, अशोक वायंगणकर अशा दिग्गज संगीतकारांचा त्यांना सहवास लाभला. टी-सीरीज, व्हिनस, सुमीत, फाउंटन, सम्राट म्युझिक, अल्ट्रा, शेमारू, नोकिया म्युझिक, कुणाल म्युझिक अशा विविध कॅसेट कंपन्यांनी सागर पवार यांची गीते प्रकाशित केली. आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, आपल्या लेखणीच्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक गाणी लिहून सांस्कृतिक चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न गीतकार सागर पवार करत आहेत. त्यांनी लिहिलेल्या गाण्यांच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरी विचार घराघरात पोहोचत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवून समाजाचे प्रबोधन कसे होईल, यासाठी विविध गाणी त्यांच्या लेखणीतून जन्म घेत आहेत. "शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या लेखणीने प्रबोधन करणार," असे कवी सागर पवार यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. म्हणून त्यांच्या कार्याला सलाम.
लेखक : मिलिंद सुरेश जाधव
रा. पडघा, भिवंडी. मो. ८६५५५६९४३६
No comments:
Post a Comment