दुर्लक्षित रामनगरचा 'बाळकडा' आणि साखरशेतचा 'वास्तळे' धबधबा !!
*स्थानिक नागरिक विकासाच्या प्रतीक्षेत*
जव्हार, जितेंद्र मोरघा :- निसर्गाने नटलेला,निसर्गाचे नंदनवन असलेला तालुका म्हणून जव्हारची ओळख आहे.राज्य शासनाने पर्यटनाचा 'ब' दर्जा देऊन पर्यटकांसाठी जव्हार नगरी ही मोठी पर्वणीच ठरली असून समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचावर वसलेले जव्हार शहर तर शहराच्या चारही बाजूला असलेले मोठ- मोठाले डोंगर, डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य छोटी-मोठी खेडी. अशा डोंगरदर्यातून अनेक लहान-मोठे धबधबे जव्हार तालुक्यात असून आज पर्यंत मोजक्यात धबधब्यांच्या विकास सोडला तर बहुतेक धबधबे हे आजही दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहेत. पर्यटनाचा 'ब' दर्जा मिळाल्यानंतर पर्यटकांची ओढ सुद्धा पावसाळ्यात जव्हारच्या दिशेने वाढत आहे.
याच दुर्लक्षित धबधब्यामध्ये जव्हार-डहाणू रस्त्यालगत जव्हारपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळकापरा- रामनगर या गावांच्या मध्ये असलेल्या बाळकडा अतिशय निसर्गरम्य ठिकाणी उंचावरून पडणारे पाणी, खोल दरी असे सुंदर दृश्य पहावयास मिळते. तर साखरशेत येथील 'वास्तळे' धबधबा हे असेच आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेले धबधबे आहेत. या धबधब्याकडे जाण्यासाठी खडतर मार्ग असल्याने तिकडे पोहोचणे जोखमीचे ठरते. स्थानिक प्रशासनाने जर अशा दुर्लक्षित राहिलेल्या तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे लक्ष देऊन विकास साधला तर पर्यटकांचे पाय आपोआपच अशा दुर्लक्षित राहिलेल्या पर्यटन क्षेत्राकडे वळून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन सुद्धा निर्माण होऊन आर्थिक उत्पन्न वाढीला मदत मिळेल.
जव्हार नगरीला मिनी महाबळेश्वर अशी ओळख असून दरवर्षी तालुक्यात कोसळणारा रेकॉर्ड ब्रेक पाऊस,धुक्यात हरवलेला निसर्ग अगदी फुलून जातो. भविष्यात अशा आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या पर्यटन स्थळांचा विकास होणे हे काळाची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
*आमच्या कडील आज पर्यंत दुर्लक्षित असलेल्या ''बाळकडा" धबधब्याचा विकास झाला तर भविष्यात स्थानिकांना रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळेल.*
*विलास पवार*
*मा.सरपंच,कासटवाडी*

No comments:
Post a Comment