कल्याण तालुक्याला तौत्के चक्रीवादळाचा तडाखा, घरांचे पत्रे, लाईटपोल, झाडे पडली, पंचनामे वेगात सुरू!
कल्याण, (संजय कांबळे) : काल आलेल्या तौत्के चक्रीवादळाचा तडाखा कल्याण तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागाला बसला असून गोवेली, ठाकूरपाडा, आपटी, आदी गावातील घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर बहुतेक ठिकाणी लाईटपोल पडल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाला आहे. नुकसानग्रस्त भागाचे वेगाने पंचनामे करण्याचे काम सुरू केले असून लवकरच नुकसानीचा अंदाज येईल. असे तहसीलदार दिपक आकडे यांनी सांगितले.
काल राज्यातील कोकण किनारपट्टीवर तौक्क्ते चक्रीवादळ धडकले, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या भागांना याचा मोठा फटका बसला. तसेच ठाणे जिल्ह्यातील दिवा, शिळ, शहापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्याला देखील बसला.
कल्याण मधील गोवेली ठाकूरपाडा येथील आदिवासी कुटूंब सुरेश लुखा हिंदोळे याच्या घराचे पत्रे तर गणपत लुखा हिंदोळे याचे बाथरूम चे पत्रे, जीवनदिप महाविद्यालयाचे पत्रे, आपटी गावातील महेंद्र म्हसकर, यांचे घराचे छत, पोलिस पाटील शत्रू शिसवे यांचे पोल्ट्री चे छत वादळी वाऱ्याने उडाले. तर वरप, मांजर्ली, फळेगाव, रायते, गोवेली परिसरात लाईटपोल पडल्याने अनेक गावांमध्ये वीज गायब झाली आहे.
कालच्या वादळामुळे सर्वच गावामध्ये अनेक झाडे उमळून पडली. काही झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर काही झाडे लाईटच्या तारेवर पडल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. लाईट नसल्याने अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नव्हते, तर लाईट अभावी मोबाईल फोन चार्ज नसल्याने अनेकांशी संपर्क होऊ शकत नव्हता. विद्यूत विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र मेहणत करून विद्यूत पुरवठा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत होते. काही गावाचा सुरू झाला आहे. तर काही ठिकाणी काम सुरू आहे.
या संदर्भात कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांना विचारले असता ते म्हणाले, अनेक ठिकाणी घराचे पत्रे, लाईटपोल, झाडे पडल्याची माहिती मिळाली आहे.लवकरच पंचनामे करून निश्चित नुकसानीचा आकडा सांगता येईल. असे सांगून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.

No comments:
Post a Comment