स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा : काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
मुंबईसह राज्यातील अन्य शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, जुन्या इमारतीचा विकासका ऐवजी स्वतःच पुनर्विकास (Self Redevelopment) करावा, ज्यामुळे सभासदांना, सदनिकाधारकांना जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी राज्य सरकारने 2019 मध्ये सोसायट्यांना वित्त पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे धोकादायक, जुन्या व पुनर्विकास करणे गरजेचे असलेल्या अनेक गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या आत्मविश्वासाने स्वयंपुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्यानंतर स्वयं पुनर्विकासासंबंधी रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे बँकानी कर्ज देण्यास नकार दिल्यामुळे मुंबई शहर, उपनगर व राज्यातील इतर शहरातील अनेक सोसायट्या व अपार्टमेंट यांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडचणी येत आहेत असे काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी पत्रात म्हटले आहे कि, सोसायट्यांच्या माध्यमातून संबंधीत विभागाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर कोणताही विलंब न लावता सरकारने यासाठी मंजुरी दिली. मंजुरी मिळालेल्या सोसायट्यांनी बँकेकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर स्वयं पुनर्विकास प्रकल्पासाठी विशेषत: मुंबई बँकेने तर काही प्रकल्पांना मागणी केल्याप्रमाणे कर्ज मंजुर केल्याची पत्र सुद्धा दिली आहेत. त्यामुळे रहिवाश्यांनी मोठ्या आत्मविश्वसाने आपल्या सदनिका, आपली घरे खाली करून संस्थेच्या ताब्यात दिली परंतु रिझर्व्ह बँकेने कर्ज देण्यासाठी निर्बंध घातल्याने बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने हे प्रकल्प रखडले आहेत म्हणून अशा प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारने सहकारी बँकामार्फत अथवा राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येत असलेल्या वित्त महामंडळाकडून निधी उपलब्ध करून दयावा व आर्थिक संकटामुळे अडचणीत असलेले स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करावी अशी मागणी सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment