राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार – मा. अजितदादा पवार
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडींमध्ये सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा बैठकीत झाली व रणनीती ठरवण्यात आली, अशी माहिती विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात आहे. पुरोगामी विचार घेऊन आदरणीय शरद पवारसाहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हापासून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी पुढे जात असतो. आमच्या पक्षात सर्व धर्मांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. घटना, कायदा, संविधानाला धरून देश आणि राज्य चालले पाहिजे या मताचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. सत्ताधारी पक्षाच्या पोटात दुखत असेल म्हणून ते अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्याच्याशी आमचा दुरान्वये संबंध नाही. आम्ही आमच्या भूमिकेनेच पुढे जाणार आहे, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.
आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते. त्यातून त्रासून राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. वास्तविक चुका असतील मग माझ्या किंवा कुणाच्याही असोत त्याच्यावर कारवाई करावी. परंतु मुद्दाम कुभांड रचून कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे, कुणालातरी पुढे करुन गुन्हा दाखल करायला लावणे, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही असा निर्वाणीचा इशारा अजितदादांनी दिला.
महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळते आहे की, कशापद्धतीने विरोधकांना गोवण्यात येत आहे आणि इतक्या खालच्या पातळीवर राज्यातील राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर होणार असेल तर आम्हालाही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल. असा अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडणार, आम्ही मूग गिळून बसलेलो नाही असेही अजितदादांनी ठणकावून सांगितले.
सभागृहात मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, तुम्ही तुमच्यासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांची घटना घडूनही स्पष्ट भूमिका घेत नाही. यावर समर्पक उत्तर दिले नाही. याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरते आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख मिळत आहे. आपण न्यायालयाला विचारु शकतो का? त्यांना तो अधिकार आहे तो ते वापरत आहेत. मात्र गेले सहा महिने झाले तारीखच मिळत आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान, मी उपटसुंभ लोकांच्या आरोपाला उत्तर द्यायला मोकळा नाही. किंवा उत्तर द्यायला बांधील नाही. त्यांचे डिपॉझिट जप्त करून पाठवले आहे. अशा शब्दात अजितदादांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाव न घेता पडळकर यांना टोला लगावला.
वृत्तांकन - अखलाख देशमुख
No comments:
Post a Comment