Saturday, 19 June 2021

उल्हास नदीवर रायते येथे जलपर्णी चा पर्यायी रस्ता, जलपर्णी अशीच अटकत राहिल्यास पुलाला धोका?

उल्हास नदीवर रायते येथे जलपर्णी चा पर्यायी रस्ता, जलपर्णी अशीच अटकत राहिल्यास पुलाला धोका?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणारा उल्हास नदीवरील रायते येथील पुलाजवळ पावसाच्या पाण्यात वाहून आलेली जलपर्णी मोठ्याप्रमाणात अडकली असून जणूकाही पर्यायी रस्ताच तयार झाला आहे. परंतु ही जलपर्णी अशीच अटकत राहिल्यास पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरून पाणी दूषित होऊ शकते अशी भिती रायते गावातील सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशे यांनी व्यक्त केली आहे.
कल्याण आणि मुरबाड या दोन तालुके सह बदलापूर कर्जत, खालापूर लोणावळा पुणे तसेच भिवंडी, शहापूर व नाशिक येथे जाण्यासाठी रायते येथील उल्हास नदीवरील पुल महत्त्वाचा आहे. हा पुल ब्रिटिश कालीन असल्याचे सांगितले जाते. मागील काही वर्षांपुर्वी आलेल्या महापुरात हा पुल पुर्ण पणे वाहून गेला होता. परंतु खालील बांधकामाला धक्का देखील लागला नव्हता. त्यामुळे जेव्हा हा पुल दुरुस्ती करण्यात आला तेव्हा याच्या वरच्या बाजूला म्हणजे रायते गावाच्या दिशेला सिमेंट पाईप टाकून पर्यायी रस्ता  बनवला होता.सध्या संपूर्ण उल्हास नदी ही जलपर्णी ने व्यापली आहे. बदलापूर पासून ते शहाड मोहना बंधाऱ्या पर्यंत ही जलपर्णी पसरली आहे. नदीपात्रात पाणी कुठे दिसत नाही. सर्वत्र जलपर्णी आहे. 
गेल्या काही दिवसांपासून कल्याण तालुका, मुरबाड, बदलापूर कर्जत या परिसरात कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बदलापूर, मुरबाड धानिवली, आपटी बंधारा येथून पावसाच्या पाण्यात वाहून आलेली जलपर्णी व पालापाचोळा, कचरा हा रायते येथे पुलाजवळ अडकला आहे. तो इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की जणू काही नदी पात्रात पर्यायी रस्ता तयार केला आहे. हा असाच वाढत राहिला तर पाण्याच्या दबाव आणि प्रचंड प्रवाहामुळे पुलाच्या कमानी बांधकामाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच येथे घाण जमा झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरुन पाणी दूषित होऊ शकते. त्यामुळे ही जलपर्णी ताबडतोब हटवावी व पाण्याचा नैसर्गिक प्रवाह प्रवाहित करावा अशी मागणी रायते गावातील सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशे यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment