Thursday, 11 June 2026

"कोकण रेल्वे भरती: वॉक-इन मुलाखती महाराष्ट्रातच घ्या, अन्यथा आंदोलन"; मनसेचा KRCL ला इशारा !!

"कोकण रेल्वे भरती: वॉक-इन मुलाखती महाराष्ट्रातच घ्या, अन्यथा आंदोलन"; मनसेचा KRCL ला इशारा !!

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) :
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मार्फत ८ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत १७ प्रकारच्या १५० तांत्रिक पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर वॉक-इन मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीच्या मुलाखती महाराष्ट्राबाहेर घेतल्यास महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होईल, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुलाखती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथेच घेण्याची मागणी केली आहे. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश बाळचंद्र ठाकूर यांनी १० जून २०२६ रोजी KRCL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना पत्र पाठवून हा इशारा दिला आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या भरतीमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, गुणवत्ता निरीक्षक, तंत्रज्ञ (वेल्डर, ऑपरेटर, फिटर), वाहन चालक, लिस्ट ऑपरेटर, हायड्रा ऑपरेटर, ऑफिस बॉय/हेल्पर अशा १७ विविध पदांसाठी एकूण १५० जागा कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. यासाठी ८ जूनपासून ३० जूनपर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी वॉक-इन मुलाखती आयोजित केल्या आहेत. या भरतीसाठी ओबीसी, एससी, एसटी व अन्य आरक्षण लागू असून पात्रता निकष व इतर तपशीलासाठी उमेदवारांनी www.konkanrailway.com या वेबसाईटवर अधिसूचना पाहावी, असे प्रशासनाने कळवले आहे.

संदेश ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे की, "कोकण रेल्वेचा सर्वाधिक मार्ग महाराष्ट्रातून जातो आणि KRCL चे मुख्यालयही नवी मुंबई, महाराष्ट्रात आहे. असे असताना भरतीसाठीच्या वॉक-इन मुलाखतीची ठिकाणे महाराष्ट्राबाहेर ठेवणे म्हणजे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक व वेळेचा मोठा फटका बसवण्यासारखे आहे. परराज्यात मुलाखतीला जाण्यासाठी येणारा प्रवासखर्च व वेळ यामुळे अनेक होतकरू मराठी मुलं या संधीपासून वंचित राहतील".

मनसेने या पत्रातून दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. पहिली म्हणजे KRCL मधील सदर भरती प्रक्रियेच्या वॉक-इन मुलाखती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे आयोजित कराव्यात. दुसरी मागणी म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे. "कोकण रेल्वे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत महाराष्ट्रातील तरुणांना न्याय मिळावा, ही अपेक्षा आहे. आपण या विनंतीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा," असे ठाकूर यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, मनसेने हे पत्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, पोलीस आयुक्त नवी मुंबई व मनसे संपर्क अध्यक्ष रायगड यांनाही प्रत माहितीसाठी पाठवले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. त्यामुळे आता KRCL प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !! उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे आ...