Friday, 3 July 2020

वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव करणाऱ्या गृहनिर्माण संकुलावर कारवाई सुरू. !! "ठाणे जिल्हा उपनिबंधकांकडून नोटिसा"

वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव करणाऱ्या गृहनिर्माण संकुलावर कारवाई सुरू. !!
"ठाणे जिल्हा उपनिबंधकांकडून नोटिसा"


गृहसंकुलांमध्ये येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना रोखू नका, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आठ गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधक विभागाने शुक्रवारी नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागवले. या नोटिसींनंतरही वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव केल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची समिती बरखास्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

करोना टाळेबंदी जूनमध्ये शिथिल करण्यात आली. त्यानुसार ७ जूनपासून वृत्तपत्र वितरणास परवानगी देण्यात आली होती. वृत्तपत्रांमुळे करोना संसर्ग होत नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. तरीही गृहसंकुलाचे पदाधिकारी वृत्तपत्रामुळे करोना संसर्ग होण्याची भीती दाखवून वृत्तपत्र वितरणास विरोध करीत होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी गृहनिर्माण संस्थांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना गृहसुंकलात येण्यास मज्जाव करू नये, असे स्पष्ट केले होते. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशांची माहिती गृहनिर्माण संस्थांना देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी लेखी आदेश काढून त्यात गृहसंकुलांमध्ये वृत्तपत्रे वितरणास येणाऱ्या विक्रेत्यांना रोखू नका, असे आदेश दिले होते. मात्र, काही पदाधिकारी या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ करत होते.

याबाबत गृहसंकुलातील सभासद तसेच ‘ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन’चे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी उपनिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन ठाणे शहराचे उपनिबंधक विशाल जाधवर यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागविले आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधून त्यांना समजही दिली आहे. टपाल सुरू असले तरी नोटीस पाठवण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शुक्रवारी आठ गृहसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती उपनिबंधक विभागातून देण्यात आली.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...