कोरोंटाईन केलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय व उपासमार शासनाने त्यांच्या किमान दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी - जनतेची मागणी
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधक उपाय म्हणून शासनानाला लाॅकडाऊन वाढवावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र नोकरी धंद्या निमित्ताने ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची आणि चाकरमान्यांची मोठी गैरसोय होऊ लागली त्यामुळे ते आपापल्या गावी मिळेल त्या वाहनाने आणि प्रसंगी पायी चालत जाण्याचा कठोर निर्णय घेतला.
शेकडो किलोमीटर पायपीट करून चाकरमानी आपल्याकडे कुटुंबासह खडतर प्रवास करून आपापल्या गावी पोहचल्यावर त्यांना तेथील सरकारी यंत्रणेने कोरोना विषाणू प्रतिबंधक सुरक्षा म्हणून उपलब्ध असलेल्या शाळा, हायस्कूल, आणि समाज मंदिरात कोरोंटाईन केले. कोरोंटाईन केलेल्या ठिकाणी त्या चाकरमानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना फक्त चार भिंतीचा आधार, एक शौचालय आणि पाणी येवढे सोडले तर बाकी कोणत्याही प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू, जेवणाचे साहित्य वा जेवण तयार करण्याची काहीही साधने नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी कोरोंटाईन केलेल्या नागरिकांची आणि चाकरमानी यांची प्रचंड गैरसोय व कुचंबणा झाली. कारण या ठिकाणी शासनाने त्यांना ज्या अर्थी कोरोंटाईन केले त्या अर्थी शासनाने त्या ठिकाणी त्यांच्या किमान दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. परंतू शासनाने तसे केलेले नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या, तालुक्याच्या आणि गावच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या शाळांमध्ये, हायस्कूल मध्ये आणि समाज मंदिरा मध्ये मुंबई, ठाणे पुणे, गुजरात आदी ठिकाणाहून आपापल्या गावी आलेल्या नागरिकांना कोरोंटाईन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्या माणसांची जेल मधील कैद्यांच्या पेक्षा भयाण व बत्तर अवस्था निर्माण झाली आहे. ज्यांची घरे व नातेवाईक जवळ आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था घरच्या मंडळीं कडून होते. परंतू ज्यांचे कोणीही नातेवाईक वगैरे जवळपास कोणीही नाही त्या लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था होत नाही. वेळ प्रसंगी या लोकांना आपल्या कुटुंबा समवेत पाण्यात बिस्किटे खाऊन दिवस काढावे लागत आहेत. शिवाय ग्रामीण भागात सद्या कोणीही त्यांना जीवनावश्यक मदतीचा हात पुढे करायला येत नाही. म्हणून शासनाने या बाबींचा गांभिर्याने विचार करून किमान तात्काळ त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी अशी सर्व मानवतावादी जनतेतून मागणी केली जात आहे. तरी शासनाने याचा लवकरात लवकर विचार करून कोरोंटाईन करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आणि त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी हीच अपेक्षा.
No comments:
Post a Comment