Tuesday, 9 June 2026

26 वर्षांनंतर बी.एड. मित्रमंडळींचा अविस्मरणीय स्नेहमेळावा कोलाड येथे उत्साहात संपन्न* !!!

26 वर्षांनंतर बी.एड. मित्रमंडळींचा अविस्मरणीय स्नेहमेळावा कोलाड येथे उत्साहात संपन्न* !!!

कोलाड, दि. ७ जून २०२६ :

सन १९९९ ते २००० या कालावधीत भा. अ. तथा भाईसाहेब अध्यापक महाविद्यालय, सावर्डे (ता. चिपळूण) येथे बी.एड. शिक्षण घेतलेल्या मित्र-मैत्रिणींचा तब्बल २६ वर्षांनंतर कोलाड येथे भव्य स्नेहमेळावा (Get-Together) मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणी आपापल्या संसारात व नोकरीच्या व्यापात व्यस्त झाले. त्यावेळी मोबाईल किंवा सोशल मीडियासारखी संपर्क साधने उपलब्ध नसल्याने अनेक वर्षे एकमेकांचा संपर्क तुटला होता. गेल्या काही वर्षांत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्वजण पुन्हा संपर्कात आले; मात्र प्रत्यक्ष भेटीचा योग जुळून येत नव्हता.

यावेळी शांताराम चव्हाण सर, सागर शिंदे आणि नितीन गाढे यांच्या पुढाकारातून स्नेहमेळाव्याचे नियोजन करण्यात आले. यास निमित्त ठरले ते मैत्रीण दवणे मॅडम यांची वेतन अधीक्षक पदावर झालेली पदोन्नती. त्यांच्या सत्कारासाठी आणि सर्व मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी कोलाड येथील सागर शिंदे यांच्या मित्राच्या फार्महाऊसची निवड करण्यात आली.

मुंबई, कल्याण, कर्जत, महाड, अलिबाग, महाबळेश्वर तसेच इतर विविध ठिकाणांहून मित्र-मैत्रिणी उपस्थित राहिले. सर्वांनी एकत्रित योगदान देऊन कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमात दवणे मॅडम यांचा शाल, साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मित्र-मैत्रिणींचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान प्रत्येकाने सावर्डे महाविद्यालयातील आठवणी, विद्यार्थी जीवनातील प्रसंग, आजच्या जीवनातील अनुभव, यश-अपयश आणि जीवनप्रवास याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शांताराम सर यांनी घेतलेल्या संवादपर मुलाखतीमुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गाणी, नृत्य, विनोद, खेळ आणि मनमोकळ्या संवादामुळे वातावरण अतिशय आनंदी झाले.

विशेष म्हणजे, २६ वर्षांनंतर भेटूनही कोणालाही परकेपणा जाणवला नाही. जणू कालच महाविद्यालयात भेटलो होतो, अशी भावना सर्वांच्या मनात होती. जे मित्र-मैत्रिणी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचीही सर्वांनी आवर्जून आठवण काढली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शिंदे यांनी केलेल्या मेहनतीचे सर्वांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या कुटुंबीयांचे, विशेषतः शिंदे वहिनींचेही उपस्थितांनी मनःपूर्वक आभार मानले.

स्नेहमेळाव्याच्या शेवटी सर्वांनी पुढील काळातही अशा भेटीगाठी नियमित आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि मैत्रीचे हे बंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचा समारोप पुढील भावस्पर्शी ओळींनी करण्यात आला—

> क्षण हे जातील, आठवणी राहतील,
चेहरे बदलतील, मैत्री मात्र कायम राहील...
पुन्हा भेटण्याच्या एका हाकेसाठी,
मनातील आपुलकी सदैव जिवंत राहील...

हा स्नेहमेळावा सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि भावनिक क्षण ठरला असून, २६ वर्षांची मैत्री नव्या उत्साहाने पुन्हा फुलल्याची भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.

शब्दांकन - विश्वनाथ राऊत सर 

2 comments:

  1. बहुत ही सुंदर शब्दांकन सर जी

    ReplyDelete
  2. Great Bhet , Thank you Raut Sir

    ReplyDelete

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !! उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे आ...