ठाणे व भिवंडीतील खाडी किनारी माती, दगड, डेब्रिज टाकून खाडी व खांजन जमीनीवर अतिक्रमण !!
भिवंडी, दिं,६, अरुण पाटील (कोपर) :
ठाणे व भिवंडीतील खाडीत माती ,दगड व डेब्रिज टाकून खाडी व खांजण जमीन लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नागरिकांन मधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. खाडीच्या किनारी असलेल्या खारेगाव टोल नाक्याच्या दोन्हीं ठिकाणी व भिवंडीतील कशेळी व काल्हेर गावच्या हद्दीतील खाडी किनारी सध्या मोठ्या प्रमाणात माती,दगड व डेब्रिज टाकून अतिक्रमण अतिक्रमण सुरू असल्याने तेथील कांदळ वनाचा -हास होताना दिसत आहे.मात्र संबंधित प्रशासन त्या गंभीर बाबीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.
तसेच खारेगाव टोल नाक्याच्या पुढे अंजूर दिवे (हाय वे दिवे)गावाच्या हद्दीत असलेल्या खाडी किनारी सद्या मोठ्या प्रमाणावर माती, दगड व डेब्रिज भरणी सुरू असून माती व दगड भरणी करताना कुठल्याही प्रकारची रॉयल्टी (स्वामित्व धन)भरली जात नाही.त्यामूळे शासनाचे दर दिवशी करोडो रुपयाचे नुकसान होत आहे.तरीही भिवंडी तहसीलदार या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
तसेच ठाणे महापालिका स्वतःचे नियम धाब्यावर बसवून खाडीत हजारो डंपर कचरा टाकत असल्यानं सामान्य नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. पर्यावरणाचे धडे देणारी महापालिका जर अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळू लागल्यानं पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इथं टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याबरोबर ठाणे शहर आणि अन्य भागातून मोठ्या प्रमाणात डेब्रिज आणून खाडी किनारी टाकलं जात आहे.
या सगळ्या प्रकारामुळं खाडी कीनारी असलेल्या कांदळवन/खारफुटीला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं कचऱ्याचं डम्पिंग त्वरित थांबवावं, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे.ठाणे शहरात दररोज अंदाजे 90 हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. ठाणे महानगर पालिकेचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नसल्यानं गेली 20 वर्षे कचरा कुठं टाकायचा असा यक्ष प्रश्न महापालिकेसमोर उपस्थित राहीला आहे.
दिवा येथील खासगी जमिनीवर क्षमता संपल्यावर देखील गेली अनेक वर्ष महापालिकेतर्फे कचरा टाकण्यात येत होता. कचऱ्याला दररोज लागणाऱ्या आगीमुळे दूर आणि दुर्गंधीनं त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलनं छेडली गेली आहेत. त्यामुळे शहरात निर्माण होणारा कचरा भंडारी गाव इथं टाकण्यास महापालिकेनं सुरुवात केली. इथल्या नागरिकांनी देखील कचऱ्या विरोधात आंदोलन छेडल्यावर आता डायघर इथं कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे.
मुंबई नाशिक महामार्ग जवळच्या खाडीकिनारी महापालिका गुपचूप कचरा टाकत असल्याचं वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. दुसरं डम्पिंग तयार करुन खाडी किनारा बुजवण्याचा कट केलात तर याद राखा, असा सज्जड दमच जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. यापुढं अशा प्रकारे कचरा फेकण्याचा प्रयत्न केल्यास गाड्याच पेटवून देऊ असा, धमकीवजा इशारादेखील आव्हाड यांनी दिला.
ठाणे डायघर इथला प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरु न झाल्यानं, कचरा फेकण्यासाठी महापालिका इतर ठिकाणं देखील शोधत आहे. ठाण्यातील सीपी टँक परिसरात देखील कचरा टाकण्यात येत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. आता तर चक्क मुंबई नाशिक महामार्गालगत खारेगाव टोलनाक्या जवळच खाडीत कचरा फेकणं सुरू झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अशा प्रकारे दररोज शेकडो डंपर खाडीत कचरा आणून टाकत आहेत. त्या सोबतच बांधकामाच्या ठिकाणा वरील रॅबिट आणि इतर साहित्य देखील फेकलं जात असल्यानं खाडीतील जैव विविधतेला धोका निर्माण झाला आहे. ठाणे महानगरपालिकेनं कचरा टाकण्याची प्रक्रिया त्वरित थांबवली नाही तर खाडी किनाऱ्याची अवस्था अत्यंत वाईट होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment