Sunday, 6 November 2022

भारत जोडो यात्रेने निर्माण केलेले भावविश्व = राज कुलकर्णी

भारत जोडो यात्रेने निर्माण केलेले भावविश्व = राज कुलकर्णी 


राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरला सुरू झालेली भारत जोडो यात्रा , जवळपास दोन महिन्यांनी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर या गांवी समस्त महाराष्ट्रीय जनता या यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज आहे. 

महाराष्ट्रात प्रवेश करण्यापुर्वी राहुल गांधींनी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र नि तेलंगाना या राज्यातून जवळपास 1500 किमीचा पायी प्रवास करताना अनेक अगणित लोकांच्या भेटी घेतल्या. भेटी म्हणजे अक्षरश: गळाभेटी घेतल्या आहेत आणि याची अनेक छायाचित्रे आज सोशल मिडीयावर पहायला मिळत आहेत. राहुल गांधीच्या हातात हात देऊन वा त्यांना मिठी मारत अनेक बालक, महिला, वृद्ध, गरीब, श्रीमंत, सर्वसामान्य ते मान्यवर व्यक्ती असे सर्वच दिसून येत आहेत. 

दोन व्यक्तीमधील गळा भेट वि परस्परांना दिलेले अलिंगन हे नेहमीच आत्मियता , प्रेम, जिव्हाळा आणि महत्वाचे विश्वासासह आधाराचे प्रतिक असते. हा विश्वास नि आधार म्हणजे मनाला लाभलेला दिलासा असतो. यात एकरूपतेचीही भावना असते, संतांनी म्हटलंय ' वर्णाभिमान विसरली ज्ञाती , एकमेकां लोटांगणी जाती' ! 

परस्परांना वंदन, लोटांगण, अलिंगण हे परस्परांत एकरूप होण्याची बाब असते. आपले पंतप्रधानही अशा प्रकारचे आलिंगन वा मिठी आंतरराष्ट्रीय नेत्यांबाबत घेत असताना राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या बाबत त्यांचा असा अनुभव दिसून आलेला नाही , सर्वसमान्य जनतेची मिठी वा अलिंगऩ घेण्याचा प्रसंग तर कधी दिसला नाही. पण राहुल गांधींचे अलिंगन नि मिठी ही नक्कीच वेगळी आहे. कारण तीची छायाचित्रे पाहताना अलिंगन देणा-या लोकांच्या चेह-यावरील हावभाव वेगळेच भावविश्व निर्माण करतात ,त्याला शब्दात कसे पकडायचे आणि त्यावर कसे व्यक्त व्हायचे ,हा ज्याच्या त्याच्या आकलन क्षमतेचा नि संवेदनशीलतेचा विषय आहे ! 

राहुल गांधींना भेटलेली एक तरूणी, ती राहुलजींच्या हातात हात देऊन सभोवार पाहते आहे,तीच्या चेह-यावरील भाव असे आहेत जणू तीने हे विश्व जिंकले आहे. त्याचवेळी तीचा चेहरा एवढा आश्वासक आहे की, हा व्यक्ती मला पुर्ण आधार देणारा आहे. कोणतीही स्त्री वा तरूणी अशाच व्यक्तीचा हात हाती स्विकारते ,ज्या बद्दल तीला पुर्ण विश्वास आहे ! 

आंध्र प्रदेशातून यात्रा जात असताना एक वृद्ध शेतकरी स्त्री राहुलजींना भेट देण्यासाठी तीने तीच्या शेतात पिकवलेल्या दोन काकड्या घेऊन आली होती. ती फाटक्या वस्त्रातील स्त्री म्हणाली, माझ्या इंदिरा मायेने मला शेत दिले, त्याच शेतात पिकवलेल्या या दोन काकड्या ,हीच माझी संपत्ती. मी हीच भेट घेऊन आलेले आहे, कृतज्ञतापुर्वक ! इथे प्रेम, आत्मियता याबरोबरच कृतज्ञतेचा भाव आहे. 

रोहित येमुला, गौरी लंकेशची आई, राहुल गांधींना भेटल्या आणि अलिंगन दिले तेंव्हा त्यांचा चेहरा रडवेला होता. पण या रडवेल्या चेह-यातही एक आधार मिळाल्याचा, कोणीतरी आपले दु:ख सारण्यासाठी आलेल्या विश्वासपात्र व्यक्तीचा पाठींबा मिळाल्याचा ही भाव स्पष्ट दिसत होता. 

राहुल गांधींना भेटलेल्या अनेक राहुल गांधीच्या कवेत जाताना दुनिया काय यावर विचार करेल याचा विचार न करता, आपला आधार शोधत, आपल्या मनात दाटलेल्या दु:खाला सारणारा आधार भेटल्याचा आनंदही त्यांच्या चेह-यावर ओसंडून वाहताना दिसतो. 

राहुल गांधी ज्या ज्या व्यक्तींना या यात्रेदरम्यान भेटले आहेत, त्यांच्या चेह-यावरील भाव, ज्या प्रमाणे त्या व्यक्तींच्या मनात कायमचे कोरले गेले गेले आहेत, त्यातून त्यांची छायाचित्रेही इतरांसाठीही खूप अश्वासक आहेत.

राहुल गांधी लहान मुलांना, विद्यार्थ्यांना ज्या आत्मियतेने भेटून त्यांच्याशी बोलले आहेत यातून त्यांना मिळालेली उर्जा ही स्पष्टपणे दिसत आहे. हैदराबाद मधून बाहेर पडल्यावर एका म्हाता-या स्त्रीस बिलगताना तीच्या चेह-यावर एकाचवेळी आनंद आणि दिलासा दिसतो. तर एका व्यक्तीने राहुलला देण्यासाठी आणलेले एक कोकरू जेंव्हा राहुल गांधींनी खांद्यावर घेतले, त्यावेळी त्याला झालेला आनंद ,एका आजीने घेतलेले राहुलच्या गालाचे चुंबन, हे सार कांही विलक्षण आहे. 

राहुल गांधीच्या या यात्रेत, निवृत्त नौसेनाध्यक्ष श्री. रामदास सपत्नीक सामिल झाले, अभिनेत्री पुजा भट्ट, महंमद अझरूद्दीन, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भुषण या मान्यवरांनीही आपला सहभाग नोंदवला, यामुळे सर्व स्तरातून भारत जोडण्याच्या राहुलजींच्या भुमिकेस समर्थन मिळत आहे, ही भावना खूप महत्वाची आहे.  

एक छायाचित्र तर खूप ठळकपणे उल्लेख करावं असं आहे. एक तेलगु अभिनेत्री राहुल सोबत चालताना ,त्याच्या हाती स्वत:चा हात देते आणि सोबत चालत असतांना राहुल तीचा हात आपल्या हातात घट्ट पकडून तीला पुर्ण आधार देत आहे , आणि या दरम्यान स्व:ला सर्वात जास्त सुरक्षित समजते. राहुल यांनी पकडलेला तीचा हात पाहून अनेकांनी थिल्लर कॉमेंटही केले. मात्र यावर तीने दिलेली प्रतिक्रिया स्त्रीयांच्या मनातील सुरक्षेचा भाव प्रकट करणारी होती आणि तो भाव केवळ संवेदनशील मानवी मनालाच समजता येतो. निर्मळ मनाच्या लोकांना हा भाव सहज दिसून आला. 

राहुल गांधीचे पक्षकार्यकर्त्यांसोबतची छायाचित्रे हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहेतच पण सर्व सामान्य जनतेसोबतची छायाचित्रे भारतीय राजकारणात अद्याप संवेदनशीलता विराजमान असल्याचा प्रत्यय देणारी आहेत. 

कन्याकुमारी हून यात्रेचा शुभारंभ झाल्यावर, अनेक लोक त्यात स्वेच्छेने सामिल झाले आणि आजही होत आहेत. ' मै तो अकेला ही चला था ,जानिबे मंझील मगर लोक आते गये और कारवां बनता गया' असंच याच वर्णन करणं उचित ठरेल. पण हा कारवां आता जनसैलाब बनला आहे. यात्रेचा संपूर्ण मार्ग , लोकांच्या भेटीगाठी, संवाद, अलिंगन येणा-या नव्या भारतासाठी 'केप ऑफ गुड होप ' असणार आहे. 

गेल्या सात-आठ वर्षा पासून देशात एककल्ली, अधिकारशाहीचं वातावरण आहे, ज्यामुळे भारतीय जनतेच्या एकता वर एकात्मतेवर, संसदीय लोकशाही नि प्रजासत्ताक संघराज्य संरचनेवर आघात झाले आहे. केंद्र नि राज्य त्याच प्रमाणे दोन राज्यातील सरकारातही विसंवाद निर्माण होऊन, देशाचे सामाजिक, धार्मिक ,वांशिक, भाषिक आणि प्रादेशिक आधारावर विभाजन होण्याची स्थिती निर्माण झाली असतांना, राहुल गांधीचे संपूर्ण भारताला-भारतीय जनतेला पुन्हा जोडण्यासाठीची ' भारत जोडो' यात्रा सर्वसामान्य भारतीय जनतेच्या मनात प्रचंड मोठा विश्वास निर्माण करत आहे. याचे सजीव प्रतिक म्हणजे राहुल गांधी सर्वसामान्य लोकांसोबतची ही छायाचित्रे आहेत! 

आपण सर्वांनी भारतीय जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाला बळ देण्यासाठी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवणे महत्वाचे ठरले आहे. नव्हेतर ते आपण सर्व भारतीय जनतेचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

शब्दांकन - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...