Wednesday, 13 May 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी ; फेरीवाल्यांविरोधातील तक्रारीचा राग !!

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी ; फेरीवाल्यांविरोधातील तक्रारीचा राग !!

*डोंबिवली, दि. 13 मे 2026*

कल्याण, संदीप शेंडगे :

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका पत्रकाराला पोलीस ठाण्याच्या आवारातच धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

*नेमके काय घडले*  
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार विनोद प्रेमनारायण गिरी यांनी केडीएमसीकडे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार करून बातमी प्रकाशित केली होती. याचाच राग मनात धरून छाया अमोल खिल्लारे या महिलेने 12 मे रोजी डोंबिवली पोलीस ठाणे परिसरात गिरी यांना धमकी दिल्याचा आरोप मनोज गिरी यांनी केला आहे.

*धमकीचे स्वरूप*  
या महिलेने पोलीस ठाण्याच्या आवारातच “तुला बघून घेईल, एक महिला काय करू शकते हे तुला दाखवते” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली असून एका महिलेला पुढे करत पत्रकाराला धमकविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

*गुन्हा दाखल*  
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 351(2) अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाण्यात एनसीआर क्रमांक 1708/2026 दाखल करण्यात आला आहे. सध्या अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

*कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह*  
पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकावण्याचा प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फेरीवाला लॉबी इतकी बेधडक झाली आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध करत आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment