Wednesday, 13 May 2026

द्रोणागिरीच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याने 'स्वागत' ; सिडकोचा स्वच्छतेचा गाजावाजा फक्त कागदावरच ?

द्रोणागिरीच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याने 'स्वागत' ; सिडकोचा स्वच्छतेचा गाजावाजा फक्त कागदावरच ? 

** बाहेरच्या कचऱ्याचा द्रोणागिरीला विळखा

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) :
सिडको प्रशासन एकीकडे 'स्वच्छ शहर' मोहिमेचा गाजावाजा करत असताना, द्रोणागिरी नोडच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे भीषण साम्राज्य पसरले आहे.उरण तालुक्यातील खोपटे रोडकडून द्रोणागिरीकडे येताना रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे या परिसराला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आजूबाजूच्या ग्रामपंचायतींच्या कचरा गाड्याही याच ठिकाणी कचरा आणून टाकत असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

या डम्पिंग ग्राऊंडवर ओला आणि सुका कचरा एकत्रित टाकला जात असल्याने तो कुजून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना नाकावर रुमाल धरल्याशिवाय प्रवास करणे अशक्य झाले आहे. या घाणीमुळे परिसरात गिधाडे, उंदीर आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काही भटके लोक या घाणीतून प्लास्टिक वेचताना दिसतात, ज्यांच्या आरोग्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

केवळ कचराच नाही, तर द्रोणागिरी नोडमध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणे उघडी आहेत. या उघड्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत असून त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रात्रीच्या वेळी हे उघडे ड्रेनेज अपघातांना निमंत्रण देत आहेत.

सध्या सिडकोकडून रस्त्यावरील दुभाजकांना काळ्या-पिवळ्या रंगाने रंगवण्याचे काम सुरू आहे वाहन चालकांना दुभाजक दिसावेत हा हेतू चांगला असला तरी डोळ्यांना दिसणारे रंगापेक्षा नाकाला येणारी दुर्गंधी सिडको प्रशासनाला का जाणवत नाही असे रहिवाशी विचारत आहे.कचरा साठवायच्या आतच त्यांनी विल्हेवाट लावणे गरजेचे असताना प्रशासन केवळ रंग आहे रंगरंगोटी च्या कामात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे. 

पावसाळ्यात उंबरठ्यावर आला आहे जर वेळेत हा कचरा उचलला नाही  आणि ही उघडी  ड्रेनेज चेंबर बंद केली नाही तर पावसाच्या पाण्यात ही घाण कुजून संपूर्ण द्रोणागिरी परिसरात दुर्गंधीयुक्त रोगराई पसरण्याची भीती आहे सिडकोणी तात्काळ याकडे लक्ष देऊन ग्रामपंचायतच्या कचऱ्या गाड्यांना प्रतिबंध करावा आणि या कचऱ्याच्या साम्राज्यातून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी  जोर धरत आहे

No comments:

Post a Comment