आपत्ती नव्हे चेतावणीच... पण चेतावणी गांभिर्याने घ्या !
----------------------------------------------------------------
महाराष्ट्रामधील पूर, अतिवृष्टी, दुष्काळ आणि पावसाने उडविलेली दाणादाण ही याच बदलांची परिणती आहे. नफा, शहरी औद्योगिक विकासाच्या अतिरेकी हव्यासामुळे बिघडत चाललेल्या नैसर्गिक समतोलाचा हा परिपाक आहे. वारेमाप वृक्ष तोड, जंगलांवर व जैववैविध्यावर क्रूर हल्ले, कार्बनचे अमर्याद उत्सर्जन, प्रदूषण, नैसर्गिक खनिजांचा बेसुमार उपसा व वापर, तापमानात अभूतपूर्व वाढ यासारख्या मानवी उपद्व्यापांची किंमत आज शेतक-यांना मोजावी लागत आहे. उद्या अख्या मानवजातीला याची किंमत मोजावी लागणार आहे. आजच्या या ‘आपत्ती’ खरे तर वेळीच सावध होण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेल्या चेतावण्याच आहेत. सर्वांनीच या ‘चेतावण्या’ गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. निसर्गाचा विध्वंस रोखला पाहिजे. अन्यथा हे असेच होत राहणार.... नी शेतक-याची शेती नष्ट होतच राहणार. निसर्गाने दिलेली चेतावनी ओळखून त्या दिशेने वेळीच उपाययोजना करायला हवी.
आताच डोंगर का सरकत आहेत.याचा विचार करायला हवा. १) सह्याद्री रांगांमध्ये प्रचंड वृक्षतोड झाली. मातीची धुप थोपवणारे वृक्षांच्या मुळांचे जाळे राहिले नसल्याने डोंगरांची मोठ्या प्रमाणात धुप झाली. २) पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले यामुळे पाणी व्यवस्थापन बिघडून जमिनीची धूप झाली. ३) गाळ नद्यांमध्ये साठून पाण्याचा प्रवाह बदलले यामुळे महापुरासारख्या आपत्ती वाढल्या. ४) जलरेषांचा अभ्यास न करता विकासाचे अशास्त्रीय नियोजन केले. ५) अनेक भागात चुकीच्या पद्धतीने डोंगर कापल्याने नैसर्गिक समतोल बिघडला. ६) भूगर्भ अभ्यासकांचा सल्ला न घेता चुकीच्या पद्धतीने काम झाल्याने डोंगर कमकुवत झाले. ७) अनेक ठिकाणी पाणी मुरण्याची क्षमता असलेल्या पाणथळ भूमी भर टाकून बंद केल्या आहेत. ८) काही भागांत अनियंत्रीत खाण व्यवसायामुळे नैसर्गिक रचनाच डिस्टर्ब झाली. ९) काही भागांत डोंगर उतारावर वस्ती, घरे उभारली. यामुळे पाणी निचरा व्यवस्थापनावर परिणाम झाला. या सारख्या कारणांमुळे किंवा यापेक्षा भयानक परिस्थितीमुळे कदाचित अशा दुर्घटना घडत आहेत.
कधी कोकणात पर्यटनाला आलात तर दिसणाऱ्या, अथवा फोटो, पुस्तकातून कायमच वाचणाऱ्या व कोकणी माणसाच्या सतत नजरेत असणाऱ्या हिरव्यागार उंचच उंच आणि लांबसडक डोंगररांगा नेहमीच सुखावणाऱ्या भासल्या असतील; पण हेच सौंदर्य आता कोकणवासीयांसाठी शापीत बनतय की काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. कोकणात अनेक गावांत हे डोंगर अचानक काळपुरूषसारखे वाटू लागले आहेत. होय....! हे खर आहे... आतापर्यंत अनेकांचे पोशिंदे असलेले हे डोंगर कोकणातल्या वाड्या, वस्त्यांच्या, कोकणी माणसाच्या जीवावर बेतायला बघत आहेत. पण हे अचानक घडलेलं नाही. हे डोंगर का सरकत आहेत याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
कोकण खरतर वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे निसर्गसंपन्न आहे. एकाबाजूला सह्याद्रीचे उंचचउंच कडे आणि दुसरीकडे अरबी समुद्र आणि त्याच्या मधल्या चिंचोळी पट्टीत वसलेले कोकण पिढ्यानपिढ्या निसर्गाशी एकरूप होवून जगण्याचे धडे गिरवत आले आहे, मात्र येथे निसर्गाला दगाफटका करण्याचे प्रयत्न झाल्यानंतर त्याचा कोपही दिसू लागला आहे. सह्याद्रीचे कडे दरडीच्या रूपाने वस्तीकडे सरकण्याचे संकेत मिळू लागल्यानंतर ही धोक्याची छाया किती गडद आहे याची कल्पना येवू लागली आहे. डोंगर कोसळला तर काय होवू शकते याचा सगळ्यात जास्त गंभीर नमुना दिनांक ३० जुलै २०१४ (बुधवार) ला माळीण दुर्घटना होय. त्या दिवशी नुकतीच उजाडू लागलेली सकाळची वेळ, माळीण गावच्या डोंगरात स्फोटकसदृष्य आवाज झाला, मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील ७४ पैकी ४४ घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब ! माळीण गाव पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक आदिवासी गाव. भिमाशंकर पासून २० कि.मी आणि पुण्यापासून ७५ कि.मी अंतरावर वसलेल्या या गावची ७ वाड्यासहित लोकसंख्या ७१५ मूळ गावामधील ७४ घरांपैकी ४४ घरे, त्यातील १५० ते १६५ पुरूष, स्त्री, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्या सहित मातीच्या ढिगाऱ्याखाली. गावाचे हे दु:खद आणि विदारक चित्र, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले होते.
मात्र कोकणात या आधीच अशा संकटाची चाहूल लागली होती ती २००० मध्ये काळसे (ता.मालवण) येथे डोंगरातली दरड कोसळून अख्खे कुटुंब घरासह त्याखाली गाडले गेले होते.
कोकणची भौगोलिक रचना पाहिली तर याची निर्मिती प्रस्तर भंगातून झाल्याचे लक्षात येते. कोट्यवधी वर्षांपूर्वी द्विपकल्पाच्या पश्चिमेस भेदीय उद्रेक होवून लाव्हारस आसपासच्या प्रदेशात पसरला. यावर वारंवार क्रिया होवून थरावर थर साचत गेले. याला डेक्कन ट्रॅप किंवा दख्खन लाव्हा, असे म्हटले जाते. लाव्हा थंड होवून याचे रूपांतर बेसॉल्ट खडकात (काळा दगड) झाले. ४० पेक्षा जास्त थराच्या कठिण बेसॉल्ट खडकाची निर्मिती होवून याचे लांबलचक पठार तयार झाले. आंबोलीत ४० पेक्षा जास्त थरांची मोजदाज करता येते. यानंतर पठाराच्या पश्चिमेकडील भाग अनेक ठिकाणी प्रस्तर भंग होवून खचला. हा खचलेला खालचा भाग म्हणजे कोकण. कड्यांसारखा वर राहिलेला भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगा...! परंतु हे डोंगर आताच का खचायला लागले, हे समजून घ्यायला येथील भूगर्भिय रचना पहावी लागेल. एखाद्या इमारतीला जसा मजबूत पाया असतो तसा कोकणच्या भूगर्भ रचनेत खालच्या बाजूला बेसॉल्ट अर्थात काळ्या दगडाचा पाया आहे. शेकडो वर्षे रासायनिक विदारण होवून या खडकापासून जांभी मृदा आणि जांभा खडक बनला आहे. या बेसॉल्टच्या वर जांभा दगड आणि त्यावर जांभी मृदा म्हणजे माती आहे. असे असले तरी खालचा बेसॉल्ट खडक जिवॉलॉजीकल फॉल्ट अर्थात मध्येमध्ये भेगाळलेला जोड किंवा संधी असलेला आहे. त्यामुळे ही भौगोलिक रचना तशी संवेदनशील म्हणावी लागेल. खाली असलेला बेसॉल्ट खडकाचा पाया कमकूवत झाला किंवा हलला तर वरचा डोंगराचा डोलारा कोसळू लागतो. कोकणातील जांभी मृदा पाणी साठवणुकीच्या बाबतीत खूप कमी क्षमता असलेली आहे. हे पाणी मोठ्या प्रमाणात खाली मातीत घूसून बेसॉल्ट खडकाच्या भेगांवर आघात करते. यामुळे खडक तुटतो. त्याच्या भेगा रूंदावतात. मग जमिनीच्या आतील हा खडक उताराकडे सरकू लागतो. त्याच्याबरोबरच माती खाली यायला सुरूवात होते. यातूनच दरडी कोसळतात.
कोकण तर कोट्यवधी वर्षांपासून आहे. मग आताच दरडी का कोसळायला लागल्या हा प्रश्न आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन निट होणे अवश्यक असते. याचे उत्तर कोकणच्या पारंपरिक लोकजीवनात आहे. पूर्वी शेती, बागायती यासह पूर्ण लोकजीवन निसर्गाची काळजी घेत जगले जायचे. यामुळे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत असे. डोंगरावर असलेल्या घनदाट जंगलामुळे डोंगर उतारावर फारशी धुप नव्हती. अगदी सहजगत्या पाणी नद्यांवाटे समुद्राला जावून मिळत. यात मानवी हस्तक्षेप झाल्यानंतर निसर्गाचा कोप सुरू झाला.
कोकणात पूर्वी सलग १५-२० दिवस पाऊस पडला तरी फारसा धोका उद्भवत नसे. आता मात्र चार-आठ दिवसांच्या पावसानेही आपत्ती ओढवत आहे. निसर्गात वाढलेला मानवी हस्तक्षेप हे याचे प्रमुख कारण आहे. पुढच्या काळात पाऊस आणखी मोठ्या प्रमाणात आणि अनियंत्रीत पद्धतीने वाढण्याची भीती आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत आहे. साहजीकच बाष्पीभवन वाढून पाऊसही वाढणार आहे. अशावेळी दरडी कोसळण्याची भीती आणखी वाढणार आहे. याचा विचार आताच करावा लागणार आहे. बरीचशी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. असे असले तरी सुधारण्याची वेळ अजूनही निघून गेलेली नाही.वेळीच सावध व्हायला हवे.निसर्गाने दिलेली ही चेतावणी गांभीर्याने घ्यायला हवी.
श्री. शांताराम ल. गुडेकर
*मा. विशेष कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्र शासन
*पर्यावरण मित्र/पत्रकार
*प्रसिद्धी प्रमुख -निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य
√ +91 98207 93759
No comments:
Post a Comment