राज्यात १२,५०० पदांसाठी पोलिस भरती, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : गृहमंत्री अनिल देशमुख
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना, कृषी महोत्सव योजना व इतर योजनांना आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी !
राज्यात 12,500 पोलिसांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत या बैठकीविषयी माहिती देताना अनिल देशमुखांनी म्हटलं, "आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्र 12 हजार 500 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होणार आहे."
पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. या निर्णयामुळे राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या तरुण-तरुणींना पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे."
पोलीस शिपाई संवर्गातल्या 100% रिक्त जागा भरण्याचा आणि पदभरतीसाठी अर्थ विभागाच्या 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयातल्या तरतुदींमध्ये सवलतही देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना संकटानंतर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नोकर बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर बेरोजगार तरुण-तरुणींसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांवर तातडीने आणि मोफत उपचार व्हावेत, यासाठी ही योजना आखण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.
केवळ रस्तेच नाही तर रेल्वे आणि घरात घडणाऱ्या अपघातांचाही यात समावेश असेल. यासाठी राज्यातल्या अनेक रुग्णालयांना योजनेत समाविष्ट करून घेण्यात येईल. योजनेसाठी 125 कोटी रुपये लागणार आहेत.
याशिवाय, राज्यात कृषी महोत्सव योजना राबवण्यासही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. अंबडमध्ये जिल्हा व तालुका न्यायालय स्थापना करणे आणि त्यासाठी पद निर्मिती करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

No comments:
Post a Comment