Thursday, 20 July 2023

माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती - १६ जणांचा मृत्यु ,६० हून अधिक ढिगाऱ्याखाली, पावसामुळे बचावकार्यात अडथळे !!

माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती - १६ जणांचा मृत्यु ,६० हून अधिक ढिगाऱ्याखाली, पावसामुळे बचावकार्यात अडथळे !!

*दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत बचाव पथकाने १०३ पेक्षा जास्त जणांचे वाचवले प्राण*

            मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी पायी चालत गाठले गाव

भिवंडी, दिं,२१,अरुण पाटील (कोपर)
        गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या  संततधार पावसामुळे रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होउन या गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री १०,३० वा.च्या सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखालून १०३ जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत १६ जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत.

                                    दुर्घटनाग्रस्त इर्शालवाडी गाव

         आणखी ६० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. सध्या पावसामुळे बचावकार्य थांबवले आहे. ते शुक्रवारी पहाटे सुरू होणार असल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे हे चालतच घटनास्थळी पोहोचले आहेत. ते सकाळपासून इर्शाळवाडीच्या पायथ्याशी असून बचाव कार्यावर नजर ठेवून होते. खालापूर येथील इर्शाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून ६ किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.
        इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील परिस्थितीचा आणि चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आतापर्यंत १०३  लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले असून १६ जणांचा मृत्यू झाला. काही नागरिक भातशे तीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेऊन घेतला जात असल्याचे सांगितले.
        दरम्यान, या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी ५० कंटेंनरची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल असे स्पष्ट केले.अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली असल्याने आणि मदतीसाठी कोणीतही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
       प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच मदतकार्य केलेल्या संस्थांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, स्थनिक आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे तसेच रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे हेदेखील उपस्थित होते.
         इर्शाळवाडीतील घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. हे जवान डोंगर चढत होते. तेव्हा बेलापूरहून आलेल्या एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा नंतर मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे या घटनेतील बळींचा आकडा १३ वर पोहोचला आहे.
          ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. दुर्घटनास्थळी जाण्यासाठी जवळपास दीड तास चालत जावे लागते.
          रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्य भरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
           इर्शाळवाडी येथे स्थानिकांनी गर्दी करू नये. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे. शिवाय ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. 
          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना भेटून त्याना धीर दिला. त्याना लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे सांगून त्याना आश्वस्त केले. तसेच घटनास्थळी मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळी उपस्थित आहेत. दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
          दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना आदिती तटकरे यांना दिल्या आहेत.
        मदतीसाठी इर्शाळवाडी गावातच पोलिस कंट्रोल रुम बनवण्यात आले आहे. मदतीसाठी 8108195554 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार एकूण ४८ कुटुंब येथे आहेत. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल.
        उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले आहेत. गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याबाबत ते माहिती घेत असून अधिकाऱ्यांना सूचनाही देत आहेत.
          रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी गावात ५० ते ६० घरे असून गावात जवळपास २०० ते ३०० मतदार म्हणजेच १८ वयापुढील नागरिक आहेत. जवळपास ३०  ते ४०  घरातील लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. यातील जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्याला सुरूवात केली आहे. काही जणांना वाचवण्यात यश आले आहे.
           कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे घटनास्थळी पोहोचले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत. आतापर्यंत सुमारे 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळच हे गाव असून धरण परिसरातील घरांवरच दरड कोसळल्याची माहिती आहे.
         रात्री  १०,३० वा.च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अंधार व पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. तसेच, गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचाव पथकाला अक्षरश: पायी चिखल तुडवून गावापर्यंत जावे लागत आहेत. त्यामुळे रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. तसेच, रात्री मदतीसाठी जात असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. सकाळ होताच वेगाने बचावकार्य सुरू झाले आहे. आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
           मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, इर्शाळवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. पावसामुळे जी पायवाट आहे, ती पूर्ण चिखलात गेली आहे. बचाव पथकांनाही पायीच तेथे जावे लागत आहे. जेसीबी, पोकलेनही घटनास्थळी नेणे शक्य होत नाहीये. त्यामुळे बचाव पथकाचे सदस्य अक्षरश: हातानेच ढिगारे उपसत आहेत. गावापर्यंत मदतीचे साहित्य कसे न्यावे, हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांचे गावातच शव विच्छेदन करण्याचा विचारही आम्ही करत आहोत.
         पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव सह्याद्रीच्या डोंगरकड्याने ३० जुलै २०१४ रोजी गिळंकृत केले. या घटनेला येत्या काही दिवसांतच ९ वर्षे पूर्ण होतील.या घटनेच्या कटू आठवणी विस्मृतीत जात होत्या. पण बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील हर्शाळवाडीवर डोंगरकडा कोसळून  माळीणच्या घटनेची आठवण ताजी झाली 
        रायगडच्या इर्शाळगड येथे बुधवार दिं,१९ जुलै रोजी  १०,३० च्या सुमारास दरड कोसळण्याची ही घटना घडली. त्यानंतर गुरुवारी पहाटेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवारही नियंत्रण कक्षात डेरेदाखल झाले. त्यांनी बचावकार्यावर बारकाईने नजर ठेवली. यावेळी त्यांनी या गावात दरड कोसळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे नमूद करत हा भाग दरड प्रवण क्षेत्रात येत नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे या भागात ही घटना का घडली? असा सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...