कोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा !
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण 85 हजार 428 इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
फक्त सप्टेंबर महिन्यात 32 हजार 969 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान एकूण 1 लाख 17 हजार 843 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मंत्री श्री.मलिक यांनी दिली.
मंत्री श्री.मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

No comments:
Post a Comment