Friday, 17 April 2026

कासारकोळवण गावासाठी ऐतिहासिक निर्णय घेत ६. ५० कोटींच्या पुलास मंजुरी; ४० /४५ वर्षांची प्रतीक्षा संपली, ग्रामस्थांचा जल्लोष !!

कासारकोळवण गावासाठी ऐतिहासिक निर्णय घेत ६. ५०  कोटींच्या पुलास मंजुरी; ४० /४५ वर्षांची प्रतीक्षा संपली, ग्रामस्थांचा जल्लोष !!

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम) :

                 चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला असून आमदार मा.श्री. शेखरजी निकम यांच्या प्रयत्नातून तब्बल ६.५० कोटी रुपयांच्या पुलास मंजुरी मिळाली आहे. गेल्या चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेली ही गावकऱ्यांची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर पूर्ण झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
              कासारकोळवण गावाच्या दळणवळणासाठी पूल हा अत्यंत आवश्यक होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटत असे, ज्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक वेळा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असायचे. त्यामुळे या पुलाची मागणी मागील ४०/४५ वर्षांपासून सातत्याने होत होती.
              या पार्श्वभूमीवर आमदार शेखरजी निकम यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा ठामपणे मांडला आणि शासनाचे लक्ष वेधून घेतले. तसेच CRF (Central Road Fund) अंतर्गत निधी मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत दिल्ली दरबारी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या चिकाटी, नियोजनबद्ध प्रयत्न आणि लोकहिताच्या भूमिकेमुळे अखेर या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली. ही आनंदाची बातमी कळताच कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी आमदार साहेबांचे आभार मानण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मोठ्या उत्साहात सावर्डे, चिपळूण येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार साहेबांचे स्वागत करत त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सौ. मानसी करंबेळे (सरपंच), प्रकाश तोरस्कर (उपसरपंच), महेंद्र करंबेळे (पोलीस पाटील), नथुराम करंबेळे (तंटामुक्ती अध्यक्ष), राजाराम तोरस्कर (गुरुजी), सुहास मांगले (माजी ग्रामपंचायत सदस्य), उल्हास मांगले, सोन्या मांगले, बाळकृष्ण तोरस्कर, रोशन कदम, प्रशांत करंबेळे, सदानंद करंबेळे (ग्रामपंचायत सदस्य) तसेच गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ग्रामस्थांनी या प्रसंगी भावना व्यक्त करत सांगितले की, “आमच्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला आज प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आमदार साहेबांनी केले आहे. हा पूल आमच्या गावाच्या विकासासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे. आता शिक्षण, आरोग्य, शेती व इतर कामांसाठी होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. ”या पुलाच्या उभारणीमुळे कासारकोळवण गावाचा सर्वांगीण विकास साधण्यास मोठी चालना मिळणार आहे. दळणवळण अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार असून भविष्यातील आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय एक मैलाचा दगड ठरणार असून ग्रामस्थांनी आमदार शेखरजी निकम यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...