Monday, 9 October 2023

भिशीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वकिलासह नागरिकांची 16 लाखांची फसवणूक, राजरत्न चिटफंडच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल !!

भिशीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वकिलासह नागरिकांची 16 लाखांची फसवणूक, राजरत्न चिटफंडच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल !!


पुणे , प्रतिनिधी : चिटफंड मधील भिशीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून भिशीची मुदत संपल्यानंतर पैसे परत न करता वकिलासह नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजरत्न चिटफंडच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान पुर्णानगर, चिखली येथील चिटफंडच्या कार्यालयात घडला आहे.

याबाबत अ‍ॅड. गणेश रामभाऊ राऊत (वय-34 रा. गवळी नगर, टेल्को रोड, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजरत्न चिटफंड प्रा. लि. चे संचालक संतोष रामदास बरबडे (वय-39 रा. संतनगर मोशी प्राधिकरण, मोशी) व एका महिलेवर आयपीसी 406, 420, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधाचे रक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संतोष बरबडे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे राजरत्न चीटफंड प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी राऊत व इतर नागरिकांना चीटफंड मधील भिशीच्या योजनेची माहिती देऊन त्यांना भिशीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच गुंतवलेल्या रक्कमेवर लाभांश देण्याचे आमिष दाखवले.

फिर्यादी व इतर नागरिकांनी आरोपींच्या सांगण्यावरुन राजरत्न चिटफंड मधील भिशी योजनेत गुंतवणूक केली. भिशीची मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने न वटणारे धनादेश दिले. आरोपींनी एकूण 16 लाख 33 हजार 800 रुपये रकमेचा अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुदळे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...