शिक्षणाच्या मूलमंत्रातून ज्ञानसूर्याला मानवंदना !
कल्याण, (प्रतिनिधी), दि.१४ एप्रिल २०२३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण पश्चिम शाळेने सामाजिक समरसता जपत परिसरातील इंदिरा नगर येथे सादर झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी शिक्षणाच्या मूलमंत्रातून ज्ञानसूर्याला मानवंदना देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सय्यद मॅडम त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सदर कार्यक्रमात शाळेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती. तडवी मॅडम यांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य याबद्दल परिसरातील जन समुदायास सुरेख माहिती दिली. त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सौ. सय्यद मॅडम यांनी आजच्या दिनाचे औचित्य साधून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या उक्तीप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व विशद केले आणि त्यासाठी परिसरातील सर्व विद्यार्थांनी शिक्षण घ्यावे असे आवाहन केले. नूतन विद्यालय त्यासाठी कायमच सहकार्य करेल असे सांगून विद्यार्थांना विनामूल्य प्रवेश शाळेत देण्यात येतील, गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल असे आश्वासन देखील सौ. सय्यद मॅडम यांनी दिले. सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार सदर कार्यक्रमात करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकांना अत्यंत प्रेमाने उपहार देण्यात आला अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. शाळा समन्वयक म्हणून सौ. शुभांगी भोसले यांनी काम पाहिले.
सौजन्य - किरण गायकर
No comments:
Post a Comment