छाडवा ब्रदर्स या गुजराती दुकानदारालाही मनसेचा दणका !!
घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :
मुलुंड मध्ये तृप्ती देवरूखकर या मराठी महिलेला गुजराती सोसायटीत कार्यालय नाकारल्याने गुजराती विरुद्ध मराठी वाद गेल्या काही दिवसापासून चांगलाच तापला आहे. गेल्या दोन दिवसापासून गुजराती विरुद्ध मराठी प्रकरण वाद वाढला आहे. पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या चौकावर लावण्यात आलेल्या गुजराती अक्षरातील मारू घाटकोपर या पाटीला देखील मनसे आणि शिवसेनेने विरोध केला. त्यावर शनिवारी रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुजराती अक्षरातील पाटी तोडून तेथे मराठी पाटी लावली. हे प्रकरण थांबत नाही तेच आज घाटकोपर पश्चिम एम जी रोड येथील छाडवा ब्रदर्स या गुजराती दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दणका देत दुकानातील ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलावर गुजराती अक्षरातील मजकूर हटवून मराठीत अक्षरातील बिल देण्यात यावे यासाठी एक निवेदन देण्यात आले.
पश्चिम महात्मा गांधी रोड येथील असलेल्या छाडवा ब्रदर्स या दुकानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष समीर सावंत, उप विभाग अध्यक्ष संदेश मोरे यांच्या वतीने छाडवा ब्रदर्स या दुकानदाराला दुकानातील गुजराती अक्षरातील बिल हटवून त्यावर मराठी भाषेतील बिल ग्राहकांना देण्यात यावे अशी निवेदन द्वारे विनवणी करण्यात आली. तसेच दुकानातील बिलाच्या पुढील बाजूस गुजराती भाषेतील अक्षरे आणि मागच्या बाजूस हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत असल्याने मराठी भाषेला कुठेही स्थान नसल्याचे आमच्या निदर्शनात आल्या नंतर आम्ही संबधित दुकानाला आज आमच्या स्टाईल ने विनंती केली आहे, अन्यथा मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी अस्मितेचा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असा इशारा दिल्याचे माजी विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले. दरम्यान दुकानदार मालकांनी आठ दिवसात आम्ही मराठी भाषेतील बिल सुरू करू असे आश्वासन मनसैनिकांना दिले असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शाखाध्यक्ष हेमंत पवार , गणेश पवार, सतीश पाटील, राहुल चौगुले, अर्जुन असोलकर सह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment