आठवणीतील गाव -
निसर्गरम्य आंगवली - रेवाळेवाडी गाव
गाव” म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक गावाविषयी आगळंवेगळं स्थान असतं. माझं गाव… माझी वाडी… माझं घर… माझ्या घरातील माणसे… सारं काही एका क्षणात आठवायला लागते. मग गावाची ओढ लागते. शहरात राहणार्या माणसाला एकदा तरी गावी जावेसे वाटते. प्रत्येकाचं गावाशी काहीना काही असं अतूट नातं जोडलेलं असतं. प्रत्येकाची गावाशी एक नाळ जुळलेली आहे. ज्या मातीत आपण जन्म घेतो, रुजतो, वाढतो तो गाव सर्वानाच प्रिय असतो. काही गावे शांत, निर्मळ, विरळ वस्तीची असतात तर काही गावे गजबजलेली असतात.
असाच माझा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली - रेवाळेवाडी गाव, गावात सर्व जाती-धर्माचे लोक रहातात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावात जि. प. शाळा आंगवली, जनता विद्यालय आंगवली, सोमेश्वर मंदिर. मार्लेश्वर देवालय (मठ) याशिवाय अनेक आवश्यक सोयी - सुविधा उपलब्ध आहेत. माझा जन्म याच गावात झाला. शिक्षण पण येथेच झाले. शालेय जीवनात खूप सारी मस्ती.. धमाल केली होती. त्यामुळे माझा गाव कायम माझ्या मनाला नेहमी भुरळ पाडतो. चारी बाजुंनी डोंगरांचा पडलेला वेढा. हिरवंगार निसर्गरम्य सौंदर्य. गाव आणि माझे नाते म्हणजे न तुटणारा प्रवाह आहे. जेव्हा जेव्हा बाहेर पडावे वाटते. तेव्हा तेव्हा गावच्या मातीत जावून खेळावे, बागडावे असे वाटते. तशी सर्वांना गावाकडची एक वेगळीच ओढ असते. असं वाटतं की, प्रत्येक माणसाला गाव हे हवंहवंस वाटतं. गाव म्हटलं की माणूस ताजा होतो, त्याला गावाकडील आठवणीत रमून जायला आवडतं. पण या धकाधकीच्या जीवनात माणूस फार वेगवान झाला आहे. दिवसाचे चोवीस ताससुध्दा कमी पडायला लागलेत. यात गावाकडून शहरात आलेली माणसं मिसळून जातात. यामध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. पण शहर आणि गाव यामधील नातं वेगळे असल्याने अंगात ताकद असेपर्यंत कमवून आयुष्याची पुंजी जमा करून उतारवयात गावी जावून निवांत राहायचं असं प्रत्येकजण मनात स्वप्न पाहत असतो किंवा ठरविले जाते. त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही करीत असतो. मला मात्र गावातच राहायला आवडेल. वळणावळणाच्या वाटा, कौलारू घरे, शेतीवाडी, झाडेझुडपे, दगडधोंडे, आडविहिरी यामध्ये आयुष्य वेचायला घालवायला मनापासून आवडेल, पण नोकरीनिमित्त ते शक्य नाही याची खंत मनाला कायमच सलत असते. आपल्या गावापोटी असणारे प्रेम, भावना मनात साठवून नेहमी जगत असतो. कधीकधी गावाविषयी काही ऐकायला मिळाले तर भारावून जातो. वर्षातून एकदा तरी गावाकडे जावे असे वाटते. गणपतीला तर गेल्याशिवाय करमतच नाही. कुणाच्या लग्नाला जाणे-येणे होते. गावात वेगळीच शांतता मिळते. तिथे दोन दिवस जरी घालविले तरी प्रचंड आराम मिळतो. कितीतरी दिवसाचा थकवा निघून जातो.पण हल्ली गावात “गावपण” दिसत नाही. गावागावात, वाडीवाडीत भावकी.
गावातील एकूणच चित्र बदलायला हवं, गावाच्या एकात्मतेला तडा न जाता एकसंध ठेवले पाहिजे. यापूर्वी गावात एकीची भावना होती. अखंड गाव एका छताखाली, एकोप्याने राहायचा, पण हल्ली गावाला राजकारणाची कीड लागली. “माझं गाव माझं नाव” हे ब्रीदवाक्य प्रत्येकाने मनी रुजवले पाहिजे. माझ्या गावाशी असलेले नाते टिकले पाहिजे. नाही तर आधुनिकीकरणाच्या लाटेत गाव वाहून जाईल. पण तसे न होता खरे गावपण टिकले तरच माझ्या मनातील आपले गाव जोपासले जाईल.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणपतीला कुटुंबासह गावी गेलो होतो. खूप मज्जा केली गणपती कालावधीत. पण... नोकरी निमित्त पुन्हा गाव सोडून मुंबई ला यावेच लागलं. गणपती विसर्जन होताच जसं घरातील मखर खाली झाले अगदी तसंच गाव, वाडी, घरे खाली झाली. कारण गणपतीला गेलेले मुंबईकर आपापल्या नोकरी, धंदा साठी पुन्हा निघून गेली. मुंबई आल्यावर सुखरूप पोचलो हे सांगायला जेव्हा मुंबईकर गावी फोन करतात तेव्हा मात्र आजी -आजोबा तर कोणाचे आई -बाबा रडतात. घर खाली -खाली झालं रे तुमच्या जाण्याने....! काळजी घ्या रे सर्व... कामधंदा हातपाय सांभाळून करा. फोन करत रहा अधून -मधून... असं आवर्जून सांगतात. आम्ही मुंबई आलो असलो तरी मन, आठवणी कायम गावाकडे असते. गावाकडील माणसांनी दिलेल्या प्रेमामुळे... आपला कामधंदा सोडून मुंबईकर यांच्या साठी पूर्ण वेळ घरात राहून केलेली मज्जा... गप्पा गोष्टी... हे सारे आठवताच आमच्या डोळ्यातून आपोआप पाणी आल्याशिवाय राहत नाही. असा हा प्रेमाचा गोतावला. आठ दिवसाच्या गावच्या सहवासात असंख्य आठवणी उचबलून आल्या आणि त्या काळात गेल्यासारखं वाटले. वयाच्या ५२ व्या वर्षी शरीराला आणि मनाला उभारी देऊन गेल्या. प्रेमाने आणि श्रध्येवर जगण्याचे बाळकडू मिळाले. त्यांच्याच जोरावर आयुष्यात कर्तव्य, जबाबदारी आम्ही पार पाडू शकलो. आम्हाला घडवणारे धन्य ते गाव आणि घरातील, वाडीतील, गावातील माणसं....!
शांताराम ल. गुडेकर
पार्क साईट विक्रोळी (प.)
मुंबई -७९
No comments:
Post a Comment