Wednesday, 13 May 2026

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

*कल्याण, दि. 13 मे 2026*

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सभागृहात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, पुनर्वसन, क्लस्टर योजना, प्रशासकीय प्रकल्प अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

*पाणीप्रश्नावर मोठा निर्णय*  
*अमृत योजनेला 100 कोटींचा निधी*: 27 गावांमधील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महापालिकेच्या 50 कोटी रुपयांच्या निधीसह आता एकूण 100 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून नवीन जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था मजबूत करण्याच्या कामांना गती मिळणार आहे.  
*268 कोटींचा स्वतंत्र आराखडा*: जुन्या जलवाहिन्यांमुळे होणारी गळती व कमी दाबाची समस्या सोडवण्यासाठी 268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र शासनाच्या नव्या तरतुदींमधून निधी उपलब्ध करण्यावर चर्चा झाली.

*वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रकल्प*  
*वालधुनी पुलाचे काम वेगाने*: कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.  
*यू-टाईप रस्ते प्रकल्प*: शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी यू-टाईप रस्ते प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.  
*कल्याण रिंग रोड*: टप्पा तीनसाठी भूसंपादन पूर्ण झाले असून कामाला गती दिली जाणार आहे. उर्वरित भूसंपादन जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.  
*सॅटिस प्रकल्प*: डोंबिवली पूर्व येथे सॅटिस प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कल्याण पश्चिम येथील सॅटिस प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला.

*आरोग्य सुविधांवर भर*  
*500 बेडची रुग्णालये*: शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयांचा पुनर्विकास करून ठाण्याच्या धर्तीवर प्रत्येकी 500 बेडची अत्याधुनिक रुग्णालये उभारण्यावर भर देण्यात आला.  
*कॅन्सर हॉस्पिटल व सुतिकागृह*: डोंबिवलीतील कॅन्सर हॉस्पिटल व सुतिकागृह प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत आणण्याचे नियोजन आहे.

*पुनर्वसन व गृहनिर्माण*  
*बीएसयुपी घरे*: विकासकामांमुळे बाधित नागरिकांचे पुनर्वसन बीएसयुपी घरांमध्ये करताना घरांची गुणवत्ता, सुरक्षितता व मूलभूत सुविधांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.  
*क्लस्टर योजना*: ठाणे व मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना प्रभावीपणे राबविण्यावर चर्चा झाली. कल्याण पूर्व, पश्चिम व डोंबिवली परिसरातील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

*इतर महत्त्वाचे निर्णय*  
*प्रशासकीय इमारत व स्मारके*: कचोरे व नेतिवली टेकडी येथील नवी महापालिका प्रशासकीय इमारत, संत सावळाराम महाराज स्मारक व शिवसृष्टी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना.  
*पार्किंग व फेरीवाला धोरण*: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व शिस्तबद्ध पार्किंगसाठी तयार केलेल्या फेरीवाला धोरण व पार्किंग धोरणाची लवकरच अंमलबजावणी होणार.  
*नाट्यगृह पुनर्विकास*: डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी 20 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार राजेश मोरे, उपमहापौर राहुल दामले, स्थायी समिती अध्यक्ष मल्लेश शेट्टी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा पालिका गटनेते शशिकांत कांबळे, भाजपाचे वरूण पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, रमिझ मणियार यांच्यासह कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवक व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment