Friday, 12 June 2026

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
आंतरराष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे आंतरराष्ट्रीय कामगार शिखर परिषदेसाठी आपल्या वाढदिवसासह सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून जिनेव्हा येथे गेले होते. कारण तेथे जगातील कामगारांच्या हक्कांसाठी कायदे बनविले जातात. ही संधी महेंद्रशेठ घरत यांना दुसऱ्यांदा मिळाली. साहजिकच वाढदिवसानिमित्त त्यांना प्रत्यक्ष भेटून अनेकांना शुभेच्छा देता आल्या नाहीत. महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी महेंद्रशेठ घरत हे वहाळच्या साई मंदिरात अन्नदान करतात. त्यामुळे गुरुवारी (ता.११) महेंद्रशेठ घरत हे साई मंदिरात आरती आणि अन्नदान उपक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी साई मंदिर वहाळतर्फे त्यांचा आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले त्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त मो. का. मढवी गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एमटीएचएलचे चिफ रेसिडेंट इंजिनियर रतनलाल देशमाने यांचाही यथोचित सन्मान साई मंदिरतर्फे करण्यात आला. 

यावेळी राधाकृष्ण बालगोपाल भजन मंडळ हरिग्राम (पनवेल) यांचे सुश्राव्य भजन झाले. गायिका प्रतिज्ञा सुरेश पाटील यांनी अप्रतिम भजन सादर करून साईभक्तांना जिंकले. त्यांना प्रसाद पाटील यांनी पखवाजवर साथ केली, तसेच प्रज्ञा, आर्या, तनिष्का, खुशी यांनी कोरस म्हणून उत्तम साथ दिली. त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते गायिका प्रज्ञा पाटील हिचा सन्मान करण्यात आला. यावेळी साईबाबांचे मंगलस्नान करण्याचा मान आनंद नारायण ठाकूर आणि नयना आनंद ठाकूर यांना मिळाला होता; तर अन्नदान महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी साई मंदिर व्यवस्थापन सांभाळण्यासाठी सक्रिय असणाऱ्या सेवाभावी भक्तांची दखलही महेंद्रशेठ घरत यांनी घेतली. यावेळी साई मंदिराचे अध्यक्ष रविशेठ पाटील, मो. का. मढवी गुरुजी, विश्वास पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment