Wednesday, 21 June 2023

मानवी देह, अवयव आणि कायदा ___

मानवी देह, अवयव आणि कायदा ___

दिनांक नऊ जुलै रोजी देशामध्ये झालेल्या अवयवादानासंबंधीच्या कायद्याला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. 

नऊ जुलै १९९४ या दिवशी भारताच्या संसदेमध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा संमत झाला. (सध्या त्या कायद्याला आपण 'थोटा १९९४' THOTA 1994 म्हणजेच Transplant of Human Organ and Tissue transplant Act 1994 असे म्हणतो) या कायद्याच्या २९ वर्षांच्या प्रवासानंतर आलेल्या अनुभवातून या तिसाव्या वर्षी या कायद्याबाबत; त्यातील त्रुटी, आवश्यकता आणि त्यामध्ये बदलाची गरज तसेच त्याला अनुषंगिक असलेले इतर काही कायदे यांचा एकत्रितपणे विचार करून एका सर्वसमावेशक कायद्याचा विचार करणे आवश्यक आहे का ? याबाबत विचार मंथन झाले पाहिजे. या कायद्याच्या अभ्यासकांनी, तज्ञांनी आणि अंमलबजावणी करणाऱ्यांनी; त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांनी याबाबतीत आपापले विचार, सूचना, अभिप्राय मांडून सरकारकडे विविध बाबतीत पाठपुरावा केल्यास या कायद्याच्या तिसाव्या वर्षाच्या पूर्तीपर्यंत अनेकांच्या अडचणी दूर होण्याची शक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न करावयास काय हरकत आहे?

अवयव दानाच्या कायद्याबरोबरच देहदानाच्या कायद्याचाही योग्य पद्धतीने पुनर्विचार करणे आवश्यक नव्हे काय ? त्यामुळे अवयव प्रत्यारोपण कायद्याबरोबरच मानवी देहाच्या बिल्हेवाटी संबंधीचे कायदे यांचाही एकत्रितपणे विचार का होऊ नये ?माझे शरीर, त्या अंतर्गत असलेले अवयव, हे सर्व माझी संपत्ती आहे ही स्वकमाईची संपत्ती आहे, तर मग त्याची विल्हेवाट कशी लावली जावी हे ठरवण्याचा अधिकार आणि मृत्युपत्रान्वये  निश्चित करून ठेवण्याचा अधिकार मला असला पाहिजे. ते मी मृत्युपत्रान्वये निश्चित केले असल्यास, त्याची अंमलबजावणी केली जाणे ही कायदेशीर अपरिहार्यता असलीच पाहिजे.  या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मला वाटते. 

त्या दृष्टीने काही विचार पुढे मांडत आहे ___

मृत्यूनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या काही पद्धती आहेत. आनंदवनामध्ये आदरणीय बाबा आमटे यांनी प्रचलित करून ठेवली आहे ती पद्धत जास्त पर्यावरण पूरक आणि सर्वोत्कृष्ट आहे असे मला वाटते. त्या ठिकाणी जमिनीत खोल खड्डा खणून मृतदेहाला केळीच्या पानामध्ये गुंडाळून तो मृतदेह खड्ड्यांमध्ये पुरला जातो. त्या मृतदेहाच्या खाली आणि आजूबाजूला मीठ टाकले जाते आणि नंतर तो खड्डा बुजवून त्यावर एक वृक्ष लावला जातो. ही माझ्या मध्ये सगळ्यात उत्कृष्ट देहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत आहे. लिंगायत समाजामध्ये सुद्धा व्यक्तीच्या मृत्यूनंतर व्यक्तीला जमिनीत पुरण्याची पद्धत आहे. व्यक्तीच्या देहाची माती होऊन जाण्याची प्रक्रिया व त्या मातीवर एखादा वृक्ष जगवणे ही पर्यावरणपूरक पद्धत ही जगात सगळीकडे असावी असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात आपल्या देशामध्ये याबाबतीत बदल होणे अशक्यच. अनेक धर्म, अनेक जीवनपद्धती अनेक प्रचलित समजुती यांचा पगडा आहेच. त्यातही समजा आनंदवनाच्या पद्धतीने मला माझ्या देहाची विल्हेवाट लावायची असली तरी ती होईल का ? प्रत्येक धर्माची वेगवेगळी दफनभूमी आहे. त्या दफनभूमी मध्ये दुसर्‍या धर्माच्या व्यक्तिचा देह नेला जाऊ शकत नाही. भविष्यात माझ्या मृत्यूनंतर तशी वेळ आलीच तर मला दफनभूमी मिळू शकणार नाही. कारण हिंदूंमध्ये दहनाची पद्धत असल्यामुळे हिंदूंसाठी दफनभूमी नाही. कोणत्याही शहरामध्ये अजून निधर्मी अथवा सर्वधर्मी सर्वसमावेशक दफनभूमी निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे याबाबत सरकार दरबारी समविचारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वाटते. मृत्यूनंतर आपल्या देहाचे काय व्हावे याबाबत, तसेच मृत्युपूर्वीही आपल्या देहावर वेळप्रसंगी उपचार कशा पद्धतीने व्हावेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून वैद्यकीय इच्छापत्र करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न काही सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. अजून त्याला कायदेशीर मान्यता नाही. पण याबाबतीत कायदेशीर मान्यतेचा लढा लढण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीने देहदान अवयवदान या बाबतही जर स्वतःचे खुले वैद्यकीय इच्छापत्र बनवले असेल, त्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीला त्याबाबतचे अधिकार दिले असतील, तर त्याची अंमलबजावणी कायदेशीररित्या झाली पाहिजे. त्याच्या कुटुंबीयांच्या इच्छेपेक्षा त्या व्यक्तीची मृत्यूपूर्वीची इच्छा ही सगळ्यात महत्त्वाची मानली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे मृत्युपत्राने स्वतःच्या संपत्तीचे वाटप व्यक्तीला करता येते आणि त्या पद्धतीने ते होणे ही कायदेशीर जबाबदारी असते. त्याचप्रमाणे शरीरसंपत्ती बाबत सुद्धा वैद्यकीय इच्छापत्र मान्य करून त्याप्रमाणे इतर कोणाच्याही इच्छेचा विचार न करता अंमलबजावणी करता आली पाहिजे. अशा पद्धतीने कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करावयाचे आहेत. 

असो तूर्त मी माझे स्वत:चे खुले वैद्यकीय इच्छापत्र करणार आहे ते पुढीलप्रमाणे -
'माझे खुले वैद्यकीय इच्छापत्र' ___
(Open medical will)

मी, सुनील रंगनाथ देशपांडे, वय : ७३, रहाणार : पुणे व नाशिक 
दिनांक ........ रोजी उत्तम  शारीरिक व मानसिक अवस्थेत असताना  हे वैद्यकीय इच्छापत्र करीत आहे. यापूर्वी मी कोणतेही वैद्यकीय इच्छापत्र केलेले नाही. हे माझे पहिले व शेवटचेच वैद्यकीय इच्छापत्र आहे.

माझा जन्म : ई.स.१९५० मधील असून मी कायद्याने सज्ञान आहे. माझे शिक्षण बी.एस् .सी. असून माझे लग्न रंजना इनामदार आता रंजना देशपांडे, यांचेशी १९७७ मध्ये झाले आहे. त्या माझ्या मूळ वारस असून, त्यांचे नंतर माझे वारस पुढील प्रमाणे 
१) मनाली वैभव दाऊतखानी. (मुलगी)
२) चैतन्य सुनील देशपांडे (मुलगा)

माझी शारिरीक मिळकत पुढीलप्रमाणे :
माझे डोळे, माझी त्वचा हे बाह्य ऊती-अवयव. 
आणि शरीराच्या अंतर्गत असणारे सर्व अवयव.
व माझा संपूर्ण देह.

मी,  त्या शरीरावर करावयाचे अंतिम स्थिती मधील उपचार, मृत्यूनंतर करावयाचे वाटप / विल्हेवाट पुढील प्रमाणे करू इच्छितो. तसेच त्यानंतर माझ्या वारसांनी कोणत्या कृती व विधी करावेत याविषयीची माझी इच्छा प्रदर्शित करीत आहे. 

ती पुढील प्रमाणे : 

१) माझे वारस - तुम्ही  माझी उत्तम काळजी घेत असता. इथून पुढे जर मी मरणासन्न अवस्थेत आजारी / अपघातग्रस्त होऊन उपचार घेत असेन आणि त्या वेळी मी निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत, परिस्थितीत नसेन आणि माणूस म्हणून जगण्याच्याही स्थितीत नसेन, तेव्हा माझ्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू नका. कृत्रिम यंत्रणांवर मला जिवंत ठेवू नका. मी स्वेच्छेने हा माझा निर्णय जाहीर करीत आहे!
२) ज्यामुळे पुन्हा अर्थपूर्ण वा सर्वसामान्य (Normal) जीवन अशक्य होईल, किंवा उपचार करूनही सहा महिन्यांच्या आत मृत्यू संभवेल, अथवा कायमची बेशुद्धावस्था (long unconsciousness or coma) अशी माझी स्थिती झाल्यास.’ माझ्या वरील सर्व उपचार थांबवावेत, तसेच भरपाई होऊ शकणाऱ्या आरोग्यविमा रकमेपेक्षा जास्त खर्च करू नये.
३) मेंदू मृत म्हणून डॉक्टरांनी घोषित केल्यास त्वरित माझ्या अवयवदानाचा निर्णय घ्यावा. त्यासाठी कोणताही वेळ दवडू नये. नेत्र आणि त्वचा तसेच शरीराच्या अंतर्गत अवयव जे काही कुणाला उपयोगी पडत असतील ते त्वरित काढून घेऊन उपयोगात आणावेत.  
४) माझा मृत्यू जर हृदयक्रिया बंद पडल्याने झाला तर जराही वेळ न दवडता नेत्रदान व त्वचादान करून तो देह शक्य तेवढ्या त्वरेने  जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात देहदानासाठी नेऊन द्यावा.
५) वयाच्या साठाव्या वर्षानंतर झालेला मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया समजली जावी असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे कोणीही या मृत्यूबाबत शोक करू नये अथवा शोक करण्यात वेळ दवडू नये.
६) माझा देह काही कारणामुळे देहदान करण्याच्या योग्यतेचा नसल्यास किंवा अवयव दान केल्यानंतर देहाचा उर्वरित भाग ताब्यात मिळाल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने जाळू नये. शक्यतो तो जमिनीत पुरून त्यावर एक वृक्ष लावण्यात यावा परंतु तशी सुविधा उपलब्ध नसल्यास तो देह विद्युतदाहिनीत ज्वलन करावा.
७) वरील पैकी काहीही शक्य न झाल्यास व पारंपरिक पद्धतीने तो जाळण्याची वेळ आल्यास माझे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय यांपैकी ज्यांचे माझ्यावर खरेच प्रेम असेल त्यांनी सर्वांनी मिळून किमान ५० वृक्षांची लागवड करून ते जगवावेत. तसेच किमान पन्नास व्यक्तींचे देहदानाचे संकल्पपत्र भरून देण्यात यावेत.
८) देहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्वरित माझ्या पत्नीने एखाद्या पर्यटन स्थळी जावे. घरी राहु नये किंवा मुलांकडेही राहू नये. विनाकारण दु:ख करण्यामध्ये स्वतःची व स्नेहीजनांची वेळ व शक्ती खर्च करू नये.
९) माझ्या मृत्यूनंतर पंधरा दिवसाचे आत माझ्या मित्रपरिवाराने एका हास्य कवी संमेलनाचे आयोजन करावे व सर्वांनी मनसोक्त हसावे.
१०) मित्र व नातेवाईक यांनी उगीच लांबून माझ्या कुटुंबीयांना भेटावयास येण्याची तसदी घेऊ नये. उलट त्यासाठी त्यांचा जो खर्च होणार असेल किमान तेवढी देणगी अवयवदानाचे कार्य करणाऱ्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेस द्यावी.
११) मृत्यूनंतर कोठलेही धार्मिक विधी धार्मिक कृत्य किंवा तत्सम काहीही करू नये. तसेच त्यानंतरही भविष्यात श्राद्ध वगैरे सारखे प्रकार कधीच करू नयेत.

हे इच्छापत्र कोणाचेही दडपणा शिवाय, मनाच्या व शरीराच्या उत्तम अवस्थेत लिहून ठेवले आहे.
 दिनांक :  
ठिकाण :  
सही :

मानवी देह व अवयव आणि त्यासंबंधीचे सर्व कायदे यांचा सर्वंकष आणि सर्वसमावेशक विचार करण्याच्या दृष्टीने या तिसाव्या वर्षात एक अभियान चालू करूया ! आपापले विचार मांडू या ! आपापल्या सूचना आणि अभिप्राय मांडू या ! आणि त्यातील चर्चेद्वारे निश्चितीकरण करता येण्यासारखे विचार आणि अभिप्राय, विविध संघटनांद्वारे सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून; यासंबंधी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी, तसेच त्यासंबंधीच्या योग्य इच्छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तींच्या इच्छांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण एक अभियान छेडू या!
या अभियानात सामील व्हा आणि व्यक्त व्हा !!!

—-- सुनील देशपांडे. (+91 96577 09640)
उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई; संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...