ठाण्यात शारीरिक कसरती करताना 27 वर्षीय पोलिसाचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील डिकसळ गावावर शोककळा !!
भिवंडी, दिं,5, अरुण पाटील (कोपर) :
शारीरिक कसरती करताना पोलिस जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे पोलीस शहर दलात कार्यरत असलेले महेश मच्छिंद्र मोरे (वय 27) असं त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी (3 फेब्रुवारी) रोजी पहाटे शारीरिक कसरतीसाठी गेले असताना निधन झालं आहे. या दुर्दैवी निधनाने डिकसळ गावावर शोककळा पसरली आहे.
महेश मोरे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावचे होते. महेश खडतर परिश्रम करून ठाणे शहर पोलीस दलात 2014 साली दाखल झाले. ठाणे शहर पोलीस दलातील क्वीक रिस्पॉन्स टीममध्ये कमांडो म्हणून ते कार्यरत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास महेश साकेत येथील पोलीस मैदानात शारीरिक कसरती साठी गेले असताना कसरती दरम्यान खाली कोसळले. तेथील उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात जाण्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला.
दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर महेश यांच्या पार्थिवाला ठाणे शहर मुख्यालयात पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी शासकीय इतमात मानवंदना दिली. गुरुवारी संध्याकाळी 9.30 वाजता महेश यांच्या पुण्यातील डिकसळ या मुळ गावी पुणे ग्रामीणच्या पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:
Post a Comment