मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि इको मध्ये झालेल्या भीषण अपघाने घेतला दहा जणांचा बळी !
"मुंबई गोवा महामार्गाच्या सुरक्षेचा" प्रश्न ऐरणीवर...
बोरघर / माणगाव, ( विश्वास गायकवाड ) : गुरवार १९ जानेवारी रोजी पहाटे ०४.४५ वा गोवा मुंबई हायवेवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रेपोली येथे लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी न MH- 48 BT8673 यांच्यामध्ये भीषण अपघात झाला.
या भीषण अपघातामध्ये 5 पुरुष व 3 महिला आणि एक लहान मुलगी एक लहान मुलगा असे एकूण 10 जण मयत झाले आहेत. सदर अपघातामध्ये एक लहान मुलगा जखमी असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले होते मात्र उपचारा दरम्यान त्याचा ही मृत्यू झाला. सदर अपघाता मधील सर्व मयत इसम एकमेकांचे नातेवाईक असून ते हेदवी, ता. गुहागर येथे चालले होते.
अपघातानंतर माणगाव वाहतूक पोलिसां कडून या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सदर भीषण अपघातामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे या महामार्गावर ठीक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालक आणि गाडीतील प्रवासी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. अनेकांनी या महामार्गावरून प्रवास करताना आपला अनमोल जीव आणि कुटुंब गमावली आहेत. या शिवाय सदर महामार्गावरून नेहमी प्रवास केल्यामुळे अनेकांना स्पॉन्डीलायसीस, स्पायनल डिसीज तथा मणक्यांचे विकार जडले आहेत. अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेळेत आणि लवकरात लवकर व्हावे या करीता रायगड प्रेस क्लब चे संस्थापक आणि मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय एस एम देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायगड प्रेस क्लबने अनेकदा रस्त्यावर उतरून गेंड्यांची कातडी परिधान करून वावरणाऱ्या प्रशासनाचे या कडे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने मानवी साखळी पद्धतीने आंदोलने केली आहेत... जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघणाऱ्या दैनिकातून बातम्यांच्या माध्यमातून आगपाखड करून आपापल्या लेखण्या झिजवल्या आहेत. परंतू प्रत्येक वेळी प्रशासनाने केवळ पोकळ आश्वासने दिली मात्र अंमलबजावणी केली नाही... त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे अनेक निरपराध लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत.
No comments:
Post a Comment