खोपटा येथे शतकोत्तर “अखंड हरिनाम व गुरु दशमी सोहळा” !!
** संतश्रेष्ठ गोपाळकाका महाराजांच्या परंपरेचा भव्य उत्सव
उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : श्री परमपूज्य सद्गुरु गोपाळकाका महाराज ट्रस्ट, खोपटे बांधपाडा (उरण) यांच्या वतीने शतकोत्तर परंपरेने साजरा होणारा “अखंड हरिनाम व गुरु दशमी सोहळा तसेच ज्ञानेश्वरी पारायण” महोत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला होता .श्रीमतपरमहंस जीवनमुक्त स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सुरू झालेली ही आध्यात्मिक परंपरा आता १०० वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू आहे.संतशिरोमणी गोपाळकाका महाराजांनी गृहस्थाश्रमात राहून कीर्तन, अभंग, प्रवचनातून भक्ती, नैतिकता, व्यसनमुक्ती व समाजप्रबोधनाचा संदेश दिला.त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक अनुभव व जनकल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे ते जनमानसात संतस्वरूप मानले जातात.त्यांच्या कृपेनेच ही परंपरा पुढे वाढत असून आजही अनेक भक्तांना आध्यात्मिक आधार व मार्गदर्शन मिळत असल्याच्या अनुभूती व्यक्त केल्या जातात.
महोत्सवाचा प्रारंभ माघ शुद्ध षष्ठी, शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी झाला असून समारोप माघ शुद्ध द्वादशी, शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२६ रोजी झाला आहे. या कालावधीत काकडा व आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, भजन, कीर्तन, जागर भजन व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.राज्यभरातील ख्यातनाम कीर्तनकार — ह.भ.प. संजय महाराज पाटील, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, रामकृष्ण महाराज मोकळ, ज्ञानेश्वरी महाराज ठाकूर, वामन महाराज भोर, तुषार महाराज पाटील, नंदकुमार महाराज गावंड आदी मान्यवरांची कीर्तनसेवा भाविक भक्तांना लाभली आहे. विशेष म्हणजे, श्री जीवनमुक्त स्वामी महाराज पादुका पूजन, ग्रंथ दिंडी, महाआरती, तसेच विविध भजन मंडळांच्या सहभागामुळे संपूर्ण खोपटा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता . ग्रामस्थ, वारकरी, महिला मंडळे, युवक मंडळे आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. श्री हेमवर्ण घनश्याम ठाकूर यांनी व ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी उत्तम आयोजन व नियोजन केले होते. भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन नामस्मरण, कीर्तन व ज्ञानेश्वरी श्रवणाचा मोठया प्रमाणात लाभ घेतला. “आम्ही काकांचे वारकरी, नित्य मुखी रामकृष्ण हरी” या जयघोषात खोपटा नगरीत भक्तिरसाचा महापूर दररोज उसळत असून देहू–आळंदीप्रमाणेच हे स्थान वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान बनले आहे.
No comments:
Post a Comment