शहाड येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी !!
*विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वह्या वाटपाने कार्यक्रमाची रंगत*
(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत.)
*शहाड (कल्याण),* मातंग परिवर्तन संघ, कल्याण यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती महोत्सवानिमित्त मार्गदर्शन, वैचारिक प्रबोधन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शहाड येथील मातोश्री कॉलेजमध्ये नुकताच मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगल मोरे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश कापरे सर, श्रमिक (मु.) पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आणि अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस, मा. महेंद्र उर्फ अण्णा पंडीत उपस्थित होते. प्रमुख वक्त्या म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. सुषमा बसवंत व डॉ. सुरेश कापरे यांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन, साहित्यिक योगदान आणि सामाजिक क्रांतीतील त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे कसे गरजेचे आहे यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक व श्रमिक (मु.)पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष,सन्माननीय महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांनी भुषवले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अण्णा पंडीत यांनी समाजावरील सामाजिक अत्याचारा संदर्भात भाष्य करुन समाजावर कोठेही अन्याय अत्याचार झाल्यास आपण सदैव अत्याचाराचा प्रतिकार करण्यास समाजासाठी उपलब्ध असु अशी ग्वाही दिली.तर विशेष अतिथी म्हणून समाजसेवक सुनील उतेकर उपस्थित होते.
*विद्यार्थ्यांचा सत्कार हा केंद्रबिंदू*
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळा होता. यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण घेऊन समाजात पुढे जाण्याचा सल्ला दिला. समाजाच्या प्रगतीसाठी छोटे-छोटे बदल स्वतःपासून सुरू करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच लहान मुलांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर सुंदर भाषणे केली, ज्याचे सर्वांनी कौतुक केले. शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटपही करण्यात आले.
*मान्यवरांची उपस्थिती*
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातोश्री कॉलेजचे किरण खिल्लारे यांनी मोलाचे सहकार्य करत हॉल उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष सोनवणे, मोहन साठे, विवेक लोखंडे, उत्तम भिसे, दीपक सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी दीपक काळे, गणेश साठे, नवनाथ सोनवणे, सुरेंद्र धोत्रे, सुनील भिसे, गुलाब भोंडवे, देवेंद्र मोरे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी विवेक लोखंडे सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment