पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवाशी महिलेवर बलात्कार व दरोडा !!
"दोन दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात"
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसापासून बलात्कारांच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली असतानाच आता इगतपुरी आणि कसारा दरम्यान आठ दरोडेखोरांनी धावता ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटण्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे.लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली असून कल्याण जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी 2 दरोडेखोरांना ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध घेत आहे. मात्र मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात कल्याण डोंबिवली परिसरात सामूहिक बलात्कार, विनयभंग, छेडछाड आदी घटनांनी परिसर हादरून गेला होता, सामूहिक बलात्काराच्या घटनेत तब्बल २०/३० आरोपीना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या शहरातील मुली,महिला सुरक्षित आहेत का?असा प्रश्न निर्माण झाला होता, ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली.
इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेनच्या बोगी नंबर डी टू मध्ये बसलेले आठ तरुणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरोडेखोरांचा हातात फाइटर आणि बेल्ट होता. धक्कादायक म्हणजे एका प्रवाशी महिलासोबत दरोडेखोरांनी छेडछाड सुरू केली. या वीस वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची माहितीसुद्धा पोलिसांनी दिली आहे. काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कसारा स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना कल्याण जीआरपीने आपल्या ताब्यात घेतले. दोन दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे उर्वरित आरोपींच्या पोलिस शोध घेत आहेत. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.




No comments:
Post a Comment