मुंबईतील मालाड नंतर फोर्ट येथे भानुशाली इमारतीचा भाग कोसळला.
दरवर्षी येणाऱ्या संकटाला जबाबदार कोण?
मुंबई, प्रतिनिधी :
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल शेजारी असलेल्या जीपीओ या ठिकाणी एका इमारतीचा भाग कोसळला आहे. जीपीओ अर्थात जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर असलेल्या शहीद भगत सिंग मार्गावरची इमारतीचा भाग कोसळला आहे. भानुशाली इमारत असं या इमारतीचं नाव आहे. या ठिकाणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी धाव घेतली. इमारतीचा भाग कोसळला त्या इमारतीची दुरुस्ती सुरु होती. दरम्यान या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब लगेच दाखल झाले आहेत. आज दुपारीच २ वाजून ५३ मिनिटांनी मुंबईतील मालाड भागात दुमजली इमारत कोसळली. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरुच आहे. ही घटना ताजी असतानाच दुपारी ४ च्या सुमारास फोर्ट भागातल्या भानुशाली इमारतीचा भाग कोसळला.
या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलं होतं. नोटीस बजावण्यात आल्याने या इमारतीतले काही लोक इमारत सोडून गेले होते. रहिवासी आणि व्यापारविषयक व्यवहारांच्या या इमारतीत ३० ते ३५ घरं होती. एका बाजूची इमारत कोसळल्यानंतरही बाजूला गॅलरींमध्ये काही नागरिक होते. सध्या या ठिकाणी इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इमारत पडू लागल्याने ही इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान या इमारतीचा ४० टक्के भाग कोसळला आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सदर दुर्घटनेत दोन जण दगावले असून दोन जण जेजे रुग्णालयात दाखल केले ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची भीती आहे.
या ठिकाणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आयुक्त इकबाल सिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुध्दा घटनास्थळी धाव घेतली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले सदर इमारत धोकादायक म्हणून महानगरपालिकेने आधीच घोषित करून खाली करण्यात आली होती पण लॉकडाऊनच्या काळात काही कुटुंब तिथे रहायला आले. सर्व प्रकरणाची रितसर चौकशी करून इमारत मालक व संबंधित दोषी लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
तरी हा प्रश्न शिल्लक रहतो की मुंबईत दरवर्षी अशा दुर्घटना घडतात त्यानंतर चौकशी करणे गुन्हा दाखल करणे या गोष्टी कितपत योग्य आहेत. अजूनही मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या १६ हजारांच्या आसपास आहे त्यातही दक्षिण मुंबईत संख्या जास्त आहे त्यातील काही इमारती ७० ते ८० वर्षे पेक्षा जास्त जुन्या आहेत. महापौर यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले तर आयुक्तांनी जबाबदारी म्हाडावर ढकलली या पेक्षा पावसाळ्याच्या आधीच पोलीसांच्या सहकार्याने या इमारती खाली करून त्यांची पर्यायी व्यवस्था केली तर कितीतरी नाहक बळी जाणे वाचेल.



No comments:
Post a Comment