Friday, 24 February 2023

पारमिता धर्मादाय न्यासाच्या १२व्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार !

पारमिता धर्मादाय न्यासाच्या १२व्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार !

कल्याण पश्चिम येथील पारमिता धर्मादाय न्यास ह्या सामाजिक संस्थेचा १२वा वर्धापनदिन रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सिद्धी विनायक गार्डन, भोईरवाडी, कल्याण पश्चिम येथे साजरा करण्यात आला. ह्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी डॉ निलरतन शेंडे, (GM, CSR, All Cargo Logistic Ltd), मुंबई प्रमुख पाहुणे आणि प्रा. डॉ. प्रदीप सरवदे, सहायक प्राध्यापक, अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्, मुंबई विद्यापीठ हे प्रमुख वक्ते तसेच न्यासाचे अध्यक्ष बालकदास मेश्राम, सचिव अनिल मेश्राम, खजिनदार विश्वनाथ जा़भूळकर हेही विचारमंचावर उपस्थित होते. सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व दीप प्रज्वलन करण्यात आले. वैशाली मेश्राम, भूमिका मेश्राम, माया शेंडे, संध्या डोंगरे आणि ललिता राऊत यांनी पंचशील त्रिशरण व बुद्धवंदना घेतल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरूवातीला न्यासाचे सचिव अनिल मेश्राम यांनी न्यासाच्या वाटचालीचा आढावा घेणारा अहवाल सादर केला. तसेच अथक परिश्रम घेत न्यासाचे 12A, 80G चे पंजिकरण झाल्याचे व न्यासाचे संकेतस्थळ लवकरच सुरू होणार असल्याचे नमूद केले.


पारमिता धर्मादाय न्यासाच्या वतीने दरवर्षी कल्याण पूर्व आणि पश्चिम, उल्हासनगर विभागातील १०वी व १२वी मध्ये शाळेतून पहिल्या व दुसऱ्या येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी अनुक्रमे रोख रु. ४,००० व ३,००० भारतीय संविधानाची प्रत आणि प्रसस्तिपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पारमिता धर्मादाय न्यास मध्यमवर्गीय व होतकरू विद्यार्थ्यांना रोख रक्कम, संविधानाची प्रत व प्रसस्तिपत्र देऊन सन्मान करते ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे असे प्रतिपादन डॉ. निलरतन शेंडे आणि डॉ. प्रदीप सरवदे म्हणाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रदीप सरवदे म्हणाले की विज्ञान शास्त्र, सामाजिक शास्त्र सोबतच सांस्कृतिक शास्त्रकडे सुद्धा आता वळले पाहिजे कारण ही आता काळाची गरज बनली आहे. 

सदर गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत, कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालय, समता विद्यालय, नालंदा माध्य. विद्यालय, कल्याण पश्चिमेतील कै. भाऊराव पोटे माध्य. विद्यालय तसेच उल्हासनगर येथील तक्षशीला विद्यालयातील सर्व मिळून एकूण १४ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय न्यासाच्या विश्वस्तांच्या गुणवंत मुलामुलींना सुद्धा सन्मानित करण्यात आले. त्यात माध्यमिक शालेय परीक्षेत गुणवत्ता प्राप्त ऋत्विक अजय मेश्राम, अनिकेत मुरलीधर ढवळे आणि उच्च माध्यमिक परीक्षेत गुणवत्ता प्राप्त कुमारी श्रावणी अनिल मेश्राम यांचाही रोख रक्कम, भारतीय संविधानाची प्रत व प्रसस्तिपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कमोद डोंगरे सरांनी तर आभार प्रदर्शन पारमिता धर्मादाय न्यासाचे उपाध्यक्ष आयु. ताराचंद मेश्राम यांनी केले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात गीत गायनाचा कार्यक्रम झाला. त्याचे सुत्रसंचलन न्यासाचे सल्लागार डॉ. गंगाधर मेश्राम यांनी केले. वैशाली मेश्राम, अनिल मेश्राम, छत्रपती मेश्राम, अजय मेश्राम आणि कोचरेकर सर इत्यादींनी आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. शेवटी न्यासाचे अध्यक्ष बालकदास मेश्राम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व वर्धापन दिन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...