Sunday, 29 October 2023

अभिनेत्री कोकण कन्या दिपा परब - चौधरी " कोकण रत्न" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !!

अभिनेत्री कोकण कन्या  दिपा परब - चौधरी " कोकण रत्न" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !!

कोकण रत्न अवॉर्ड प्रदान करताना सामाजिक कार्यकर्त्या गिताली पवार आणि दयानंद कुबल

मुंबई, (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) :

             ज्यांनी इयत्ता ८वी मध्ये असतानाच अभिनयाला सुरुवात केली, २००१ पासून हिंदी व मराठी  सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली.अलीकडेच प्रदर्शित झालेला सुपरहिट सिनेमा  'बाईपण भारी देवा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री कोकणची कोकणकन्या सौ.दीपा परब - चौधरी यांना या वर्षीच्या कोकण संस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनानीमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय" कोकण रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.अमेय देसाई यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.दादर, मुंबई येथे आज पार पडलेल्या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यामध्ये  सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश  कदम, अमित  कुबडे, निखिल  सकपाळ, अनमोल  यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.डॉ अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ.तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.
              कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर या सांस्कृतिक नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
         अभिनेत्री दीपा परब यांनी सन्मान स्वीकारल्यावर मालवणीतून आपल्या संबोधनाला सुरुवात केली व म्हणाल्या कि माझे वडील असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता कारण एका सामाजिक संस्थेने माझा आज गौरव केला आहे. आम्ही कलाकार आहोत आम्हाला कामाचे मानधन मिळते पण गरजूंसाठी अविरत मोफत काम करणाऱ्या कोकण संस्थेचे मला खूप कौतुक वाटते, हे काम कठीण तर आहेच पण   कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय असून आणि प्रेरणादायी आहे. काशिनाथ धुरू हॉल मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ.गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह शेकडो सांस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिनेते अक्षय ओवळे तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...