अतिवृष्टीमुळे कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण !
कल्याण : मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका जसा सामान्य लोकांना बसला तसाच तो रस्त्यांनाही बसला आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांची चाळण झालेली पहायला मिळते आहे.
महापालिका क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्डयांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हेच खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय. या खर्चावरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा खर्च गरजेपेक्षा जास्त असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका दरवर्षी खड्डे भरण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते. यंदा खड्डे भरण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले आहे. पालिकेकडून पावसाळ्य़ापूर्वी खड्डे भरण्याचे काम दरवर्षी केले जाते. मात्र गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवलीत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे हे खड्डे चालकांच्या निदर्शनास येत नसल्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे खड्डेभरणीची कामे करणे शक्य होत नाहीत. त्यामुळे पाऊस थांबताच खड्डे बुजविण्याची कामे पुन्हा हाती घेण्यात येणार आहेत. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment