Saturday, 4 January 2025

आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटना सलग्न श्रमिक विकास संघटनेचा कल्याण आरटीओ येथे मोर्चा !


आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटना सलग्न श्रमिक विकास संघटनेचा कल्याण आरटीओ येथे मोर्चा !

कल्याण, प्रतिनिधी : दिनांक 2 जानेवारी 2025, बुधवार रोजी आप रिक्षा-टॅक्सी वाहतूक संघटना यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी  उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण. (R.T.O) ला भेट देऊन सीएनजी बाटला टेस्टिंग सेंटर्स चे ट्रेड सर्टिफिकेट रद्द करण्याबाबत निवेदन पत्र दिले. व कल्याण रिक्षा - टॅक्सी संघर्ष कृती समिती यांनी केलेल्या सीएनजी बाटला दरवाढ कमी करण्यासाठी जे उपोषण केले त्यांनाही जाहीर पाठिंबा दिला. व सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण, यांच्याही कार्यालयात जाऊन मोबाईल ने फोटो काढून रिक्षा चालकांवर लावणारे दंड कारवाई बंद करण्यासंदर्भात निवेदन पत्र दिले. 

या वेळी सौ निलम निलेश व्यवहारे, आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटना संस्थापक, श्री विनोद सुर्वे, श्री संतोष वराडे, अन्सार भाई, अकिफ डोलारे, श्री निलेश मुरलीधर व्यवहारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष - श्रमिक विकास कामगार संघटना तसेच अनेक रिक्षा टॅक्सी व्यवसायिक उपस्थित होते.

*सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त* बहुजन विकास संघातर्फे महिलांचा सन्मान !


 *सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त* बहुजन विकास संघातर्फे महिलांचा सन्मान !

** ठाणे दि. ४ जानेवारी २०२५

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बहुजन विकास संघातर्फे ठाण्यात वाल्मिकी समाजातील महिलांचा सन्मान करण्यात आला. साठे वाडी येथे बहुजन विकास संघाच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सोनी चौहान यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ॲड मीना बागडी,  सविता भगवाने,  रितुका बाल्मिकी, मनिषा चिंडालिया आदी महिलांना यावेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी पुरूष कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  

कार्यक्रमात “ स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने” ही प्रार्थना ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी सादर केली. व सत्यशोधक विचारांची कास धरून स्त्रियांना सक्षम करण्यासाठी समाजातील पुरूषांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.‌ या वेळी विविध महिला कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना सावित्रीमाईं बद्ल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बिरपाल भाल,  नरेश भगवाने, नरेश बोहित यांचीही भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने महिलां सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात राजेश चिंडालिया , राम वाल्मिकी, दिनेश मेहरोल, अनिल वैद आदी ही उपस्थित होते.

आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजातील जननायक जयपाल सिंह मुंडा यांची जयंती साजरी !

आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजातील जननायक जयपाल सिंह मुंडा यांची जयंती साजरी !

जव्हार-जितेंद्र मोरघा

जयपाल सिंह मुंडा हे भारतीय संविधान सभेचे आदिवासी समाजातील सदस्य होते, त्यांचे देशासाठी तसेच आदिवासी समाजासाठी मोठे योगदान आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणे हे आपले कर्तत्व आहे, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, पालघर या तालुक्यात आदिवासी जननायक जयपाल सिंह मुंडा यांची जयंती साजरी करुन अभिवादन करुन जयपाल सिंग मुंडा यांचे विचार जनमाणसांत पोहचले पाहिजेत आणि त्यासाठी सर्वांनी यापढे काम केले पाहीजे असे अनंता वनगा यांनी सांगितले, जयपाल सिंह मुंडा यांची जयंती साजरी करताना आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा अनंता वनगा, पालघर जिल्हाध्यक्ष अरुण खुलात, वाडा तालुका अध्यक्ष गुरुनाथ वळवी, पालघर तालुका अध्यक्ष एकनाथ पिलेना, जव्हार तालुका अध्यक्ष भाऊ दिघे, विक्रमगड तालुका अध्यक्ष सदा गवारी तसेच तालुका कमिटी सदस्य सुदाम उंबरसाडा,वाडा शहर अध्यक्ष नरेश ठाणगे, कायदे विषयक सल्लागार अँड. किरण भोईर उपस्थित होते.

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ऑलंपियाड स्पर्धा २०२४ चा आदर्श विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ऑलंपियाड स्पर्धा २०२४ चा आदर्श विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !

घाटकोपर, (केतन भोज) : एम.के,सि.एल मायक्रोलिक कॉम्प्युटर आणि मायक्रोलिंक फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ऑलंपियाड स्पर्धा २०२४ चा आदर्श विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा मायक्रोलिंक कॉम्प्युटर सेंटर घाटकोपर पश्चिम याठिकाणी पार पडला. यावेळी सार्थक आढळराव, श्रवण यादव, सार्थक हडवले, संचित पाटील, लेखा कांबळे, मानसी कणेरी, वेदांत गायकवाड, श्रावणी जाधव, साक्षी महाबदी, समीक्षा कोरडे, वैभवी कोटकर, श्रेया मोरे, मंदार सैदाणे, वेदिका वाणी, सिद्धी कांबळे, रिया सकपाळ, देवांग भालेराव, आराध्य राऊत, अनुष्का कदम, सोनल कदम, प्रसाद पवार यांना मायक्रोलिक कॉम्प्युटर, मायक्रोलिंक फाऊंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक सचिन मनवळ यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी २०२४ ने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

*" व्यंगचित्र एक दुर्मीळ मात्र उत्तम कला - प्रशांत कुलकर्णी, जेष्ठ व्यंगचित्रकार, दै. लोकसत्ता "*

*" व्यंगचित्र एक दुर्मीळ मात्र उत्तम कला - प्रशांत कुलकर्णी, जेष्ठ व्यंगचित्रकार, दै. लोकसत्ता "*

शोभा हेल्थ एड इंडीया व अभय शिक्षण केंद्र विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने *जेष्ठ समाजसेविका दिवंगत शोभा खानविलकर यांच्या १७व्या स्मृतिदिनानिमित्त* सालाबादाप्रमाणे दि. २८ डिसेंबर रोजी व सुपर स्पेशालिटी भव्य वैद्यकिय शिबीर व दि. २९ डिसेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी लोकसत्ताचे जेष्ठ व्यंगचित्रकार, श्री प्रशांत कुलकर्णी यांची जाहीर मुलाकात व त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. विक्रोळी कन्नमवार नगर येथिल स्थानिक नागरिकांचा याला उत्तम  प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे सचिव डॉ. अलंकार खानविलकर व स्थानिक शिवसेना महिला शाखाप्रमुख श्रीमती रश्मीताई पहूडकर  यांच्या हस्ते श्री. प्रशांत कुलकर्णी यांचा सपत्निक सत्कार सन्मानचिन्ह, शाल-श्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यांची जाहीर मुलाकात डॉ. विष्णू भंडारे यांनी घेतली, यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रकारिता या दुर्मीळ कलेच्या आजपर्यंतच्या प्रवासाबाबत त्यांना विविध प्रश्नांद्वारे बोलते केले, त्यांनी अत्यंत दिलखूलासपणे सर्व‌ प्रश्नांना जाहीरपणे  उत्तरे दिली.

व्यंगचित्रकार कोणीही होऊ शकतो पण त्यासाठी इच्छा व मेहनत करण्याची तयारी असासला पाहिजे. इतरांपेक्षा वेगळे असणे याला नाविन्य म्हणतात. व्यंगचित्र व्यापक आहे यामध्ये पॉकेट कार्टून, विनोदी कार्टून, राजकीय व्यंगचित्र, ऍनिमेशन इत्यादी प्रकार आहेत. एक ॲनिमेशन कार्टून काढण्यासाठी २२ चित्रे काढावी लागतात. मुंबईत जवळजवळ ४० ते ५० ॲनिमेशन स्टुडिओ आहेत. मी आजपर्यंत २५ हजार पेक्षा जास्त व्यंगचित्रे काढून प्रसिद्ध केली, अशा अनेक गोष्टी त्यांनी मुलाखातीद्वारे सांगितल्या.

एखादे वादग्रस्त राजकीय व्यंगचित्र काढताना तुम्हाला भीती वाटते का?, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की जर भीती वाटत असेल तर त्यांनी व्यंगचित्र काढू नये. व्यंगचित्र काढण्यासाठी विनोद बुद्धी असावी लागते असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण नसताना व्यंगचित्र ही कला मी इतरांकडे बघूनच शिकलो, असेही त्यांनी सांगितले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांनीदेखील माझ्या राजकीय व्यंगचित्रांना चांगला अभिप्राय दिला. त्यांनी त्यांची काही निवडक व्यंगचित्रे स्क्रिन द्वारे उपस्थित श्रोत्यांना  दाखवली. यामध्ये डुकरांना देखील घाण वाटेल अशा निवडणूक प्रचाराचे व्यंगचित्र, कॉम्प्युटर पेक्षा मैदानी खेळ खेळावेत, पंधरा वर्षानंतर हस्ताक्षर म्हणजे काय हे मुलांना विचारावे लागेल अशा आशयाची त्यांची व्यंगचित्रे देखील त्यांनी दाखवली. तसेच काही व्यंगचित्रे प्रत्यक्षात काढूनही त्यांनी दाखवली. 

कार्यक्रमाचा समारोप सर्वांचे आभार‌ मानून सामुहीक राष्टगिताने करण्यात आला. त्यानंतर देखिल काही उपस्थित श्रोत्यांनी कुलकर्णी सरांसोबत अनौपचारिक संवाद साधला व चांगला अभिप्राय दिला.

*डॉ. अलंकार खानविलकर* *(विश्वस्त-सचिव, शोभा हेल्थ एड इंडीया, मुंबई )*

सौजन्य - अश्विनी निवाते 

विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे नाट्यलेखक यशवंत माणके लिखित/दिग्दर्शीत "मुक्तांगण" या दोन अंकी नाटकाचा प्रयोग !

विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे नाट्यलेखक यशवंत माणके लिखित/दिग्दर्शीत "मुक्तांगण" या दोन अंकी नाटकाचा प्रयोग !

** दुबल्या आई - बापाची व्यथा व्यक्त करणारे ह्रदयस्पर्शी नाटक 

मुंबई - ( दिपक कारकर )

गेली अनेक वर्षे नाट्यक्षेत्रात आपलं आयुष्य वेचत नाट्यरसिक व रंगभूमीची सेवा करणारे गुहागर तालुक्यातील भूमिपुत्र सुप्रसिद्ध नाटककार/नाट्य कलावंत यशवंत माणके लिखित/दिग्दर्शीत असणारा एक नवा विषय रंगभूमीवर आणला आहे.रविवार दि.५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०. ३० वा.वृद्धाश्रमवर आधारित "मुक्तांगण" ह्या दोन अंकी नाटकाचा पाचवा प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी ( नवी मुंबई ) येथे होणार आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांना नाटक नव्हे तर दुबळ्या आईबापाची व्यथा पहायला या असे प्रतिपादन नाट्यलेखक यशवंत माणके केले आहे. तीन पिढ्या एकत्रित बसून बघावे असे एकमेव नाटक "मुक्तांगण" नवी मुंबईकरांसाठी ही सुवर्णसंधी आहे, वृद्धाश्रमातील बोलक्या व्यथा प्रत्यक्ष पहा. अशी नाट्यकलाकृती पाहण्यासाठी मोठया संख्येने या व कलाकारांना प्रोत्साहित करा व अधिक माहितीसाठी / तिकीटसाठी - ९८१९८७५६४८  सदर भ्रमणध्वनी वरती संपर्क करावा असे संयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Friday, 3 January 2025

उल्हासनगर मध्ये भूमाफियांनी दाखल केलेल्या खोट्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांचकडे प्रहारच्या मागणीला यश !!

उल्हासनगर मध्ये भूमाफियांनी दाखल केलेल्या खोट्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांचकडे प्रहारच्या मागणीला यश !!

खंडणी घेतल्याबाबत कोणतेही पुरावे नसतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील व राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्यावर मागील महिन्यांत २८ तारखेला हिललाईन पोलिस स्थानकात १ कोटी रुपयांची खंडणी मागत ५ लाख खंडणी घेतल्याबाबत खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला . 

हा गुन्हा खोटा असून अश्या खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होवू शकतात याबाबत अगोदरच पाटील यांनी लेखी पत्राद्वारे पोलिस विभागाला कळविले होते .खंडणीच्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतेही पुरावे नसतांना खोडसाळ पद्धतीने गुन्हा दाखल करून उल्हासनगर मधील नगररचनाकार श्री ललित खोब्रागडे यांनी केलेला भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप श्री पाटील यांनी करत सदर खोट्या गुन्ह्याविरोधात संबंधितांवर कारवाई होण्याकरीता आज दिनांक ३ जाने २०२५ रोजी मा. पोलिस आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते सदर आंदोलनाची राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी थेट दखल घेत पोलिस आयुक्तांची भेट घेतली .त्या अनुषंगाने मा. पोलिस आयुक्तांनी सदर तपास स्वतःच्या निरीक्षणात क्राईम ब्रांचकडे सखोल चौकशी करीता सुपूर्द करत असल्याचे आदेश देत संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आश्वासन दिले . 

अश्या प्रकारे खोटे गुन्हे नोंद करणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व वकील एकजुटीने सामील झाले .

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २७ गावांचा पाणी प्रश्न मार्गी !

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २७ गावांचा पाणी प्रश्न मार्गी !

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश ; ३५७.१७ कोटींच्या अमृत योजनेला राज्य शासनाची मंजुरी 

डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिकेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने ३५७ कोटी १७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली आहे. यामुळे २७ गावाना अनेक वर्षापासून भेडसावणारा पाणी प्रश्न पुढील अनेक वर्षासाठी सुटणार आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या २७ गावातील नागरिकांची अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नातून सुटका होणार असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रोकांत शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावाना तीव्र पाणी टंचाई भेडसावत असल्याने नागरिकाकडून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी होत होती. म्हणून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या त्रुटी दूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना केली जाणार आहे अशी विचारणा केली.असता राजेश मोरे यांनी सांगितले की, निवडणूक प्रचारादरम्यान देखील २७ गावातील नागरिकांची ओढाताण प्रकर्षाने दिसून आल्यामुळे आमदार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात या भागासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करावी तसेच पाण्याचा कोटा  वाढविण्याची मागणी केली होती. तर या भागाचे खासदार असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार बैठका घेत वाढीव निधी मंजूर करण्याकरिता सतत प्रयत्नशील होते. त्यांनी या योजनाचा वेग वाढवत पाणी प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले होते.त्यांच्या प्रयत्नानंतर या योजनेसाठीच्या वाढीव निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

२७ गावात २८ जलकुंभ, २ भूस्तर टाक्या आणि ११ संप पंप हाउस, वितरण व्यवस्था  यासारखी कामे करण्यासाठी राज्य शासनाने ३५७ कोटी १७ लाखाचा निधी मंजूर केला आहे. यामुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेची कामे वेगाने पूर्ण होऊ शकणार आहेत. एकीकडे निधी मंजूर करतानाच ही सर्व कामे मे अखेर पर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून दिलेल्या मुदतीत कोणत्याही परिस्थितीत ही कामे पूर्ण करत नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याचे निर्देशच आमदार राजेश मोरे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळेच नागरिकामध्ये देखील आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेत त्याची तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉकटर श्रीकांत शिंदे यांचे आमदार राजेश मोरे आणि या २७ गावातील नागरिकांनी आभार मानले आहेत.

सावित्रीबाई फुले शाळेत मराठी शाळा वाचवा मोहीम !

सावित्रीबाई फुले शाळेत मराठी शाळा वाचवा मोहीम !

** सावित्रीच्या वेषात हातात फलक घेत मुलींनी दिला नारा 

घाटकोपर, (केतन भोज) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून आज साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळेतील मुलींनी मराठी शाळा वाचवण्याचा नारा दिला. हातात फलक घेत मुलींनी यावेळी शासनाकडे मराठी शाळा वाचवा अशी मागणी केली. साकीनाका येथील सावित्रीबाई फुले ही मुलींची शाळा असून 1984 साली तिची स्थापना केली. त्यावेळी शाळेची तीन हजार पट संख्या होतो. शासनाचे मराठी शाळांकडे दुर्लक्ष्य होत असल्याने आज सर्वच मराठी शाळांची दुरवस्था झाली आहे. 

प्रत्येक मराठी शाळांची पट संख्या कमी होत आहे. साकीनाका येथील सावित्रीबाई फुले या शाळेत यावेळी 185 मुली शिक्षण घेत आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतात दुसरीकडे मराठी शाळांची पडझड होत आहे दुःखाची बाब आहे. मराठी शाळा टीकल्याच पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही सावित्रीबाई फुले जयंती दिनी ही मागणी केल्याचे शाळेच्या संचालिका ज्योती सुभेदार यांनी सांगितले.

सावित्री दिनी मुलीचं बनल्या शिक्षिका !

सावित्री दिनी मुलीचं बनल्या शिक्षिका !

घाटकोपर, (केतन भोज) : पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज साकीनाका येथील समता विद्या मंदिरात मुलींनी सावित्रीबाईचां वेष परिधान करत कपाळाला चिरी गोंधून शाळेत प्रवेश केला. आजचा संपूर्ण दिवसाचा वर्गातील विषयाचा तास मुलींनीच घेतला. शाळेचे सचिव राजेश सुभेदार आणि कार्याध्यक्ष ज्योती सुभेदार यांच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रम होत असतात आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वर्गातील संपूर्ण विषयांचे तास मुलींना देण्यात आले. पन्नास हून अधिक विद्यार्थिनीनी सावित्रीचा वेष परिधान केला होता. शाळेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर पुणे येथील भिडेवाडा या ऐतिहासिक वास्तूंचे चित्र उभारण्यात आले होते. सकाळी मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना अभिवादन केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मुलींना सर्व क्षेत्रात प्राधान्य आहे. त्यांनी हाल सोसले , शेणाचे गोळे झेलले म्हणून आज आम्ही ताठ मानेने वावरत आहोत. अन्याय ठेचून काढायचं असेल शिक्षणा शिवाय पर्याय नाही हेच आम्हाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुळे कळते असे पूजा जाधववर या विद्यार्थीनीने प्रतिक्रिया देताना सांगितले.

Thursday, 2 January 2025

कुणबी युवक मंडळ दापोली आणि कुणबी युवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन !

कुणबी युवक मंडळ दापोली आणि कुणबी युवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन !

मुंबई, (केतन भोज) : नालासोपारा नगरीत प्रथमच "संकल्प नवा, ध्यास नवा, प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा" हे ब्रीद वाक्य घेऊन कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका दापोली संलग्न कुणबी युवक मंडळ दापोली आणि कुणबी युवा प्रतिष्ठान (रजि.), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर रविवार, दि.५ जानेवारी २०२५ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नूतन विद्यामंदिर, नगिनदासपाडा, नालासोपारा (पूर्व) याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वतीने विजय नायनाक (अध्यक्ष), प्रमोद खेराडे (उपाध्यक्ष), नरेश घरटकर (सचिव), संतोष पांढरे (युवाध्यक्ष) तसेच कुणबी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय गौरत यांनी केले आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करत २५६ रक्तदात्यांच्या निस्वार्थ रक्तदानाने अभूतपूर्व रक्तदान सोहळा उत्साहात संपन्न झाला !

नवीन वर्षाचे  स्वागत करत २५६ रक्तदात्यांच्या निस्वार्थ रक्तदानाने अभूतपूर्व  रक्तदान सोहळा उत्साहात संपन्न झाला !

मुंबई - निलेश कोकमकर 
            चालू वर्ष सरत आले की अनेकांना वेध लागेलेले असतात ते नवीन वर्षाच्या स्वागताची. वर्षाची सुरुवात कुठे तरी बाहेर सहलीला जाऊन, मित्रांसोबत दारू घेऊन बसून मनसोक्त आनंद घ्यायचा आणि नवीन वर्षाची सुरूवात करायची. त्याला अपवाद असे काही आहेत त्या मध्येच अग्रेसर आहेत ते म्हणजे रक्तदाते. त्यांना माहीत आहे की रक्त कुण्या कारखान्यात बनत नसतं ते शरिरातच निर्माण होत असतं आणि मानवी रक्तच माणसाला जीवनदान देऊ शकत, म्हणूनच  रक्तदान करून रुग्णाला जीवनदान देण्याचे महान कार्य हे रक्तदाताच करू शकतो. 

          युनिक ब्लड मोटिव्हेटर्स आणि रूग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्था (रुग्णमित्र)  यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि संडे फ्रेंड्स, रोटरी क्लब ऑफ चेंबूर, सत् करम फाउंडेशन, इनर व्हील क्लब ऑफ नॉर्थ ठाणे, श्री प्रतिष्ठान  - ठाणे, वेदांत फाऊंडेशन, मालवणचो कट्टो प्रतिष्ठान, ऋतेश चॅरिटेबल ट्रस्ट, भंडारी युवा फाऊंडेशन, सायन रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान सोहळा २०२५ ह्या सोहळ्यात  रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात हसू उमलण्यासाठी  निःस्वार्थ रक्तदानाची गरज असते  अश्या  २५६ रक्तदात्यांच्या उदंड प्रतिसादाने नवीन वर्षाचा पहिला दिवस रक्तदान करून जोशात साजरा  केला . 
        मुंबईतल्या सर्वच सरकारी हॉस्पिटलमध्ये संपूर्ण राज्यातून तसेच परराज्यातून गरीब , गरजू रुग्ण उपचारासाठी आलेले असतात, त्यांच्या अनेक शस्त्रक्रिया रक्ताविना थांबलेल्या असतात... अपघात , बाळंतपण, डायलेसिस रुग्ण, सिकलसेल रुग्ण, थेलेसेमीयाच्या रुग्णांना आणि अन्य शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते. मुंबई सारख्या शहरात दररोज हजारोंच्या संख्येत रक्त युनिटची गरज लागत असते आणि त्या मानाने रक्त संकलन खूप कमी प्रमाणात होत असताना दिसते. आपलं रक्त अश्या खऱ्या गरजु रुग्णांपर्यंत विनामूल्य पोहचावे म्हणून शक्यतो सरकारी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करावे आणि सरकारी हॉस्पिटलला रक्तदान शिबिर द्यावे असा आमचा आग्रह असतो.  तो ह्याच साठी सर्व रक्तदात्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाने येत्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. आणि इतर संस्थांना सुद्धा हेच सांगणे आहे कि रक्तदान शिबीराकडे कल वाढवला पाहिजे आणि रक्तदाते वाढवले पाहिजेत.   
        सोहळा यशस्वी पार पाडण्याचे सर्व श्रेय युनिक ब्लड मोटिव्हेटर्स व इतर सहकारी संस्थांना तसेच लोकमान्य टिळक रुग्णालयाचे स्टाफचे तसेच या कॅम्प करिता रात्रं दिवस मेहनत घेणाऱ्या सर्व सभासदांचे आहे. असे रक्तदान सोहळे निरंतर सुरु राहतील असा विश्वास सर्व संस्थांना आहे.

Wednesday, 1 January 2025

मांदिवली विद्यालयाची कस्तुरी भानशेचे चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सुयश !

मांदिवली विद्यालयाची कस्तुरी भानशेचे चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सुयश !

कोकण - ( दिपक कारकर )

     सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मांदिवली तालुका दापोली या विद्यालयाने संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण व सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेच्या उद्घाटनाला रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत,चिपळूण संगमेश्वरचे आ.शेखर निकम, चिपळूणच्या माजी सभापती सौ पूजाताई निकम, सह्याद्री निसर्ग मित्रचे संस्थापक अध्यक्ष भाऊ काटदरे, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूणचे अध्यक्ष सचिन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

 या चिपळूण हाफ मॅरेथॉन मध्ये १४ ते १६ वर्ष वयोगटात विद्यालयाचे १० विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कस्तुरी कमलाकर भानशे हिने तृतीय क्रमांक पटकावला.तसेच कु.पियुष मारुती शिगवण याने सातवा क्रमांक पटकावला. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली.

 स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी गुहागरचे विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, भाऊ काटदरे, सचिन कदम डीवाय.एसपी राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक  सुनिल गुढेकर,राम चव्हाण , शिवानी महाजन, शैलेश आंग्रे यांनी केले.

 यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  
आमदार शेखर निकम संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, विश्वस्त, सेक्रेटरी महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, शालेय कमिटीचे चेअरमन श्रीमती गीतांजली वेदपाठक, विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश कोकीळ, कमलाकर भानशे, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल दमामे/तामोंड/भडवळे/कात्रण विद्यालयांचे घवघवीत यश !

५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल दमामे/तामोंड/भडवळे/कात्रण विद्यालयांचे घवघवीत यश !

कोकण - ( दिपक कारकर )

सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दमामे या विद्यालयाने ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल मांदिवली तालुका दापोली येथे दि.१७ ते १९ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनात कु. स्नेहल सुरेश मळेकर इयत्ता आठवी हिने तयार केलेल्या सुरक्षित चहावाटप प्रतिकृतीला प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळाला. 

विजयी स्पर्धेकाचे तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापक अतुल पिटले,विज्ञान शिक्षक कुलाळ सर, विराज सावंत सर, निखिल हरावडे सर सौ. बुरटे मॅडम यांचे शाळा समिती चेअरमन माननीय श्री काका खेडेकर तसेच दमामे/तामोड ग्रामपंचायतचे सरपंच सौ. अर्पिता शिगवण, उपसरपंच श्री. गंगाराम हरावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलास देवघरकर सर्व शाळा समित्यांचे सदस्य व ग्रामस्थ दमामे /तामोंड /भडवळे/ कात्रण यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. पुढील होणाऱ्या जिल्हास्तर प्रदर्शनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटना सलग्न श्रमिक विकास संघटनेचा कल्याण आरटीओ येथे मोर्चा !

आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटना सलग्न श्रमिक विकास संघटनेचा कल्याण आरटीओ येथे मोर्चा ! कल्याण, प्रतिनिधी : दिनांक 2 जानेवारी 2025...