संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!
उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : संघर्षाला शस्त्र, वेदनांना शक्ती आणि दिव्यांगत्वाला समाजपरिवर्तनाचे साधन बनवत ज्या व्यक्तीने आयुष्य समाजासाठी झोकून दिले, त्या राजेंद्र गजानन पाटील यांच्या सेवाभावी कार्याला दादासाहेब फाळके चित्रपट युनियनतर्फे “उत्कृष्ट समाजसेवक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादरपाडा (उरण) येथील रहिवासी व दिव्यांग सामाजिक संघटना उरणचे उपाध्यक्ष असलेले राजेंद्र पाटील यांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण दिव्यांग समाजाच्या जिद्दीचा गौरव मानला जात आहे.
राजेंद्र पाटील यांनी दिव्यांगत्वाला कधीही मर्यादा मानले नाही. उलट त्यालाच ताकद बनवत त्यांनी असंख्य दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. त्यांच्या दुःखाला स्वतःचे दुःख समजून त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवत त्यांनी हजारो कुटुंबांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण केला.
त्यांचे कार्य केवळ दिव्यांग बांधवांपुरते मर्यादित न राहता आदिवासी पाड्यांवरील वंचित घटक, ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आणि समाजातील प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचले. निःस्वार्थ वृत्तीने केलेल्या या कार्याबद्दल यापूर्वीही द्रोणागिरी भूषण पुरस्कार – २०२४, ग्रामीण विकास कार्यकर्ता, दिव्यांग दूत असे विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.
“हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून उरण तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवाचा आहे,” असे भावनिक उद्गार राजेंद्र पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले. आपल्या यशामागे कुटुंबीयांचा आधार, दिव्यांग सामाजिक संघटनेचे शिलेदार आणि मित्रपरिवार यांचे सहकार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. “यापुढेही माझी सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा अखंड सुरू ठेवणार,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (मुंबई) येथे आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा धांदळे यांच्या हस्ते राजेंद्र पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संतोष शिवदास आमले (अध्यक्ष, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन – महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते.
हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून माणुसकी, जिद्द आणि निस्वार्थ सेवेचा विजय आहे. राजेंद्र पाटील यांच्या कार्यामुळे समाज बदलू शकतो, याची जिवंत साक्ष या पुरस्कारातून अधोरेखित झाली आहे
No comments:
Post a Comment