जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !
मुंबई (शांताराम गुडेकर) :
खडावली येथील जी. के. एस. कला,वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालय खडवली तर्फे “Research Methodology and Scientific Writing” (संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखन) या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश संशोधन क्षेत्रातील विद्यार्थी व प्राध्यापकांना संशोधन पद्धती, वैज्ञानिक लेखन तसेच संशोधन प्रकाशन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
ही कार्यशाळा मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यापीठ संकुलातील राजीव गांधी सभागृह, कलिना, मुंबई येथे संपन्न झाली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एम. एच.फुलेकर (वरिष्ठ प्राध्यापक व संशोधन सल्लागार, पारुल विद्यापीठ, वडोदरा), मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.कविता शिकतोडे तसेच शिक्षण संचालक डॉ.बी.एल.जाधव उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.सागर यांनी प्रास्ताविक भाषणात संशोधनाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर डॉ. एम. एच. फुलेकर यांनी विशेष मार्गदर्शनपर भाषण केले.
यानंतर तांत्रिक सत्रास प्रारंभ झाला. पहिल्या सत्रात डॉ.एम.एच.फुलेकर यांनी संशोधन प्रकल्प प्रस्ताव लेखन व निधी संस्थांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या पद्धती यावर मार्गदर्शन केले. डॉ. संगीता पवार (मुंबई विद्यापीठ) यांनी पीएच.डी.प्रवेश प्रक्रिया, नोंदणी व संशोधन शिष्यवृत्ती याबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ.सत्यनारायण कोठे यांनी संशोधन समस्या निश्चित करणे व संशोधन प्रस्ताव तयार करणे यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. संदीप वाघ यांनी संशोधन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध संशोधन पद्धती स्पष्ट केल्या. डॉ. संतोष गीते यांनी सांख्यिकीय पद्धती व डेटा विश्लेषणावर सखोल मार्गदर्शन केले.तसेच डॉ. बी. एल. जाधव यांनी प्रबंध लेखनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली, तर डॉ. अहमद अली यांनी संशोधन प्रकाशने व पेटंट्स याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ही कार्यशाळा संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. सर्वांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा हिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन जाधव यांनी केले. उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांडले यांच्यासह जी. के. एस. महाविद्यालयाच्या शिक्षकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment