*"भाऊ-बहीण" नात्यातील प्रेम,पवित्रता व्यक्त करणारा सण "भाऊबीज"*
----------------- 💫 -----------------
*सोनियाच्या ताटी...उजळल्या ज्योती*
*ओवाळीते भाऊराया रे...*
*वेड्या बहिणीची वेडी ही माया...*
हिंदू संस्कृतीत मानलं जाणारं एक सर्वोत्तम नातं म्हणजे भाऊ-बहीण होय.आई नंतर मायेचा आधार देणारी दुसरी माऊली म्हणजे बहीण ( ताई ) आहे.वरील गाण्यातील पंक्ती "भाऊबीज" या चित्रपटातील आहेत. हे गाणं ऐकलं की आज साजरा होणारा हिंदू धर्मातील पवित्र सण अर्थातच भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा, भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम प्रकट करणाऱ्या "भाऊबीज" सणाचे चित्रण, या सणाचे महत्व डोळ्यासमोर उभं राहतं. कार्तिक शुद्ध द्वितीया ( यमद्वितीया ) या दिवशी म्हणजे दीपावली सणात येणारा हा उत्सव होय. या दिवशी बहीण भावाच औक्षण करून त्याच्या सुखी-समाधानी आयुष्यासाठी मनोकामना करते. कारण प्रत्येक बहिणीला आपला भाऊ प्रिय असतो. लहानपणी एकत्रित खेळण, भांडणे, खोड्या-तक्रारी यांची सांगड ठेवणारे भाऊ-बहीण हे नातं अजरामर आहे. उद्या हीच बहीण लग्नाच्या वयात आली की माहेर सोडून सासरी जाते मग लहान वयात एकमेकांसोबत जपलेली ती नाती, ते सगळे चहाड्या-आनंदाचे दिवस या हुंदक्यांची आठवण अगदी विसरताच येत नाही. बहीण भावाला ओवाळणी करते, भावासाठी आयुष्य मागते, भावाचं चारित्र्य, शील यांचं रक्षण मागते. बहिणीने भावाला ओवाळणी करून, मस्तकी टिळा लावत, औक्षण करताना त्यांच्या आवडीचा गोड पदार्थ करून खावयास देणे, भावाने बहिणीला भेटवस्तू देणे जणू हे भाऊ-बहीण यांच्या नात्यातील निःस्वार्थी प्रेमच आहे. भाऊ-बहीण नात्यातील आनंद द्विगुणित करणारा हा उत्सवच आहे.
✍🏻 *कु - दिपक धोंडू कारकर* ( मुर्तवडे - चिपळूण )
- ९९३०५८५१५३

No comments:
Post a Comment