Thursday, 30 April 2026

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !!

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !!

*कल्याण, दि. 23 एप्रिल 2026, 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील बल्याणी परिसरात मोठ्या प्रमाणात उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने मोठी कारवाई केली.

*उपायुक्त बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई*  
उपायुक्त बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बुधवारी ही मोहीम राबवली. या कारवाईत *140 अनधिकृत चाळींमधील खोल्या* व *36 जोते* जमीनदोस्त करण्यात आले.

बल्याणी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा चाळी व बांधकामांचे पेव फुटले होते. नागरिकांच्या तक्रारी व महापालिकेच्या पाहणीत ही बांधकामे पूर्णपणे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार नोटीसा बजावूनही बांधकामे हटवली न गेल्याने अखेर महापालिकेने जेसीबी व कामगारांच्या मदतीने थेट कारवाई केली.

*पुढील कारवाईचा इशारा*  
‘अ’ प्रभागाचे सहायक आयुक्त व अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बल्याणी परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. येत्या काही दिवसांत आणखी मोठी कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही मोहीम सुरूच राहील, असे उपायुक्त बोरकर यांनी स्पष्ट केले.

कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे 'महाराष्ट्र दिना' निमित्त कामगार आणि पत्रकारांना'राजा शिवाजी' चित्रपटाची पहिल्या शोची मेजवानी !

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे 'महाराष्ट्र दिना' निमित्त कामगार आणि पत्रकारांना
'राजा शिवाजी' चित्रपटाची पहिल्या शोची मेजवानी !

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : जागतिक कामगार दिन आणि 'महाराष्ट्र दिना'निमित्त शुक्रवारी (ता. १ मे) आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांनी कामगार आणि त्याचे कुटुंबीय, तसेच पत्रकारांसाठी 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाची अनोखी मेजवानी देण्याचे ठरविले आहे. 'राजा शिवाजी' हा शिवरायांवरील भव्यदिव्य चित्रपट शुक्रवारी (ता. १) प्रदर्शित होत आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट एकाच दिवशी मराठी, हिंदी आणि तेलगू भाषांत प्रदर्शित होत आहे. प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदिन खान, सलमान खान, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, बोमन इराणी अशा कलाकारांचा अभिनय असलेला आणि अजय-अतुल यांचे संगीत लाभलेला हा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील या ऐतिहासिक चित्रपटाचा पहिला शो पाहण्याची संधी महेंद्रशेठ घरत यांनी कामगार आणि पत्रकारांना महाराष्ट्र दिनी आणि जागतिक कामगार दिनी दिली आहे. त्यामुळे कामगार नेता कसा असावा, तर तो महेंद्रशेठ घरत यांच्यासारखा, अशा भावना कामगारांमधून व्यक्त होत आहेत. 'राजा शिवाजी' चित्रपट पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये शुक्रवारी (ता. १ मे) सायंकाळी ६.३० चा शो, पीव्हीआर, स्क्रीन-१ वर पाहण्यासाठी कामगार आणि पत्रकारांनी वैभव पाटील (मोबाईल- ९८१९३२५५५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेतर्फे करण्यात आले आहे

जनगणना २०२७ कार्यक्रमास प्रारंभ ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे तहसीलदार उद्धव कदम यांचे जनतेला आवाहन !!

जनगणना २०२७ कार्यक्रमास प्रारंभ ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे तहसीलदार उद्धव कदम यांचे जनतेला आवाहन !!


उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी जनगणना २०२७ कार्यक्रमास सुरुवात झालेली असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील विविध प्राथमिक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. सदर जनगणना ही देशाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करण्यासाठी नागरिकांचे सक्रिय सहकार्य आवश्यक आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात येत असून, क्षेत्रनिहाय घरगुती माहिती संकलन, गाव/शहर नकाशे तयार करणे (Mapping) आदी कामांना गती देण्यात येत आहे.

यावेळी नागरिकांना कळविण्यात येते की, दि. ०१ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना (Self Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली माहिती अचूकपणे भरावी, असे आवाहन उरण तालुक्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी जनतेला केले आहे.


कोट (चौकट ):- 

जनगणना संदर्भातील अधिक माहिती व स्वगणना करण्यासाठी नागरिकांनी खालील अधिकृत वेबसाईटचा उपयोग करावाः


स्व-गणना प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

१)अधिकृत पोर्टलवर प्रवेश करून लॉगिन करा.

२) कुटुंब प्रमुखाचे नाव व मोवाईल क्रमांकाच्या आधारे कुटुंब नोंदणी करा.

३) पसंतीची भाषा निवडून मोबाईलवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.

४) राज्य, जिल्हा व स्थानिक पातळीवरील आवश्यक तपशील निवडा.

५) डिजिटल नकाशावर आपल्या निवासस्थानाचे अचूक स्थान निश्चित करून मार्क करा.

६)दिलेली प्रश्नावली काळजीपूर्वक पूर्ण करा.

७) भरलेली माहिती पूर्वावलोकन करून आवश्यक त्या दुरुस्त्या करा.

८) अंतिम सादरीकरण (Submit) करा.

९)प्रगणक भेटीस आल्यास त्यांना आपला SE ID अवश्य कळवा.

१०) SE ID मधील माहिती व प्रगणकाने संकलित केलेली माहिती जुळल्यास ती माहिती ग्राह्य धरण्यात येईल.

===================================================


जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक ती माहिती प्रामाणिकपणे व वेळेत द्यावी, तसेच या कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.
    - डॉ. उध्दव कदम, तहसीलदार उरण

अटल सेतू जवळील उरण तालुक्यातील चिर्ले येथे बेकायदेशीर व अनधिकृतपणे डेंब्रिज टाकणाऱ्या मुंबई मधील दोन डंपर चालकावर गुन्हा दाखल !!

अटल सेतू जवळील उरण तालुक्यातील चिर्ले येथे बेकायदेशीर व अनधिकृतपणे डेंब्रिज टाकणाऱ्या मुंबई मधील दोन डंपर चालकावर गुन्हा दाखल !!

अनधिकृत व बेकायदेशीर डेंब्रिजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर.

वारंवार घटना घडत असल्यामुळे योग्य उपाययोजनाची गरज.

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : उरण मधील चिर्ले येथे डेंब्रिज टाकणाऱ्या मुंबई मधील दोन वाहन चालकांना प्रत्यक्ष जागेवर पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २४/०४/२०२६ रोजी वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशानुसार सुरक्षा रक्षक तसेच भरारी पथक कारवाई गस्त करीत असताना कार्यकारी अभियंता राजीव कोलप यांच्या सुचने नुसार बेकायदेशीर डेंब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अटल सेतुजवळ ब्रिज जेथे संपतो त्याठिकाणी चिरले येथे डेब्रिज टाकणारे वाहण असल्याची माहीती प्राप्त झाल्या नंतर सदर डेब्रिज टाकणारे वाहनांवर कारवाई करा असे आदेश मिंळाल्यानतर अटल सेतु ब्रिज संपतो त्या ठिकाणी चिरले ता. उरण, जि. रायगड येथे १९:३० वा च्या दरम्यान भरारी पथक पोहोचले असता डंपर क्र. 1) MH 01 EW 1486, 2) MH 01 CB 8050 हे सिडकोच्या अधिसुचीत क्षेत्रातील जागेत डंपरमधील डेब्रीज अनधिकृतपणे वाहतुक करून डेब्रीज टाकत असताना आढळून आले. सदर डंपर वरील चालकास भरारी पथकाने थांबवून त्यांचे नाव विचारले असता 1) डंपर नं MH 01 EW 1486, वरील चालक याने त्याचे नाव महेश बाबु कुंभार, वय 31 वर्ष, व्यवसाय-चालक, रा. न्यु पारेख कंपाउंड बिल्डींग नं 11 बी, रूम नं 103 लोखंडे मार्ग, गोवंडी मुंबई असे सांगितले तर 2) MH 01 CB 8050 वरील चालक याने त्याचे नाव शकीर सज्जद अली वय 27 वर्ष, व्यवसाय-चालक, रा. शांतीनगर फरदोस कालनी, एसपी रोड, वडाळा मंबई असे सांगीतले. त्यांनतर  भरारी पथकाने सदर ठिकाणी सुरक्षा जवान यांना बोलावून त्यांच्या मदतीने भरारी पथकाने सदर दोन ही डंपर जासई पोलीस चौकी येथे आणून उभे केले आहेत.

 दिंनाक २४/०४/२०२६ रोजी सायंकाळी १९:३० वा. सुमारास, अटले सेतु ब्रिज संपतो त्या ठिकाणी चिरले ता. उरण, जि. रायगड येथे यातील आरोपी डंपर चालक यांनी डंपर नं. 1) MH 01 EW 1486, 2) MH 01 CB 8050 मधील डेब्रीज अनाधिकृतपणे वाहतुक करून ये जा करणा-या तसेच स्थानिक लोकांच्या आरोग्यास व जिवीतास हानी होईल अशा बेकायदेशीर व बेजबाबदार पध्दतीने टाकून सिडकोच्या अधिसुचीत क्षेत्रातील जागेचे विद्रुपीकरण करण्यास बेजबाबदारीचे कृत्य करणेस कारणीभूत झाले म्हणून भरारी पथकाने चालकांवर कायदेशीररित्या गुन्हा नोंदविला आहे.भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३कलम २८०,३(५), महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलम ३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम १२० अंतर्गत डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा अधिक तपास सब इन्स्पेक्टर गोविंद दत्तात्रेय केंद्रे  करीत आहेत.अनधिकृत व बेकायदेशीर डेंब्रिजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा वारंवार घटना घडत असल्यामुळे योग्य ते कायमस्वरूपी उपाययोजनाची गरज आता निर्माण झाली आहे.

शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ या संघटनेतर्फे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, निर्माते, दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी !!

शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ या संघटनेतर्फे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, निर्माते, दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                  शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ या संघटनेच्या वतीने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, निर्माते, दिग्दर्शक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती त्यांच्या दादर येथील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली.याप्रसंगी शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना अध्यक्ष व वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ. चे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र दगडूदादा सकपाळ, WHRAF चे महाराष्ट्र अध्यक्ष मोहन वायदंडे, शिव स्वराज्य सेनेच्या प्रवक्त्या सौ.सुषमा सकपाळ राऊत,‌भारतीय केबल सेनेचे सचिव राजेश जैन, कमला मेहता दादर अंध विद्यालय च्या संचालिका श्रीमती वर्षा जाधव, वैद्यकीय मदत कक्षाचे अनिकेत लाड, स्वाद केटरर्स चे प्रोपरायटर नितीन कोलगे, लायन दिलीप वरेकर, लायन संजय सासमल, लायन सचिन राऊत, कमला मेहता दादर अंध विद्यालय च्या प्राचार्य श्रीमती तन्वी महाडदळकर, शिक्षिका श्रीमती सुरेखा जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

लाकडावर उभं ‘मृत्यूचं शेड’; कल्याण पंचायत समिती परिसरात जीवितास धोका !!

लाकडावर उभं ‘मृत्यूचं शेड’; कल्याण पंचायत समिती परिसरात जीवितास धोका !!

कल्याण | प्रतिनिधी
कल्याण येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीबाहेर उभारण्यात आलेले शेड अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हे शेड अक्षरशः पडक्या लाकडाच्या आधारावर उभे असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक पत्रकार व दक्ष नागरिक 'श्री. विशाल शांताराम कुरकुटे' यांनी याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. संबंधित शेडच्या परिसरातून दररोज नागरिक, कर्मचारी, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले तसेच गर्भवती महिला ये-जा करत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, या संदर्भात यापूर्वीही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असतानाही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याबाबत तातडीने शेड दुरुस्त करणे किंवा पूर्णपणे हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

आता या गंभीर बाबीकडे प्रशासन कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिस्तीने आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर !!

शिस्तीने आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर !!

रत्नागिरी, प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात स्वत:ची ओळख शिस्त आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक म्हणजेच श्री विलासराव कोळेकर होय. असे उद्गार पद्मश्री दादा इदाते यांनी काढले. दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्री इदाते पुढे म्हणाले शैक्षणिक क्षेत्रातील अनेक आव्हाने असतानाही अत्यंत कल्पकतेने व सकारात्मक वृत्तीने सातत्याने काम करुन शाळा व संस्थेचे नाव त्यांनी उज्वल केले आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील त्यांचा सहजतेने वावर होता. एक कुशल संघटक व उपक्रमशिल मुख्याध्यापक म्हणून श्री विलासराव कोळेकर यांनी कौतुकास्पद काम केले आहे असेही ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार भगवान साळुंखे, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार,  जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील, जि. प. सदस्या सौ. उषा सावंत,अरुण मोर्ये,सोसायटीचे अध्यक्ष रहीम माद्रे, बाबासाहेब राशिनकर आदी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. व शाळेच्या चौफेर प्रगतीबद्दल कौतुक केले. श्री विलासराव कोळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक श्री. विलासराव कोळेकर सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा अत्यंत उत्साहात आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान सेवेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाने संपूर्ण सैतवडे परिसराचे लक्ष वेधून घेतले.

मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री नामदार महादेव जानकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कोळेकर सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात केवळ शाळाच चालवली नाही, तर ती एका वटवृक्षाप्रमाणे विस्तारली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे दि मॉडेल इंग्लिश स्कूलने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. कोळेकर सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात केवळ शाळाच चालवली नाही, तर ती एका वटवृक्षाप्रमाणे विस्तारली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे दि मॉडेल इंग्लिश स्कूलने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. यावेळी मुस्लिम एज्युकेशनचे अध्यक्ष रहीम माद्रे, अक्रम कापडे, रज्जाक फकीर, अजिज वागळे, हशमत निवेकर, गनी खतीब, रूमान पारेख, तौफिक चिकटे, अजिज माद्रे, मुख्याध्यापक सर्वश्री व्ही. वाय कुंभार, प्रकाश वंजोळे, श्रीमती सिद्धी लांजेकर, इमरान अंतुले, अरुण जाधव, श्रीशैल्य पुजारी, आशिष वासावे, सुनिल पाटील यांचेबरोबरच, पत्रकार सर्वश्री बाबासाहेब राशिनकर, सुनिल पवार, वैभव पवार, संजय कदम, राजेश जोष्टे, अनिकेत पवार, दिपक पोतदार उपस्थित होते.तसेच तंटामुक्तीचे सैतवडेचे अध्यक्ष दिलावर खान,जांभारीचे सरपंच आदेश पावरी, हर्षल पेढे, संजय शितप, राजेश जाधव, डॉ. जाधव, माजी सरपंच गणेश झगडे, आंबा उद्योजक उमेश रहाटे, कवीवर्य अरुण मोर्ये, संभाजी जाधव, नितीन जाधव, चव्हाण सर, केंद्र प्रमुख अरविंद महाकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी तोटावार मॅडम,आदी मान्यवर व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन विनोद पेढे यांनी केले.सर्वांचे अविनाश केदारी यांनी आभार मानले.

डॉ.रवींद्र भोळे यांचे त्यागमय निष्काम कर्मयोगी कार्य स्फूर्तीदायक आहे... नामदार रवींद्र साठे

डॉ.रवींद्र भोळे यांचे त्यागमय  निष्काम कर्मयोगी कार्य  स्फूर्तीदायक आहे... नामदार रवींद्र साठे 

पुणे, (प्रमोद सुर्यवंशी) दि. २९ : वरकरणी सर्वसामान्य वाटणारे परंतु सेवाव्रती कर्मशिल्पी कार्यकर्त्यांचा एवढा मोठ्या स्तरावर सत्कार, पुरस्कार करणे ही साधी गोष्ट निश्चितच नाही. पुरस्कारामुळे प्रेरणा प्रोत्साहन मिळते व प्रेरणेमुळे राष्ट्र घडते. समाजाप्रती काहीतरी देणे आहे ही भावना प्रत्येकाने जपून प्रत्यक्षात आचरणात आणली पाहिजे. त्यागमय समर्पित कार्य करून डॉ.मणी भाई देसाईंच्या जयंतीदिनी  प्रेरणा देण्याचे स्फूर्तीदायक कार्य समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे करीत आहे. त्यांनी स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करून निष्काम कर्मयोगी कार्य केलेली आहेत. डॉ. रवींद्र भोळे यांचे 
त्यागमय निष्काम कर्मयोगी कार्य स्फूर्तीदायक आहे असे मत नामदार रवींद्र साठे खादी आणि ग्रामोद्योग मंत्री स्वतंत्र कार्यभार मंत्रालय मुंबई यांनी येथे व्यक्त केले. मॅगसेस अवॉर्ड विनर पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांच्या एकशे सहाव्या जयंती निमित्ताने येथे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई प्रतिष्ठान क्रीडा मंत्रालय, नीती आयोग, एम एस एम इ उद्यम मंत्रालय भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री डॉ मणी भाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार समारंभात मार्गदर्शन करताना नामदार रवींद्र साठे यांनी वरील मत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर सौ ममता यशवंत पाटील, स्वीय सहाय्यक खादी ग्रामोद्योग मंत्रालय मुंबई, रमेश सुरुंग जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, माननीय डॉ. भावार्थ देखणे, मुख्य ट्रस्टी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आळंदी, कृष्णा त्र्यंबक खडसे सल्लागार लेवाभ्रातृमंडळ, जयश्री पुरुषोत्तम पाटील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या,पीएसआय, विजय वासुदेव खर्चे राष्ट्रपती पुरस्कार विजेते  अकोला, डॉ हरी निवृत्ती पाटील, प्रमोद सूर्यवंशी संपादकआम्ही मुंबईकर, सुभाष कट्यारमल अध्यक्ष जय श्रीराम शिक्षण संस्था पुणे, रुपेश ताओरी, बापूराव बबन चौधरी दैनिक महाराष्ट्राची भूमि पत्रकार, फकीरा भगवान राजगुरू साहित्यिक, प्राध्यापक दिलीप चौधरी उपाध्यक्ष लेवाभ्रातृमंडळ पुणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विकास वारके उपाध्यक्ष महाराष्ट्र लेवा महासंघ हे होते. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार, स्वर्गीय दिनकरराव भोळे (संस्थेला तीस वर्षे आर्थिक मदत देणारे आश्रयदाते)स्वर्गीय शंतनु गटने (संस्थेला तीस वर्ष स्मृतीचिन्ह पुरविणारे,) स्व तुकाराम रावबा मदने (संस्थेला तीस वर्षे पुष्पहार पुरविणारे)यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ह्या वेळी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक, समाज सुधारक प्रवचनकार अपंगसेवक डॉ.रवींद्र भोळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की गीतेतील अध्याय दोन मधील सत्तेचाळीस व्या श्लोकानुसार पद्मश्री मणीभाई देसाई जीवन जगले. कर्मफलाची अपेक्षा न करता त्यांनी जीवन पर निष्काम कर्मयोग केला. तसेच गीतेतील अध्याय अठराव्या अध्यायातील तिसऱ्या स्लोकानुसार त्यांनी जीवनभर आचरण केले. या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने भक्तांना मार्गदर्शन केलेले आहे की प्रत्येकाने जीवनामध्ये यज्ञ, दान, तप,  कर्म करणे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्याच श्लोकानुसार पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई जीवन जगले त्यांनी दुग्धोत्पादन, निसर्गोपचार, पर्यावरण, कृत्रिम गो पैदास, सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक,शैक्षणिक, इत्यादी क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने महत्त्वपूर्ण कार्य करून यज्ञ ,दान, तप, कर्म साध्य केले, मनीभाईजींनी निष्काम कर्मयोग साधला, कर्मफलाचा त्याग केला असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. डॉ.मणी भाई देसाई जयंती म्हणजे विभूती पूजा आहे आणि ह्या विभूती पूजेचा प्रसाद म्हणजे हा पुरस्कार आहे असे ते म्हणाले. गेली तीस वर्षापासून हा महायज्ञ सुरू आहे. याप्रसंगी पद्मश्री डॉ. मणी भाई दिसे राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाचे वितरण प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, डॉ.भरत सिंह शैक्षणिक कार्य ग्रेटर नोएडा युपी, विजय वासुदेव खर्च राष्ट्रपती पुरस्कार विजेते अकोला, मुरलीधर खर्चे, हरी प्रल्हाद बढे,जितेंद्र बच्चन ज्येष्ठ पत्रकार दिल्ली, बापूराव बबन चौधरी पत्रकार महाराष्ट्राची भूमी, सौ रीना देशमुख प्राचार्य एंजल हायस्कूल, जयश्री पुरुषोत्तम पाटील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पीएसआय ठाणे, रुपेश ताओरी, फकीरा भगवान राजगुरू, सौ विद्याताई यादव, डॉ. लक्ष्मण माधवराव शिवनेकर, शिवराज ज्ञानोबा साने संगीत शिक्षक,श्रीमती रश्मी नरेंद्र जोशी, डॉ.स्मिता विनायक सहस्रबुद्धे, प्रदीप श्रीकृष्ण पुराणिक, रज्जाक शेख, अहमद किरण साहब शेख,किरण लक्ष्मण तोडकर, विजया कौतिक जंगले, नीता यशवंत वायकोळे, दिलीप गोविंदराव डहाके, भाग्यश्री पवन कट्यारमल, अर्चना शशिकांत धूरदेव, आरती शशिकांत गाडेकर, चंद्रकांत प्यारे मॅडम, दत्ता श्रावण खंदारे, राम मिस्त्री, धनेश्वर  पतंगराव भोस, हे म्हणता प्रतीक गीते, सरोज प्रभाकर आल्हाट, विवेक भागचंद्र शेलार, खेमगर वसंत बाळू, रेणुका रवींद्र पातारे, शहाजी भिकाजी शेळके, संतोष शेरकर, विठ्ठल महाराज खेडकर, समीर निंभोरे अंकुश तुकाराम भोरडे, वैद्य उद्धव ज्ञानदेव साळुंखे सत्तर सामाजिक कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉक्टर मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ असेच पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अंकुश दळवी, प्रफुल्ल झोपे, सौ किरण पाचपांडे,नॉर्मल नॉटन, एकनाथ धनवट, नितीन पारकर, नाना डोंगरे, या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.डी साळवे सर यांनी केले. आभार प्रदर्शन सुभाष कट्यारमल सर यांनी आपल्या सुमधुर स्वरात केले. शेवटी पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.हा कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह टिंबर मार्केट येथे संपन्न झाला.


डॉ. रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक,समाजसुधारक, अपंग सेवक, प्रवचनकार 
संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई प्रतिष्ठान उरुळी कांचन

Wednesday, 29 April 2026

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा कंबर कसूया आपल्या काळ्या आईला हिरवेगार करूया :  किरण पडवळकर तालुका कृषी अधिकारी माणगाव 

        बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : माणगाव तालुक्यातील शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षांत आपल्या तालुक्यातील भात शेतीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भात हे केवळ आपले पीक नसून ती आपली परंपरा आणि ओेळख आहे. चला, पुन्हा एकदा एकत्र येऊया आणि आपल्या शेतात सोन्यासारखा विषमुक्त भात पिकवूया !

         भात शेती का करावी?

✓ स्वयंपूर्णता : स्वतःच्या कुटुंबासाठी शुद्ध आणि विषमुक्त तांदूळ उपलब्ध होतो.
✓ पशुधनास आधार : भात शेतीतून मिळणारा पेंढा आपल्या गुरांसाठी मुख्य चारा आहे. जमिनीची सुपीकता: पीक फेरपालट आणि मशागतीमुळे जमिनीचा कस टिकून राहतो.
✓ शासकीय योजना : सुधारित बियाणे, खते आणि अवजारांसाठी कृषी विभागाकडून विशेष अनुदान.
✓ "शेत सोडू नका, साथ सोडू नका... कष्टाची भाकरी, सन्मानाने खा!"

अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत!
बियाणे निवड, खत व्यवस्थापन किंवा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहितीसाठी आजच संपर्क साधा. तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव, जि. रायगड.
चाळीसगावात गोदा नर्मदा जल यात्रेचे भव्य स्वागत: आमदार मंगेशदादांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक !!



*चाळीसगाव, दि. 23 एप्रिल 2026*

गोदा नर्मदा जल यात्रेचे चाळीसगावात आगमन होताच आमदार मंगेशदादा चौहान यांनी यात्रेचे उत्साहात स्वागत केले.

*यात्रेत मान्यवरांचा सहभाग*  
या जल यात्रा दिंडीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा खासदार रामराव वाकटे, धनगर समाजाचे लाडके नेतृत्व गोपीचंद पडळकर, चाळीसगावचे लाडके आमदार मंगेशदादा चौहान यांच्यासह सर्व नेतेमंडळी सहभागी झाली होती.

घाटरोड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल यात्रेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. नगारोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मिरवणूक ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी यात्रेचे भव्य स्वागत केले.

*शिवाजी महाराज सभामंडपात स्वागत सोहळा*  
छत्रपती शिवाजी महाराज सभामंडपात स्वागताध्यक्ष आमदार मंगेशदादा चौहान यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती*  
या कार्यक्रमाला धनगर समाज नेते गणेश जने, संदीप देवरे, नगरसेवक धर्मराज बच्छे, निलेश देवरे, चंद्रकांत अहिरे, भूषण अहिरे यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले. सर्व मान्यवरांनी जल यात्रेचे महत्त्व व पाणी बचतीचा संदेश दिला.

आमदार मंगेशदादा चौहान म्हणाले, “गोदा नर्मदा जल यात्रा ही केवळ यात्रा नसून जलसंवर्धनाचा जागर आहे. अहिल्यादेवींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज बांधव व स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Tuesday, 28 April 2026

सफाई कामगाराच्या मुलाची UGC-NET मध्ये भरारी : मेहत्तर रुखी वाल्मिक समाजाचे सुपुत्र जतिन चव्हाण यांचा भव्य सत्कार !!

सफाई कामगाराच्या मुलाची UGC-NET मध्ये भरारी : मेहत्तर रुखी वाल्मिक समाजाचे सुपुत्र जतिन चव्हाण यांचा भव्य सत्कार !!

UGC-NET उत्तीर्ण जतिन चव्हाण यांचा भारत गायकवाड व सोन्याशेठ पाटील सत्कार करताना. शेजारी आई सौ. कांता चव्हाण.

कल्याण, दि. 28 एप्रिल 2026 :

मेहत्तर रुखी वाल्मिक समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य व महानगर सफाई कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी एक प्रेरणादायी सत्कार सोहळा पार पडला.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कामगार सौ. कांता विनोद भाणा चव्हाण यांचा मुलगा *जतिन चव्हाण* याने केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाची अत्यंत अवघड मानली जाणारी *UGC-NET परीक्षा* उत्तीर्ण केल्याबद्दल त्याचा समाजाच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.


*समाजासाठी अभिमानाचा क्षण*  
सफाई कर्मचारी कुटुंबातून येऊन, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जतिनने मिळवलेले हे यश संपूर्ण मेहत्तर रुखी वाल्मिक समाजासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे जतिनने आपल्या यशातून दाखवून दिले.

*सत्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती*  
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महानगर सफाई कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष *भारत गायकवाड* यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

UGC-NET उत्तीर्ण जतिन चव्हाण यांचा भारत गायकवाड व अविनाश गायकवाड (महेश गायकवाड यांचे बंधू) सत्कार करताना.

*उपस्थित मान्यवरांची नावे:*
- *राज्यस्तर*: सोन्याशेठ पाटील – सल्लागार, मधुकर वाल्हेकर – सल्लागार, अविनाश पाटील – कार्याध्यक्ष औद्योगिक कामगार विभाग, सारीका जोशी – अध्यक्षा महिला आघाडी, करूणा अहिरे – महासचिव, संध्या वराळ – उपाध्यक्षा, रविंद्र गायकवाड – सल्लागार
- *ठाणे जिल्हा*: दयानंद सकट – अध्यक्ष, अनिल गदेवार – कार्याध्यक्ष, राम बनसोडे – उपाध्यक्ष, मल्लिकनाथ जाधव – सल्लागार, रघुनाथ सुरडकर – सल्लागार
- *कल्याण तालुका*: राजू रोकडे – अध्यक्ष, सुरेखा जगताप – अध्यक्षा, स्वाती नलवडे – उपाध्यक्षा कल्याण शहर, लक्ष्मी चव्हाण – उपाध्यक्षा कडोंमपा युनिट
- *पनवेल व रायगड*: नरेश नरसिंगे – अध्यक्ष पनवेल तालुका, विध्नेश पाटील – उपाध्यक्ष पनवेल, सुरेश कुंभार – सचिव रायगड जिल्हा
- *विशेष उपस्थिती*: अविनाश गायकवाड (महेश गायकवाड यांचे बंधू)

याप्रसंगी समाजातील सफाई कर्मचारी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत गायकवाड यांनी जतिनचे कौतुक करताना सांगितले की, “जतिनसारखी मुले समाजाचा खरा आधारस्तंभ आहेत. कष्टकरी पालकांच्या मुलांनी शिक्षणाच्या जोरावर मोठी झेप घ्यावी, यासाठी संघ नेहमी पाठीशी उभा राहील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करून सोहळ्याची सांगता झाली.

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई, (केतन भोज) ::रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील तळघर,पोस्ट तळेगाव येथे तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वे वर्ष-श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा सोहळा, श्री लक्ष्मी नारायण मंदिर पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन तसेच श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. हा सोहळा गुरुवार दि.१४ मे २०२६ आणि शुक्रवार दि.१५ मे २०२६ रोजी संपन्न होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ मे रोजी सकाळी कलशपूजन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. दुपारी मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प.सोनालीताई सूरज अडखळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी १५ मे शुक्रवार रोजी पहाटे काकड आरती (श्री.सुभाष मुंडे व ग्रामस्थ मंडळ मुंड्याची वाडी,तळा) होणार आहे. त्या नंतर अभिषेक आणि सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे .दुपारी १ ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत भव्य पालखी मिरवणूक निघेल.त्या नंतर सर्व उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. रात्री तळघर महिला/पुरूष सामूहिक भजन होणार आहे.आणि तद्नंतर रात्री उशिरापर्यंत स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि मा.विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच स्थानिक जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, सभापती, शासकीय सेवेतील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तळघर ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळ व युवक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.सर्व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी !!

स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी !!

मुंबई - पुणे मिसिंग लिंक मार्गास “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी संतोष पटकारे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केली आहे.

महोदय,
सविनय विनंती की, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा - खंडाळा घाट परिसरातील “मिसिंग लिंक मार्ग” हा महाराष्ट्राच्या विकासातील ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी होणार असल्याचे सोशल मीडियातून समजले. सदर मार्गाला “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे, ही नम्र परंतु ठाम मागणी आहे.

लोकपरंपरा, जनश्रुती आणि सामाजिक स्मरणात जपल्या गेलेल्या कथेनुसार, सह्याद्रीतील कठीण बोरीघाट परिसरात मार्ग दाखवून ब्रिटिशांना मदत करणारे आणि त्याबदल्यात स्वातंत्र्याची मागणी करून हौतात्म्य पत्करणारे स्वाभिमानी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून या ऐतिहासिक मार्गाला / प्रकल्पाला त्यांचे नाव देणे ही केवळ नामकरणाची बाब नसून सामाजिक न्याय, ऐतिहासिक सन्मान आणि धनगर समाजाच्या अस्मितेचा गौरव ठरेल.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध समाजघटकांचे योगदान आहे. अशा दुर्लक्षित पण प्रेरणादायी क्रांतीवीरांच्या नावाने हा मार्ग / प्रकल्प ओळखला गेला, तर येणाऱ्या पिढ्यांना इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळेल. विशेषतः महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा झाल्यास ती संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरेल.

तरी आपण सकारात्मक विचार करून १ मे २०२६ पूर्वी “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करावे, ही नम्र विनंती.आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करतो आपणं हा निर्णय घेतल्यास समस्त धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

वृत्तांकन - विलासराव कोळेकर सर 


Monday, 27 April 2026

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!


महाराष्ट्र कुर्मी समाज ने नागपुर में धीरेंद्र शास्त्री द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के संदर्भ में दिए गए वक्तव्य का कड़ा निषेध किया है। *छत्रपति शिवाजी महाराज केवल महाराष्ट्र ही नहीं, बल्कि पूरे देश के गौरव, स्वाभिमान और आदर्श शासन के प्रतीक हैं।* उनके बारे में किसी भी प्रकार की अनुचित, अपमानजनक या भ्रामक टिप्पणी समाज की भावनाओं को आहत करने वाली है।

महाराष्ट्र कुर्मी समाज का मानना है कि ऐसे बयान समाज में अनावश्यक विवाद और असंतोष पैदा करते हैं, जो सामाजिक एकता और सद्भाव के लिए हानिकारक है। हम सभी से अपेक्षा करते हैं कि देश के महान इतिहासपुरुषों के प्रति सम्मानजनक भाषा और जिम्मेदार आचरण अपनाया जाए।

हम प्रशासन से मांग करते हैं कि इस प्रकरण का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की जाए, ताकि भविष्य में इस प्रकार की घटनाओं की पुनरावृत्ति न हो।

महाराष्ट्र कुर्मी समाज
*(अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा – महाराष्ट्र प्रदेश)*

सौजन्य/वृत्त - मा. संजय पाटील 
अध्यक्ष - महाराष्ट्र कृर्मी समाज 
+91 77450 48505

‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन !

‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन !

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण येथील उरण गौ भक्त यांच्या वतीने आज उरणचे  तहसीलदार रविंद्र सानप यांना ‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याबाबत अधिकृत निवेदन देण्यात करण्यात आले. भारतीय संस्कृतीत गाईचे असलेले धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता सदर निवेदन देण्यात आले.या उपक्रमाचा एक भाग म्हणून, देशभरातील ५०० हून अधिक तहसीलदारांना विविध ठिकाणी गौप्रेमी व गौभक्तांच्या वतीने अशाच प्रकारची निवेदने सादर करण्यात आली आहेत, ज्यातून या विषयाला राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेला व्यापक पाठिंबा अधोरेखित होतो.

यावेळी प्रतिनिधी मंडळाने उरण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील सविस्तर चर्चा केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना माहिती देण्यात आली.हा उपक्रम शांततेत, कायद्याचे पालन करून आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येईल, याची माहिती प्रशासनाला देण्यात आले.सदर निवेदनात गाईला भारतीय परंपरेत “माता” म्हणून दिलेले स्थान, तिचे पोषणात्मक आणि कृषी अर्थव्यवस्थेतील योगदान यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच हा प्रस्ताव शासनाच्या उच्च स्तरावर पाठवून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.या उपक्रमास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. भविष्यातही जनजागृती आणि शांततापूर्ण मार्गाने हा अभियान पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी उरण मधील गौ भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र द्वारे रक्तदान शिबीर संपन्न !!

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना  केंद्र द्वारे रक्तदान शिबीर संपन्न !!

** रक्तदान शिबिराला मिळाला उत्तम प्रतिसाद.

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
रक्ता अभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना  केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण द्यानपीठ वाणिज्य व कला महाविद्यालय उरण, पोलीस स्टेशन समोर उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी १९२ रक्तदात्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १८२ रक्तदाते  स्वीकारण्यात आले.

रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला उरण तालुक्यातील नागरिकांचा, उत्तम प्रतिसाद लाभला आहे. उरण तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला सद्गुरु ब्लड बँक कोपरखैरणे महत्वाचे सहकार्य लाभले. सदर रक्तदान शिबीर  उरण तालुक्यातील  सर्व बापू भक्तांनी विशेष मेहनत घेतली.

पनवेलमध्ये ब्रह्माकुमारीज तर्फे ३ दिवसीय किड्स समर कॅम्प उत्साहात संपन्न !!

पनवेलमध्ये ब्रह्माकुमारीज तर्फे ३ दिवसीय किड्स समर कॅम्प उत्साहात संपन्न !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :

पनवेल येथील ब्रह्मा कुमारीस केंद्रात २४, २५ व २६ एप्रिल २०२६ दरम्यान सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ३ दिवसीय किड्स समर कॅम्प उत्साहात पार पडला. या शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी शिबिराची सुरुवात झाली. बीके दिशा देवकर बहन यांनी मुलांकडून व्यायाम करून घेत केली. त्यानंतर बीके डॉ. अंजली सुंकले बहन यांनी “डिजिटल डिटॉक्स” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांकडून एक खेळ करून घेतला, ज्यातून मोबाईल गेम्सपेक्षा शारीरिक हालचालींचे महत्त्व पटवून दिले. तसेच मुलांकडून डिजिटल डिटॉक्सची प्रतिज्ञा करून घेतली व पालकांनाही मार्गदर्शन केले. पुढे बीके सुलक्षणा बहन यांनी “मी कोण?” या विषयावर आत्म्याचे स्वरूप समजावून सांगितले.

दुसऱ्या दिवशी बीके तारा दिदी व सेवाधारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिवसाची सुरुवात झाली. बीके पल्लवी बहन यांनी मुलांकडून झुंबा डान्स करून घेतला. 
त्यानंतर बीके सुनंदा दिदींनी परमात्म्याचा परिचय करून दिला. बीके अनिता दिदींनी राजयोग मेडिटेशनची माहिती देत त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. पुढे बीके दिशा तिवारी बहन यांनी मुलांना विविध विषयांवर चित्रकला करण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलांकडून व्हॅल्यू-बेस्ड गेम्स खेळवण्यात आले आणि शेवटी सर्वांना प्रसाद देण्यात आला.

तिसरा दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी व्यायामाने सुरुवात झाली. 
बीके सुनंदा दिदींनी चार युगांची माहिती गाणे व नृत्याच्या माध्यमातून दिली. 
बीके डॉ. विजय भाई यांनी हेल्दी लाईफस्टाइलवर मार्गदर्शन करत दिवसाची योग्य दिनचर्या कशी असावी हे सांगितले. 

मुलांसाठी भावनांवर आधारित एक खेळ आयोजित करण्यात आला. त्यानंतर आत्म्याच्या सात गुणांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी पनवेल ब्रह्माकुमारीज सेंटरच्या इंचार्ज बीके तारा दिदी यांच्या हस्ते दररोज काढलेल्या लकी ड्रॉमधून तीन मुलांना बक्षिसे देण्यात आली. तसेच “शिवबाबा” कडून सकाळी उठल्यापासून शक्ती कशी घ्यावी, दिवसभराचा दिनचर्या चार्ट कसा सादर करावा आणि दिवसभर परमात्म्याची आठवण कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेतही तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली,  तसेच सर्व सहभागी मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी मुलांकडून “लेटर टू गॉड” लिहून घेण्यात आले आणि सर्वांना ब्रह्माकुमारीजचे आशीर्वाद देण्यात आले. बीके सुलक्षणा बहन यांनी मुलांकडून राजयोग मेडिटेशन करून घेतले, तर संजय भाई यांनी प्रेरणादायी कविता सादर केली. अशा प्रकारे पनवेल ब्रह्माकुमारीज केंद्राचा किड्स समर कॅम्प आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) ::
              महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान.श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा.आमदार, शिवसेना सचिव, प्रवक्ते आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा. श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार मानण्यासाठी दिनांक २६/०४/२०२६ रोजी बाळासाहेब भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री. किरण पावसकर यांचे मनापासून आपल्या भाषणात आभार व्यक्त केले.
          श्री.किरण पावसकर यांनी आपल्या भाषणात सांगितले मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  विनाअनुदानित शाळांना अनुदान सुरू करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याच वाचवल्या तसेच मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या होत्या त्या मराठी शाळांना मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचे आणि अनुदान मंजूर करून देण्याचे काम फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळेच झाले. तसेच जे शिक्षक ७००० आणि ८००० रुपये महिना इतक्या कमी वेतनात काम करत होते आज त्या शिक्षकांना ५०,००० ते ६०,००० महिना पगार सुरू झाला याचे श्रेय शिंदे साहेबांनाच दिले पाहिजे. तसेच शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे साहेब, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीम. राजश्री शिरवाडकर, शिक्षण समिती सदस्य श्रीम.अंजली नाईक मुंबई महानगरपालिका शिवसेना गटनेते श्री.अमेय Spam, माजी शिक्षण समिती सदस्य श्री.मंगेश सातमकर यांच्या सहकार्यामुळे या निर्णयास जलदगती मिळाली असे सांगितले.
            याप्रसंगी सोबत राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री. दिलीप नाईक श्री. संदीप जाधव चिटणीस श्री. तातू नाईक श्री. सचिन लिमन श्री.सचिन साळुंखे श्री. सुहास गायकवाड तसेच संस्थाचालक श्री. सुरेश लाखन श्री. विवेक थोरात श्री. विशाल बंडगर, राष्ट्रीय कर्मचारी सेना शिक्षण विभागाचे उपाध्यक्ष श्री. अमर पाचांगणे, सरचिटणीस संतोष रावताळे, जयदीप पाटील रमेश पवार, अरुण पवार, विनोद यादव, कार्यालय प्रमुख श्री. कार्तिक पवार व मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

रासपचे युवा नेते अजित पाटील राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्काराने सन्मानित !!

रासपचे युवा नेते अजित पाटील राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्काराने सन्मानित !!

*जत / प्रतिनिधी :*
  जत येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांना "राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्कार - २०२६" ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे 'राष्ट्रभक्ती परिवार' आणि 'शौर्य करिअर अकॅडमी' पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र दिनानिमित्त हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
    अजित पाटील हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून गेल्या अनेक वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करत आले आहेत. एक आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्व भाषणावरती प्रभुत्व असणारे युवकांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्यभर युवकांचे संघटन जाळे त्यांच्या माध्यमातून निर्माण केले जात आहे. राज्यभर दौरा करत युवकांच्या प्रश्नांवरती भूमिका घेणे अशा या नेतृत्वास क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   अध्यक्षस्थानी एमआयटी संस्थेचे संचालक महेश थोरवे होते. अध्यक्ष भाषणात ते म्हणाले, आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात तरुणांनी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. कष्टाला कोणताही पर्याय नसून, सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच व्यक्तिमत्व घडते आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीला बळ मिळते. समाजासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा सन्मान होणे ही प्रेरणादायी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
  प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज कॉलेज ग्रुपचे चेअरमन गोपाल खंडारे उपस्थित होते. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी तरुणांना देशसेवा व समाजकार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
  सत्काराला उत्तर देताना अजित पाटील म्हणाले, हा सन्मान केवळ माझा नसून, राष्ट्रीय समाज पक्षातील त्या सर्व युवा रत्नांचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आहे, ज्यांच्या खंबीर साथीमुळे मला राज्यभर कार्य करण्याची संधी मिळाली. हा पुरस्कार मी माझ्या सर्व युवक सहकाऱ्यांना समर्पित करतो आणि त्यांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून हा सन्मान मी स्वीकारला. संयोजकांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास मला जनसेवेच्या कार्यात अधिक ऊर्जा देईल.
  यावेळी आनंदकुमार दुबे, सौ. भारती तुपे, हरिदास भिसे, सुनील गोरे, राजेंद्र पवार यांच्यासहित अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Sunday, 26 April 2026

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित केलेल्या कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सवास मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते श्री. राहूल सोलापूरकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली व त्यांना प्रोत्साहन दिले. मिलेटचा वापर करून तयार केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रांगोळीच त्यांनी विषेश कौतुक केले. 

 मिलेट व फळ महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी डॉ. अहिल्या वाघमोडे, फुड सायन्स विभाग प्रमुख, एसजीएम कॉलेज कराड यांचे मिलेटची ओळख व त्यांचा मानवी शरीरास होणारे फायदे या विषयावर व्याख्यान पार पडले. तिसर्या दिवशी डॉ. प्रतिभा ठोंबरे, कृषी विद्यान केंद्र कोल्हापूर याचे मिलेट उपयुक्तता व मिलेट व्हॅाल्यु एडिशन या विषयावर व्याख्यान पार पडले.

महोत्सवात मिलेट पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिक्षकरूपी डॉ. अहिल्या वाघमोडे, डॅा. प्रतिभा ठोंबरे, पुजा सावंत, तृप्ती कोळेकर, जयश्री करे उपस्थित होते. या मिलेट पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोनल भोसले, द्वितीय मयुरी रानमाळे, तृतीय श्रीया पोफळे, उत्तेजनार्थ दिपाली देसाई क्रमांक मिळाल्याने त्यांचे प्रशस्तीपत्रक व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

सदर महोत्सवात चार दिवसांमध्ये तब्बल २९ लाख रूपयांची उलाढाल झालेली आहे. कोल्हापूर वासीयांचा अत्यंत चांगला प्रतिसाद महोत्सवास मिळताना दिसून येत आहे. कृषी पणन मंडळा चे उपसरव्यवस्थापक श्री विनायक कोकरे यांनी महोत्सवास भेट देऊन सर्व स्टॉल पाहणी केली शेतकर्‍यां समवेत चर्चा केली. आयोजना साठी छान काम केले बद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. उद्याचा महोत्सवाचा उद्या शेवटचा दिवस असून डॉ. संदीप पाटील यांचे मिलेटपर व्याख्यान सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केलेले आहे. त्यामूळे कोल्हापूर वासीयांनी मिलेट व फळ महोत्सवास भेट देऊन मिलेट व फळांचा अस्वाद घ्यावा व सदर व्याखानास उपस्थित राहावे असे पणन मंडळांचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी अवाहन केले.

सौजन्य/ वृत्त - विलासराव कोळेकर सर 

सिडकोची साडेबारा टक्के योजना अंतिम टप्प्यात ; १.८६ टक्के क्षेत्राचे वाटप लवकरच होणार !!

सिडकोची साडेबारा टक्के योजना अंतिम टप्प्यात ; १.८६ टक्के क्षेत्राचे वाटप लवकरच होणार !!

उरण, पनवेल, नवी मुंबई मधील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात दिलासा.

उरण दि २६,स(विठ्ठल ममताबादे) :

रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरांतील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाशी निगडित सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेने अखेर अंतिम टप्प्यात प्रवेश केला असून, एकूण भूखंड वाटपापैकी तब्बल ९८.१४ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सुमारे तीन दशकांहून अधिक काळ प्रलंबित राहिलेल्या या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना हक्काची जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित १.८६ टक्के वाटप पुढील काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्य सरकारनेही अधिवेशनात शेतकऱ्यांना लाभ लवकर देण्याच्या सूचना सिडकोला केल्याने प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र आहे. दोन वर्षांच्या काळात चार संगणकीय सोडती काढणारे विजय सिंघल हे पहिले सिडको एमडी ठरले आहेत.

नवी मुंबई शहर उभारणीसाठी ठाणे जिल्ह्यातील २८, पनवेल तालुक्यातील ३८ आणि उरणमधील २९ अशा एकूण ९५ गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत १२ हजार २६९ भूधारकांना ९०४.४२ हेक्टर क्षेत्र साडेबारा टक्के योजनेतून देणे अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत ८८७.६० हेक्टर क्षेत्राचे वाटप पूर्ण झाले आहे.

सिडकोने नऊ एप्रिल रोजी नऊ विविध नोडमधील एक लाख ११ हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी संगणकीय सोडत जाहीर केली. उर्वरित १६.८२ हेक्टर क्षेत्राच्या वाटपासाठी लवकरच अंतिम सोडत काढण्यात येणार असून, त्यानंतर शिल्लक लाभार्थीना शेवटचे आवाहन करण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

दरम्यान, या योजनेच्या संथ गतीवरून विविध शेतकरी संघटनांकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांनंतर आणि प्रशासनाच्या सक्रिय भूमिकेमुळे आता वाटप प्रक्रियेला गती मिळाली आहे.लवकरच या सर्व प्रकियेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.साडेबारा टक्केचे लाभार्थी हे पनवेल उरण व नवी मुंबई मधील असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणात फायदा होणार आहे.


कोट (चौकट ):- 

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला विषय संचालक मंडळाच्या मान्यतेने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आता जे काही लाभार्थी लाभापासून अजूनही वंचित असतील, त्यांनाही लवकरात लवकर योजनेचा लाभ देऊन, १२.५ टक्के योजना संपल्याचे जाहीर करून तसा अनुपालन अहवाल शासनाला सादर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.          - गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

उरण तालुक्यातील पाणथळीचे अस्तित्व धोक्यात ; निसर्गप्रेमी, पर्यावरणवाद्यांनी केली चिंता व्यक्त !!

उरण तालुक्यातील पाणथळीचे अस्तित्व धोक्यात ; निसर्गप्रेमी, पर्यावरणवाद्यांनी केली चिंता व्यक्त !!

उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण तालुका निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला तालुका आहे. तिसऱ्या मुंबईचा महत्वाचा परिसर असल्यामुळे येथे विविध औद्योगिकीकरण, शहरीकरण मोठया प्रमाणात सुरु आहे. अनेक ठिकाणी वृक्षतोड, मातीचा भराव करणे, झाडे वृक्ष वेली लावण्याकडे दुर्लक्ष करणे आदी विविध कारणांनी उरण तालुक्यातील पाणथळीची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या विविध प्रजातींच्या हजारो पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याची खंत उरण मधील निसर्गप्रेमी,पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

उरणचे खाडी किनारे व पाणथळीवर फ्लेमिंगो उतरत होते. मात्र, येथील पाणथळीवर होणारा मातीच्या भरावामुळे पाणथळी जवळपास नष्ट झाल्या आहेत. या कारणांमुळे पक्षी अन्नाच्या शोधात परिसरातील छोट्या पाणथळीवर येऊ लागले आहेत. उरण परिसरात साधारणपणे ऑक्टोबरअखेरपर्यंत अनेक जातींचे पक्षी येथील पाणथळीवर उतरतात. त्यात जेएनपीए बंदर परिसर पाणजे, फुंडे, जासई व करळ आदी भागांतील पाणथळीवर दरवर्षी पक्षी उतरतातं. पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी असते. स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचे ठिकाण असलेल्या प्रमुख पाणथळ जागा भराव टाकून गाडल्या जात आहेत. आंतरभरतीचे प्रवाह पद्धतशीरपणे नष्ट केले जात आहेत.त्यामुळे विविध सजीव सृष्टी पशु पक्षी यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

'बीएनएचएस'ने सूचीबद्ध केलेल्या सहा प्रमुख पाणथळ जागांपैकी बेलपाडा येथील एक जेएनपीएला भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती व भेंडखळ आणि पाणथळ जागा 'एनएमआयआयए' विकण्यात आल्या आहेत.उरण मधील विविध ठिकाणी असलेल्या पाण थळ चे वेळीच संरक्षण व संवर्धन करण्यात यावे अशी मागणी निसर्गप्रेमी व पर्यावरण वाद्यांनी केली आहे. अन्यथा याचा विपरीत परिणाम निसर्ग चक्रावर, पर्यावरणावर होणार असल्याची चिंता निसर्गप्रेमी, पर्यावरण वाद्यांनी व्यक्त केली आहे.


कोट ( चौकट) :- 

पाणथळी जागा मातीचा भराव करून बुजवण्यात आल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. जैवविविधता राखणारा महत्त्वाचा दुवा त्यामुळे दुरावला गेला आहे.पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.निसर्गाचे, पाणथळ जागेचे, जंगलांचे संरक्षण संवर्धन झाले पाहिजे.अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्यास वेळ लागणार नाही.
  - निकेतन ठाकूर, फ्रेंड्स ऑफ नेचर संघटना सदस्य तथा पर्यावरणवादि कार्यकर्ता उरण

उरणमधील लॉजिस्टिक पार्कवर सिडकोचा हातोडा !!

उरणमधील लॉजिस्टिक पार्कवर सिडकोचा हातोडा !!

अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले.

उरण मधील इतर ठिकाणी असलेल्या अनधिकृत कंटेनर यार्ड वर कारवाई करण्याची मागणी.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
 बेकायदा बांधकामांविरोधात सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाईचा धडाकाच लावला आहे. उरण परिसरातील जांभूळपाडा येथील १ लाख २० हजार ४३७ चौ.मी. जागेवर बेकायदेशीर उभारलेल्या कंटेनर यार्डवर सिडकोने हातोडा चालवला. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.

बेलोंडाखार लॉजिस्टिक पार्क येथे बेकायदेशीरपणे कंटेनर यार्ड उभारल्याची माहिती सिडकोला मिळाली. त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित राजपूत, स्थानिक पोलीस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र - सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे मात्र उरण मध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे, अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी उरण मधील नागरिकांनी केली आहे

उरणची वीज यंत्रणा ऍक्शन मोडवर ; पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर

उरणची वीज यंत्रणा ऍक्शन मोडवर ; पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर 

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
 पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उरण महावितरणतर्फे मान्सूनपूर्व देखभाल मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १० विभागांतील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.सध्याही अनेक कामे महावितरण विभागाने हाती घेतले आहेत.पावसाळा पूर्वी सर्व कामे करणे हे त्यांचे लक्ष आहे.

उपअभियंता विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. तसेच जीटीपीएस सब-स्टेशन ब्रेकर दुरुस्ती, मुख्य वीजवाहिन्यांतील सैल कनेक्शनची तपासणी व दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर देखभाल आदी कामे करण्यात आली.

धोकादायक वीज खांब बदलण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले. करंजा, मोरा आणि चिरनेर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली असून उर्वरित भागांत . टप्प्याटप्प्याने कामे केली जाणार आहेत.

नागरिकांना पूर्वसूचना देऊन वारंवार माहिती दिली जात आहे.ज्या भागांत कामे होणार आहेत, तेथील नागरिकांना मोबाइल ऍपद्वारे पूर्वसूचना दिली जात आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर असून उरणची वीज यंत्रणा आता ऍक्शन मोडवर दिसत आहे.

स्वच्छतेच्या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या दोन रुपये करामुळे प्रवाशी, नागरिकांच्या खिशाला बसणार कात्री !!

स्वच्छतेच्या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या दोन रुपये करामुळे प्रवाशी, नागरिकांच्या खिशाला बसणार कात्री !!

** सर्व स्तरातून होतेय टीका.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थातच एस.टी. महामंडळाने १५ एप्रिलपासून तिकीटदरात वाढ लागू केली असून, त्याचा थेट परिणाम प्रवासी वर्गावर होत आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना मोफत असलेला एस.टी. प्रवास आता शुल्क भरून करावा लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या खिशाला कात्री बसणारं आहे. याशिवाय, एस.टी. बस व स्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकी दोन रुपये आकारले जाणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. परिणामी, स्वच्छतेच्या नावाखाली प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड टाकण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

पूर्वी एस.टी. आगार व स्थानकांच्या स्वच्छतेसाठी नियमित कर्मचारी नेमलेले होते. त्यांच्या माध्यमातून बस, आगार आणि स्थानकांची साफसफाई सुरळीत पार पडत होती. मात्र काही वर्षांपूर्वी एस.टी. महामंडळाने ही जबाबदारी खासगी एजन्सीकडे सोपवली. एजन्सीद्वारे कामगार नेमून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु वेतनाच्या प्रश्नामुळे हे कामकाज अडचणीत आले आणि कामगारांची संख्या कमी होत गेली. आता पुन्हा स्वच्छतेच्या खर्चासाठी थेट प्रवाशांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकीटदरात वाढ करून दोन रुपये स्वच्छतेसाठी आकारले जात आहेत. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेली मोफत प्रवास योजना देखील बदलण्यात आली असून, आता त्यांनाही दोन रुपये तिकीट म्हणून द्यावे लागणार आहेत. उरण ते पुणे तसेच इतर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटामागे दोन रुपयांपासून १५ ते २० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. महिला सन्मान योजनेंतर्गत पूर्वी असलेल्या तिकीट पेक्षा आता दर वाढले आहेत. उरण ते स्वारगेट पुणे, उरण ते अलिबाग प्रवासाचे तिकीट दर वाढले आहेत. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत असलेला प्रवास आता किमान दोन रुपये खर्च करून करावा लागत आहे. दरम्यान, एस.टी. च्या स्वच्छतेसाठी पुन्हा एकदा खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे ही एजन्सी प्रत्यक्षात कितपत स्वच्छता राखते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांकडून गोळा होणारा पैसा खासगी एजन्सीकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. या निर्णयामुळे प्रवासी वर्गात नाराजीचे सूर उमटत असून, एस.टी. महामंडळाच्या या धोरणावर टीका होत आहे.महामंडळ ने स्वच्छतेसाठी नियुक्त केलेले खाजगी एजन्सी किती चांगल्या पद्धतीने काम करतात तसेच किती दिवस चांगल्या पद्धतीने काम करतात हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !! *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव...